*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम * *लेख ६*


  *स्पार्ने गाश्तिश*

 

 हे आहे हॉस्पिटल!हार्लेम या शहरात !घरापासुन पंचवीस तीस मिनिटांचा रस्ता आहे.वळणावळणांचा निसर्गरम्य अशा लेकचा,कधी जंगलाचा आभास देणारा   हा हायवे!या रस्त्यालगतच विमानतळाचा एक रन वे देखील आहे त्यामुळे मोठ मोठी विमाने ऊड्डाण करतांना आणि लँडींग करतांना नेहमीच दिसतात.लाल पिवळ्या ट्युलीप्सची शेती पण अधेमधे दिसत राहते.असा हा छोटासा प्रवास संपवुन गाडी कधी हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये येते ते कळतही नाही.भल्या मोठ्या पार्कींग लॉटजवळ असलेल्या एटीम मशीनसारख्या मशीन मधुन पार्कींग तिकीट घ्यायचं. ते घेतलं की आठ दहा पायय्रा चढुन हॉस्पिटलच्या मेनडोअरजवळ यायचं.फिरत्या दरवाजातुन आत गेल्यावर भलं मोठं रिसेप्शन काऊंटर होतं.त्यावर एकुलती एक रिसेप्शनीस्ट दिसत होती. एका बाजुला मस्त कॅफे होतं.त्यात अनेक लोक लॅपटॉप घेऊन कामे करत,काॅफी घेत,बर्गर ,फ्राईज खात  ,गप्पा मारतांना दिसले. 

 आतल्या बाजुला पण अजुन एक दोन रेस्टॉरंटस होती.एक सब वेचं शॉप होतं.टॉयलेटसची सुविधा ठिकठिकाणी होती.एटीम मशिन्सपण समोरच लावले होते.

    औषधे घ्यायला ' अॅपोथेक ' होती.(फार्मसी)

 वेटींग लाऊंजमध्ये पणआरामदायी सोफे,कॉफी मशिन्स होती. टिव्हीची सोय होती.आकर्षक फुलझाडे,इनडोअर प्लॅंटसच्या कुंड्या ठेवल्या होत्या

  ठीकठीकाणी  वेगवेगळ्या डॉक्टरांच्या केबीनकडे जाणारे फलक होते.

मोठमोठ्या लिफ्टसची सोय होती.मुख्य म्हणजे त्या छान चालु होत्या.

      नर्सेस स्टेशन,व्हिल चेअर अशी नेहमी दिसणारी सुविधा होती.

हॉस्पिटलच्या बाहेरचं वातावरणही तितकंच लोभस होतं .मोठमोठे वृक्ष हॉस्पिटलच्या आवारात होते. हिरवळीचा गालीचाही ऊन्हांत मस्त चककत होता.त्याच्याचपुढे छोटासा लेक .मधोमध ऊसळणारं  फेसाळतं कारंजं .या सगळ्याचा आनंद घेणारं बदकाचं कुटुंब!आई ,बाबा आणि सहा इवली इवली पिल्ले .एका मागोमाग एक जात कारंजाच्या पडणाय्रा थेंबात भिजुन ,गोल फिरुन यायची.तसेच इतरही पाणपक्षी दिसत होते.कबुतरं गवताच्या गालीचावर भक्ष टिपतांना दिसले.

  एखादा नातेवाईक आपल्या रुग्णाला  व्हिलचेअरवर बसुन फिरतांना दिसे.काही जण वॉकींग ट्रॅकवरुन वॉकींग करतांना पण दिसले.

पांढरा कोट घातलेले डॉक्टर्स,नर्सेस भराभर येत जात असलेले दिसले.

  हॉस्पिटलच्या बाहेर पायय्रांवर मात्र 'फुंके' ऊन्हांत बसुन धुर सोडतांना दिसले.सिगरेटच्या थोटकं सोडल्यास हॉस्पिटल स्वच्छ होतं.


  *सौ.पुर्वा लाटकर*

Comments