बायका लिहितात

 बायका लिहित राहतात काहीबाही.कथा,कविता, चारोळी,लेख,ललित लेख,स्फुट लेखन! बायका लिहितात. मनातलं.पोटातलं.ओठातलं.दिठीतलं.

आपलं दुःख,वेदना,त्रास . सगळं सगळं लिहित रहातात.


पण हे सगळं लिहिण्यासाठी सवड तरी कुठे मिळते निवांत! मग केरवारे , सडा रांगोळी करतांना, भाजी चिरताना , कढईतल्या गरम तेलात मोहरी,जिरे टाकतांना .पोळ्या लाटताना,भाकरी थापताना .शब्द ,कल्पना,विचार, तिच्या दडपलेल्या भावना!



एखादे कथाबीज तिच्या डोक्यात सतत रुंजी घालत राहते.पण तिला वेळ कुठे असतो हे मनातलं कागदावर लिहायला!हल्ली मोबाईलवर टायपायला!

शब्द बिचारे मुके,मुके ओठंगून उभे राहतात.कंटाळतात.कधी कधी निघूनही जातात.

तीला लिहायला निवांतपणा मिळाला की  ती लिहित राहते.कागदावर उतरवत राहते.


या सगळ्या गडबडीत तिचा धांटरटपणा वाढतो.तिच्या हातून चुका होतात.वस्तू पडतात. फुटतात. सांडलवंड होते.बोट कापलं जातं.भाजतं.घरचे मग तिला टोमणे मारतात. वेंधळीच आहे अशी शेरेबाजी करतात.तरी ती लिहित राहते. सगळं सगळं सहन करत ती व्यक्त होत राहते.



बायका लिहितात.लिहित राहतात.अनेक वर्षे. शतकानुशतके.

बायकांचं लिहिणं म्हणजे हिमनगाचे टोक.वर जेवढं दिसतं त्यापेक्षा कितीतरी खोल ,आत रुतलेले असतं.


बायका अशा प्रकारे लिहित राहतात. लिहितलही पुढे.अनेक वर्षे. सगळा व्याप सांभाळत!

Comments