लॉक डाऊन डायरीज .2.0

🔒🔒लॉक डाऊन डायरीज .2.0 🔒🔒29.4.2020🔒🔒


        अाज ना ऊद्या कधीतरी ,दिर्घप्रतिक्षेनंतर हा लॉकडाऊन संपणार अाहेच.हा लॉकदाऊन ऊठवल्यानंतर लगेचच सगळं सुरळीत होईल ही अपेक्षा करणं फोल अाहे.अाधीच माणसांच्या मनाचं खच्चीकरण झालंय,त्यात बाहेर पडल्यानंतर प्रत्येक व्यक्तिकडे संशयाने पाहिले जाईल.कोणतीही कृती करतांना अाधी दहावेळा विचार केला जाईल.अापला स्पर्श कुठे कुठे होतोय,कोणत्या वस्तुंना ,सरफेसेसना हात लावतोय हे बघावं लागेल.सोशल डिस्टंन्सिंग कटाक्षाने पाळावं लागेल.तशी व्यवस्था अॉफीसेस ,शाळा !काॅलेजेस,नाट्यगृह,चित्रपटगृह,मॉल,रेल्वे,बसेस ,टॅक्सी ,रीक्षा या सर्वठीकाणी करावी लागेल.एकत्र येण्याचं टाळलं जाईल.अनेक गृप्स,संस्था ,कीटीपार्टीज,भिशी ,सण समारंभ ,गेटटुगेदर यापुढे होतील की नाही शंका अाहे. जाणं अगदीच महत्वाचं ,जवळचं असेल तरच काहीजण जातील.प्रवासपण करावा किंवा नाही याचा विचार करावा लागेल.बागांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट,ते बिनधास्त मातीत लोळणं,पकडापकडीचे खेळ,एकमेकांच्या हातात हात घेणं यावर अायांचं कडक लक्ष असेल.पाळणाघरे,बालवाड्या,नर्सरी मध्ये मुलांना पाठवायला पालकांची मने धजावणार नाहीत.बाहेर पडतांना सतत मास्क,सॅनीटायझरचा वापर,अारोग्यसेतु या अॅपचा वापर.या अॅपद्वारे अाजुबाजुला संशयीत रुग्ण ट्रेस होणार अाहे तरीही मनांत प्रचंड भीती असणार अाहे.सतत दडपणाखाली वावरावे लागणार अाहे.कोचींग क्लासेस,शाळा,कॉलेजेस त्यांच्या अाणण्या नेण्याच्या बसेस याची कशी व्यवस्था करतील हे एक मोठं कोडं अाहे.भारताततरी अजुन सगळं व्हर्चुअल झालं नाहीये.प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग कसं करायचं?ही एक मोठी डोकेदुखी ठरणार अाहे.त्यात भारतातली लोकसंख्या अफाट अाणि भारतीयांची एकत्र येण्याची,राहण्याची मानसिकता ,सगळ्यांतच बदल होणार अाहेत.
करोना पुर्व अाणि करोनोत्तर जगांत कमालीचा फरक जाणवेल.अजुनही जीम,व्यायामशाळा,ब्युटीपार्लर,हेअरसलुन,स्पाज,विविध प्रकारचे खेळ,स्पर्धा,सहली याचाही विचार करावा लागेल.जग बदलणार अाहे,अापल्याही सवयी ,अट्टाहास,दुराग्रह सोडावे लागतील.अमुकच हवं अमुकच नकोच असं म्हणून चालणार नाही.स्वभावात लवचिकता अाणावी लागेल.मदतीचा ,दातृत्वाचा हात सतत पुढे ठेवावा लागणार अाहे.मौजमजेचे दिवस संपुन जबाबदारीचे,जागरुकतेचे दिवस येणार अाहेत.माणसांमाणसांतली माणुसकी अबाधित कशी राहील या कडे कल करावा लागणार अाहे.स्वकेंद्रीत भावना न ठेवता 'हे विश्वची माझे घर' अशी जाणीव जाणीवपुर्वक रुजवायला हवी.करोनानंतरचं जग!या  जगात जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हा खुप विविध पातळ्यांवर करावा लागणार अाहे.
पण अापण सारी माणसे अाहोत ती जगण्याची विजीगुषी वृत्ती,तो चिवटपणा,कणखरपणा ,दुर्दम्य अाशावाद यातुन अापल्या सगळ्यांना तारुन नेईल !🔒🔒🔒सौ.पुर्वा लाटकर.🔒🔒

Comments