कर्वे रामेश्वर

 आज सकाळी मोबाईल बघीतला आणि तात्या गेल्याची दु:खद बातमी समजलि.दिवसभर त्यांच्या आठवणींचा पिंगा फेर धरुन होता.

    आमच्या 'आनंदी 'मंडळातल्या सख्यांनी तात्यांकडे रुद्र शिकण्यास चालू केलं अन तात्यांची ओळख,परिचय वाढत गेला.तात्या नांव ऊच्चारताच डोळ्यासमोर येते ती वामन मूर्ती ,अर्धी चड्डी,पांढरा बुशकोट, डोक्यावर संघाची काळी टोपी, खांद्यावरची शबनम अन हातातली काठी.तात्यांचे डोळे विलक्षण बोलके ,निरागस,चौकस किंचीत खट्याळपणा असलेले अगदी लहान मुलासारखे वाटत.त्यांचा आवाज खणखणीत तरिही प्रेमळ आपुलकीने ओथंबलेला असे.

  आम्ही त्याच्याकडे रुद्र,सौरसूक्त,विष्णुसूक्त इ.अनेक सुक्ते  शिकलो.पवमान सूक्तासारखे अवघड सूक्त पण अतीशय हसत खेळत ,मजेत शिकलो.शिकवतांना कधीच ते ओरडत नसत की रागावत नसत ऊलट 'येईल हो तुला,जमेल तुम्हांला'अशी धीराची भाषा बोलत ,त्यामुळे शिकण्यास अजुनच हूरुप येई.

'गणेश पुजा' पण त्यांनी शिकवली होती.त्यांचा संस्कृत शिका असा कायमच आग्रह राहीला.आधी संस्कृत मग बाकीची स्तोत्रे,सूक्ते मी शिकविन यावर ते ठाम होते.त्यानुसार आम्ही संस्कृत शिकायला सुरवात केली.काही दिवस आम्ही जातही होतो पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तात्यांच्या अलिबाग फेय्रा बंद झाल्या आणि संस्कृत शिकायचे राहुनच गेले.

शिकवता शिकवता तात्या मध्येच आठवणी सांगत,त्यातील एकदोन आठवणी.

स्वातंत्र्यापूर्विचा काळ होता.इंग्रजांचं राज्य त्यावेळी किहिम येथे इंग्रजांचे बंगले होते.तात्या त्यावेळी एका इंग्रज अधिकाय्राच्या पत्नीला संस्कृत शिकुवायला जात असत.ते फारसं त्या अधिकाय्राला आवडायचं नाही.पण तात्यांना त्यांनी कधी विरोध केला नाही.

तसेच विवाहात जे मंत्र म्हणतात त्यातील वेदीक रुचांचा अर्थ त्यांनी जो लावला होता तो काही त्याकाळच्या ब्राम्हण मंडळींना रुचला नाही.तात्यांना त्यांनी आव्हान दीलं आणि तुम्ही जो अर्थ सांगताय तो सिद्ध करुन दाखवा!तात्यांनी ते आव्हान स्विकारलं.ठरलेल्या तारखेनुसार,वेळेनुसार तात्या मुंबईला त्या मंडळींसमोर हजर राहिले.त्या रुचा आणि त्यांचा अर्थ संदर्भासहित ऊलगडुन दाखवला.सर्व मंडळी अवाक झाली.तात्यांच्या हुशारीचं कौतुक करु लागली.बक्षिसही देऊ केलं पण तात्यांनी ते नम्रपणे नाकारलं.

त्यांच्या निरामय दिर्घायुष्याचं रहस्य हे संस्कृतच आहे असं तात्या नेहमी बोलुन दाखवत.संस्कृत त्याचे ऊच्चार,ते शिकवण्याची ,तळागाळापर्यंत पोहचविण्याची तळमळ.विशेषत: स्रियांना शिकवण्याकडे कल असे.एक स्रि शिकली म्हणजे सगळे घरदार शिकते या ऊक्तीनुसार अनेक स्रियांना गणेशपुजा,सत्यनारायण,वास्तुशांत,हरताळका,मंगळागौर पुजा तसेच लग्न व मुंज लावण्यापर्यंत त्यांना शिकवलं.आजही रायगड जिल्ह्यात या अनेक भगिनी मोठ्या ऊत्साहात हे कार्य करत आहेत.

तात्यांना जात,पात,धर्म,पंथ,श्रीमंत,गरिब ,लहान ,मोठा,शिकलेला,अडाणी यां सीमांनी कधीच आडकाठी आणली नाही.एखाद्या खळाळणाय्रा झय्रासारखं त्यांचं आयुष्य होतं निर्मळ,निखळ ,प्रत्येकाला सामावुन घेणारं,आपलंसं करणारं.

स्वातंत्र्यपूर्व काळ ते आताचा करोना काळ अनेक सामाजिक,राजकीय ,सांस्कृतिक स्थित्यंतरे पाहिलेलं एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्व पुन्हां होणे नाही.

निरलंस,निस्पृह ,निर्लोभी असं संसारात राहुनही संन्याशी वृत्तीचं व्यक्तिमत्व!संस्कृत त्यांचा श्वास,ध्यास आणि ध्येय होतं!अशा व्यक्तिमत्वाच्या सहवासात राहुन किंचीत शिकता आलं हेच आमचं भाग्य!

 आज वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.पण संस्कृत आणि अनेक सूक्त ,वैदीक पठणाच्या रुपाने ते कायमच आपल्यात राहतील.ते इथेच आहेत!कायमच!🙏🏻🙏🏻



         सौ.पूर्वा लाटकर अलिबाग

Comments