🌱🌱🌱🌱🌱

      फारा दिवसांनी मातीत हात घालायचा योग आला.....कुंडीतल्या मातीतच बरंका!कुंडीतली काळीशार माती हलकेच सैल केली.शेजारीच असलेल्या कुंडीतल्या वाळलेल्या मंजिय्रा हातानेच चुरगळून मातीत टाकल्या! वरुन मऊसह काळी माती आच्छादली!इवलंस तुळशीचं बी!त्यांना म्हंटलं 'पडुन रहा ऊबदार कुशीत,काही काळ!मग यायचंच आहे  बाहेर ,ही सृष्टीची नवलाई बघायला!' वरुन पाण्याचा शिडकावा केला !आता काही दिवस वाट बघणे आले.

   रोज सकाळ झाली की पहिली धाव त्या कुंडीकडे.पाण्याचा शिडकावा द्यायचा!रोजची ऊत्सुकता अधिकाधिक वाढती असायची!निसर्गात इंन्स्टंट काही नसतं !धीर धरणे,वाट बघणे एवढेच हातात असते.

  पाच सात दिवसांनी मातीतुन अगदी लहानसर  हिरवेकोवळे कोंब दिसु लागले!मन हरकुन गेले!पुन्हा मायेने,प्रेमाने पाण्याचा शिडकावा केला!आता त्यांची काळजी जास्तच घ्यावी लागणार होती.दिवसागणिक त्यांची बाहेर येणारी नाजुक पाने मी बघत होते.त्यांना असं वाढतांना पाहुन मुलांना वाढवण्याची प्रोसेस आठवली.

      आता रोपे छान रुजुन वर आली.कुंडी हिरवीगार दिसु लागली.त्यांच्या कणाकणाने वाढण्याचा,मुळं खोल जाण्याचा आनंद मी घेत होते.

          असं असतांनाच समोरच्या पिंपळावरुन पिवळसर पाने रोज गळुन पडत होती.ती पिवळी निबर,जरठ पाने मातीत मिसळायची. हे इतकं सहजपणे पिंपळापासुन अलग होणं ,खाली पडणं मातीत मिसळणं!निसर्ग नियमाला धरुनच आहे.मातीपासुन सुरु झालेला इवल्याश्या बिजाचा प्रवास ते परिपक्व होऊन मातीत पुन्हा मिसळण्याच्या क्षणापर्यंतचा प्रवास.............माणसांचही असंच असतं ना!

                               सौ.पुर्वा लाटकर,पुणे (6.2.2021)

Comments