🍀☘️☘️☘️                                  

      आज सकाळी बागेत अनवाणी फिरतांना पायातळी छोटी छोटी रोपं,गवत जाणवलं.विविध प्रकारची रोपं,जेमतेम सहा सात इंचापर्यंत वाढणारी.त्यातही त्यांच्या पानांचे अनेक रंग,आकार,त्यावर येणारी बारीकशी रंगीबेरंगी फुले.गवताचे निरनिराळे प्रकार.कुठलंही नाव नसलेली,सुवास नसलेली ही हिरवळ कुठेही ऊगवते.खडकाळ,रेताड जमीनीत,रस्त्याच्या कडेला,सिमेंटच्या फटीत,कंपाऊंडवॉलच्या कानाकपारीत जिथे जिथे किंचीत ओलावा मिळेल तीथे तीथे ही ऊगवतात.फारशी निगराणी कोणी करत नाही यांची.ऊलट ऊपटुन काढुनच टाकलं जातं यांना.बागेतल्या इतर रोपट्यात आणि यांच्यात 'भारत' आणि इंडीया इतकं अंतर असतं.

   तरीही ही अतीशय दुर्लक्षीत,निरुपयोगी रोपटी स्वत:च्या विश्वात मस्त जगत असतात,ताठ मानेने.त्याच्या जगात ती खुश असतात,इवलीशी रोपं जगाकडे कुतुहलाने बघतात,वाढतात,लहान लहान निळी,जांभळी,पिवळी पांढरी फुले यांच्या अंगाखांद्यावर फुलतात.अगदी निरखुन पाहिलं तरच त्यांचं सौंदर्य दृष्टीस पडतं.ही बागेचा किंवा निसर्गाचा मोठा हिरवाईचा भाग असतात.यांना पाहिल्यावर समाजातील कष्टकरी,मोलमजुरी करणारे ,राबणारे हात आठवतात.ते देखीलसमाजासाठी खुप काही करत असतात पण कायम ऊपेक्षित रहातात.त्यांच्या अस्तित्वाची दखलही कोणी घेत नाही.अत्यंत गरीब,झोपडीत रहाणारे,फुटपाथवर रहाणारे लोक कसे कुठेही तग धरतात  जीवनाचा लढा लढतात आणि नाहीशी होतात.ही रोपटी देखील आपल्या अल्पायुषी आयुष्यात नेटाने ऊभी रहातात आणि एकदिवस ऊपटुन टाकली जातात.

       यांच्यातही जीव आहे,यांचं जगणंही इतरांसारखंच आहे याची जाणीव आणि फिकीर कोणालाच नसते.

            कधीतरी डोळे ऊघडुन अवतीभवती पहा.सतत राबणारे हे जीव,काहीतरी करु पहाणारे.समाजात वर येऊ पहाणारे हे जीव.यांची थोडीतरी दखल घेऊया.यांच्यासाठी काहीतरी करुया.'भारत' आणि 'इंडीया'तली ही दरी काही प्रमाणात का होईना सांधण्याचा प्रयत्न करुया.

🍀☘️🍀🍀

                                   सौ.पुर्वा लाटकर.(10.2.2021).

Comments