🌳🌳🌳🌳🌳🌳🌳                 

   बागेत अगदी एका टोकाला एक खुप जुना वटवृक्ष होता.खुप ऊंच वाढलेला,विस्तारलेला खोडही मजबुत आणि आडवे पसरलेले.हा वृक्ष जणु संपूर्ण बागेवर लक्ष ठेवणारा,नजर ठेवणारा.एखाद्या घरातील वयोवृद्ध आजोबा एका ठिकाणी बसुन घरावर ,कुटुंबावर लक्ष ठेवतात ना अगदी तस्साच!यावृक्षाची मुळे जमिनित खोलवर रुतलेली.मुळांचे लहानमोठे जाळे जमिनिखाली व्यापलेले.ऊंच आकाशाशी स्पर्धा करणाय्रा मोठमोठ्या फांद्या!आडवा तिडवा पसरलेला त्याचा पसारा.फुलं,फळे येऊन,बहरुन गेल्याची निवृत्तीसारखी अवस्था!अनेक ऊनपावसाळे,छोटीमोठी वादळं,निसर्गाच्या थपडा खाऊनही ताठ मानेने ऊभं असलेलं ते झाड!झाडाखाली भलामोठा दगडीपार बांधलेला.झाडासारखीच वयोवृद्ध माणसे इथे येत.सुखदु:खाच्या गोष्टी करत.जुने दिवस आठवत,ऊसासे टाकत!झाडही त्यांच्या गोष्टी ऐकत.अप्रत्यक्ष का होईना झाडाचाही सहभाग त्या गप्पांमध्ये  असे.अशावेळी झाड मंद,थंड वाय्राची झुळुक सोडे.जणू त्या वृद्धांच्या मनावर घातलेली फुंकरच!झाड त्यांना शांत करीत.सगळी दु:खे पोटात साठवीत.आलेल्या पांथस्थाची जीव ,त्याची तगमग कुठल्याकुठे पळुन जायची.पुन्हा नव्याने जगण्याची ऊर्जा घेऊन ही वयोवद्ध मंडळी घराकडे चालु लागायची.

   समाजात आजही दुर्मिळ संतसज्जन,साधु मंडळी आहेत ,जी समाजाचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करतात.आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खपुन ऊर्वरीत आयुष्यात देखील कार्यरत असतात.यांना स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात काही मिळवायचे नसते.कोणताही मानसन्मान नको असतो.कोणताही पुरस्कार नको असतो.कोणी आपल्या कामाची दखल घ्यावी,कौतुक करावे यासाठी ते झटत नसतात.समाजाप्रती असलेलं प्रेम,निष्ठा,कळकळ यासाठी त्यांनी वाहुन घेतलेलं असतं.अशी माणसे हल्ली दुर्मिळ होत चाललीय.आणि असे वयोवृद्ध वटवृक्षपण फार थोडे ऊरले आहेत.यांना जपायला हवं.सांभाळायला हवं.यातच समाजाचं आणि आपलं भलं आहे🌳🌳🌳🌳🌳🌳

               सौ.पुर्वा लाटकर (12.2.2021)

Comments