✒️✒️✒️🖋️📚📚📚📚 

   आज मराठी भाषा दिन!कवी,लेखक वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस!

       हा दिवस साजरा करतांना मला रोजच्या दैनंदिन आयुष्यात मराठी बाबतीत काय अनुभव येतोय याचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करतेय.घरातुन बाहेर पडलं की फुटपाथवर अनेक जणांनी त्यांचे व्यवसाय थाटलेले आहेत.त्यातले बहुतांशी हिंदी भाषिकच!एक फुलवाला सोडला तर,पाणीपुरीवाला,भाजीवाला, किल्ल्या बनवणारा,पेपरवाला ,दुध घेऊन येणारा सगळेच हिंदी भाषिक!समोरच्या रेस्टॉरंटमध्येपण नावाला मराठीमुलं घेतलीत,पण सगळीच परराज्यातुन आलेली.औषधांची दुकाने,किराणा मालाची दुकाने ,दवाखाने,मोठी हॉस्पीटल्स सगळीकडेच हिंदी,इंग्लीशचा वापर होतोय.मॉल्समध्ये,कॉर्पोरेट अॉफिसेसमध्ये इंग्लीशलाच भाव आहे.पेठांमध्ये मंडईत काही मराठी बोलली जाते.मराठी अशी विखुरलेली दिसते.तीचं एकसंधीपण,एकजीनसीपण ठळकपणे कुठेच अाढळत नाही.अगदी दुकानांच्या पाट्यातपण मराठी बोटांवर मोजली जाते.हायफाय सोसायट्यांची,अपार्टमेंटची आणि चकचकीत दुकांनाची बिल्डींगची नावे तर इतकी विविध आहेत की क्षणभर प्रश्न पडावा आपण महाराष्ट्रात आहोत तेही पुण्यात!

       आज आपण मिडीयावरची मराठी बघतो ,जाहीराती बघतो त्यातली मराठी किती सवंग,टुकार आहे.दुरदर्शनची सह्याद्रीवाहिनी सोडली तर इतर  ठीकाणी सगळा गोंधळच आहे.ज्या काही मराठीच्याम्हणुन वाहिन्या आहेत तिथेही पांचट ,अश्लील,काहीही कस नसलेलं असं दाखवलं जातं!आणि हेच खरं मराठी हीच खरी मराठी भाषा असं आजच्या आणि येणाय्रा पिढ्यांवर बिंबवलं जातंय!तेच तेच ते चित्रपट,खेडवळी,धेडगुजरी भाषा बोलणारी पात्रं,त्यांच्या तोंडी असलेले संवाद त्यामुळे आजच्या पिढीला हीच खरी मराठी असं वाटु लागलंय!पुण्यासारख्या मराठी भाषिक शहरात संपूर्णपणे मराठीलावाहुन घेतलेलं एकही दर्जेदार एफ.एम.रेडीओचं चॅनेल असु नये यांची खंत वाटते.

    आपली मराठी भरजरी,जरतारी,वेलबुट्टीदार आहे.ती कुठेतरी हरवुन बसलीय.ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी,अमृतानुभव,चांगदेवपासष्टी,हरीपाठातली मराठी.समर्थ रामदासांच्या दासबोधातली मराठी.राम गणेश गडकरी,आचार्य अत्रे..पुलं देशपांडे,कुसुमाग्रज,नामदेव ढसाळ ,कुसुमाग्रज,भालचंद्र नेमाडे,विंदा करंदीकर,सुरेश,पद्मा गोळे,शांता शेळके ,गौरी कुलकर्णीं,सानिया आणि असंख्य नावांची जंत्री आहे यांच्या साहित्यातली मराठी हल्ली समोर येत नाहीय.संगीत नाटकांची परंपरा असलेली मराठीपण अभावानेच दिसुन येतेय.शेकडो दर्जेदार मराठी नाटकातली मराठीपण आजच्या पिढीपर्यंत पोहोचत नाहीये.

    मोठमोठी पल्लेदार,लफ्फेदार वाक्य असलेली मराठी,बोलतांना दमछाक करणारी मराठी ,बोलतांना जिभेला वळणे देणारी ,कष्ट करायला लावणारी,दणकट,राकट,रांगडी मराठी,मिशीला पीळ देत बोलली जाणारी मराठी.दर दहा कोसांवर बदलणारी मराठी.वर्हाडी,नागपुरी,मराठवाडी,अहीराणी,कोकणी,कोल्हापुरी,खानदेशी या सगळ्या मराठीच्या भाषा भगीनी आहेत त्या मराठी भाषेला अजुनच समृद्ध ,सशक्त करतात.पण आज याठीकाणी बोलली जाणारी मराठीपण लोप पावतीय.

    मराठी रंगभूमी,मराठी चित्रपट,मराठी साहित्य सगळ्याच ठिकाणी मराठीचा पोत सुधारणे आवश्यक आहे.ही लपलेली मराठीची पैठणी बासनातुन काढुन नवी झळाळी देण्याची गरज आहे.त्यासाठी काय काय करता येईल याचा विचार जरी आजच्या दिवशी रुजला तरी 'मराठी भाषा दिन' साजरा झाला असं वाटेल!

नाहीतर 'अमृतातही पैजा' जिंकणारी मराठी भाषा केवळ 'मराठी भाषा दिनापुरती' ऊरेल.📚📚📚🖋️🖋️🖋️🖋️

                            

                 सौ.पुर्वा लाटकर.२७.२.२०२१पुणे

Comments