🍂🍁🍁🍁🍁🍁

                 शिशिराला अजुन थोडा अवकाश  आहे मात्र आमच्या बागेतल्या झाडांचा शिशिर सुरु झालाय.रोज पानगळती चालु आहे.समोरचा अशोक,पलिकडचा कडुनिंब,दारासमोरचा आंबा,गुलमोहोर,भलामोठा वाढलेला सोनचाफा ,वेडावाकडा ऊंबर चवय्रा ढाळल्यासारखे पाने ढाळताहेत.

     अशोकाची नक्षिदार कडा असलेली पिवळी पाने!पिवळ्यापानात पण कितीतरी प्रकार ,काही पूर्ण पिवळी ,काही हिरवट पिवळी तर काहींमध्ये पिवळा आणि किंचीत हिरवेपणा शिल्लक राहिलेला!वाय्राच्या हलक्या झोतानेही  सरळ रेषेत,तर कधी गिरक्या घेत गळणारी पाने.

          गुलमोहोराची नाजुक इवली पाने आणि त्याच्या वक्राकृती काड्या.आंब्याची टोकदार पाने,सोनचाफ्याची मोठमोठी पाने,कडुनिंबाची पण छोटी छोटी पाने.या सगळ्या पानांचा दिवसभर ढिग होतो झाडाखाली.त्यातली काही नुकतीच गळालेली,काही अर्धवट वाळलेली,तर काही पानांचा वाळुन भुगा झालेला.

    कधी वाटतं झाडाला काहीच सोयरसुतक नसावं गळणाय्रा पानांचं!जणु काही त्याने हे मनाशी ठरवुनच टाकलंय,हे गळणं अटळ आहे.त्यामुळे  ते दु:ख वगैरे करत बसत नाही.त्याची नजर वर आभाळाकडे,वाढीकडे,वर जाण्यावरच लागलीय जणु.तर कधी सांजसावल्या दाटुन आल्यावर झाडे मलुल ,निस्तेज,एकटी ऊदास आणि मूकरुदन करत असल्यासारखी वाटतात.घशात आवंढा दाटुन यावा आणि तो बाहेरच पडु नये असं काहीसं त्यांच्याबाबतीत होत असावं.

       झाडं हे पानांचं गळणं सहजपणे स्विकारतात ,पण माणसं मात्र भावनेच्या,वासनेच्या मी पणात अडकवून घेतात स्वत:ला,त्यामुळे त्याचं 'गळणं' अनपेक्षित वाटत असतं त्यांना.या 'गळण्याचा' सहजपणे जर स्विकार केला तर हे 'गळणं' आनंदी होईल!होय ना!🍂🍂🍁🍁🍁

                   सौ.पुर्वा लाटकर  (9.2.2021)🍁🍁🍁

Comments