🪶🪶🪶🪶 

        नुकताच 'जागतिक चिमणी दिवस' झाला.या निमित्ताने मला जाणवलेल्या काही बाबी शेअर कराव्याश्या वाटल्या म्हणुन हे लिहीतेय.

         साधारणपणे सगळ्यांच्या लहानपणी कावळा चिमणी किंवा काऊचिऊ अगदी सहजपणे दिसत.आजुबाजुला असलेला त्यांचा वावर इतका गृहीत धरला होता की जणु हे अगदी अस्संच चालणार!पूर्वी तुम्हांला आठवत असेल तर प्रत्येक  घराघरात वळचणीला,आढ्याला ,फॅनवर असलेल्या खोलगट जागेत  चिमणीचं घरटं  असायचंच! याची सुरवात खुप मजेशीर व्हायची हं!म्हणजे चिमणा चिमणीला घरटं बांधायचं असेल त्या घराचा आणि जागेचा सर्वे करायची.आधी चिमणा यायचा पंख फडफडुन जागा शोधायचा.शोधक नजरेने त्याची सुरक्षितता शोधायचा.आजुबाजुच्या परिसरात असलेली झाडं त्यातुन मिळणारं खाद्य याचीही चाचपणी व्हायची.चिमण्याला जागा आवडली की तो चिमणीला घेऊन यायचा .ती पण आपले नाजूक पंख फडफडत किंचीत लाजत,हलक्या आवाजात चिवचिवाट करत आधी खिडकीवर ,मग दरवाजावर बसत चिमण्याने निवडलेल्या जागी पोहोचायची.गोल गीरकी घेत.ती पण शोधक नजरेने जागेची पाहणी करायची.घरातल्या लोकांचीही तपासणी व्हायची.हे लोक राहु देतील ना त्यांच्या घरात?हुसकावुन तर लावणार नाहीत ना?घरटं मोडुन तर टाकणार नाही ना ?अशा अनेक शंका कुशंका चिमणा व चिमणी दोघांच्याही मनांत असत.कधी चिमणीला जागा पसंत पडे तर कधी जागा पाहुन तीच्या रागाचा पारा चढे.जणु 'तुम्हांला काही म्हणुन काही कळत नाही जागेतलं ',असं मोठ्याने चिवचिवाट करुन रागे भरे.पुन्हा एकदा पाहणी ,चाचपणी सुरु होई.शेवटी चिमणीचा मान तिरकी करुन होकार मिळे.आता  यानंतरची दोघांचीही लगबग बघण्यासारखी असे.आधी मोठ्या काड्या जमा करुन बाहेरची जागा बांधुन घेतली जायची.त्याच्या आत मऊ गवत,त्याच्या काड्या,कापुस ,चिंध्या याने आत छान गादी तयार केली जायची.दोघेही चोचीत या वस्तु घेऊन बाहेरुन घरात अनेक भराय्रा मारत.त्यांचे जाणे येणे सतत चालु असे.न थकता,न कंटाळता अवीरतपणे दोघेही मोठ्या कष्टाने घरटं ऊभारत.आता वेळ व्हायची ती चिमणीच्या अंडे देण्याची .चिमणी अंडे देऊन ऊबवायची,पिल्ले बाहेर पडायची वाट बघत घरट्यातच बसुन राहायची.चिमणा मात्र दोघांचही चारापाणी शोधण्याकरता वणवण भटकायचा.यावेळी घरांत शांतता नांदायची.काही दिवसांतच एकएक करुन पिल्लु बाहेर यायचे आणि घरात चिवचिवाट चालु व्हायचा.आता पिल्लांना भरवायला जास्तीचे अन्न लागणार म्हणुन चिमणा,चिमणी दोघेही बाहेर पडत.दोघांच्याही फेय्रा चालु होत.आणलेलं अन्न पिल्लांच्या चोचीत टाकायचा,त्याची धडपड,पिल्लांची अगदी नाजुक अवस्था ,अशी तारेवरची कसरत चालायची.कधी पिल्लं वाट बघुन भूकेने कलकलाट करत ,घरट्यातच जोरदार हालचाली करत.अशातच एखादे पिल्लु टपकन खाली पडे.आई गं!ते ऊंचावरुन पडलेलं पिल्लु अंगावर पीसं नसलेलं हाडावर जणु कातडी ओढुन बसवलेल्यासारखं दिसायचं.घरातली मंडळी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत मात्र ते पिल्लु मरुन जाई.सगळ्यांंनाच खुप वाईट वाटे.जेवण जात नसे.

       काही पिल्लं मोठी होऊन ऊडायला शिकत.छोट्याछोट्या भराय्रा मारत घरातच.काही दिवसांनी पिल्लं बाहेर ऊडण्याइतकी ताकदवान झाली की चिमणा चिमणी त्यांना निरोप देत.एका डोळ्यांत आसु आणि दुसय्रात हसु अशी त्यांची अवस्था व्हायची.आता घरटं रीकामं पण चिमणा चिमणीचं मन मात्र समाधानाने काठोकाठ भरलेलं.🪶🪶🪶🪶

                           सौ.पुर्वा लाटकर

Comments