*डिलीट*
परवा एका ग्रुपवरुन मेसेज आला ,तुम्ही ग्रुपवर अॅक्टीव्ह नसाल तर बाहेर पडा.सध्या अलिबागेत वास्तव्य नसल्याने मी लगेचच होकार दीला आणि ग्रुप बाहेर पडले.
व्हॉटसअपच्या इतरही ग्रुपवर नजर टाकली असता तेथेही माझे योगदान शुन्यच होते.काही ग्रुप फक्त अॅडमिन पुरस्कृत होते त्यामुळे त्यातुनही बाहेर पडले.
हुश्श! किती छान वाटतंय.अगदी हलकं हलकं!नको ते ऊगाचअालेले मेसेज,ते रीपीटेड व्हिडीओज,फारशी ओळखदेख नसलेल्या लोकांना शुभेच्छा देणं.खरंच किती कचरा आपण मनांत साठवत असतो.कितीतरी बिनकामाची ओझी वर्षानुवर्षे वाहवत असतो.कधी प्रवाहपतीत होऊन त्या बरोबर वाहत असतो.सकस काय हीणकस काय?कोण आपलं कोण परकं हे सुद्धा जाणून न घेता परक्या व्यक्तींबरोबर प्रवास करत असतो.
मोबाईलला जसं डिलीट फिचर असतं तशी मनालाही असतं तर किती मस्त वाटलं असतं ना!डिलीट शब्दाचा केंब्रिज डिक्शनरीतला अर्थ ' एखाद्या गोष्टीवर,शब्दावर रेघ मारणे ' असा दिलाय.आपण कधीकधी रेघ मारायलाच विसरतो.मग आयुष्याच्या सुंदर वहीचे रफ बुक होऊन जाते.वेळीच रेघ मारा,हटवा.
खरं तर आपल्या हटण्याने काहीच फारसा फरक पडत नाही.ना त्या ग्रुपला ना व्यक्तिंना.मग कशाला गुंतत राहायचं,वेळीच अलगद बाहेर पडुन स्वछंदी जगायला काय हरकत आहे.नाहीतरी व्हर्चुअल मैत्री आणि खरी मैत्री यात जमीन अस्मानाचा फरक आहे.तरीही यांत आपण अडकत जातो,आभासी जग हेच खरं जग मानत राहातो.व्यक्त होतो.कधीकधी हे व्यक्त होणं चांगलंच.पण सतत काहीतरी टाकत राहणं,सतत काहीतरी शेअर करणं.वर आलेले मेसेज!व्हिडीओज न बघताच अहमहमिकेने तो मेसेज सगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड करणे हे टाळता येऊ शकते.
आयुष्य छोटंच आहे.आज ना ऊद्या प्रत्येकाला 'डीलीट' व्हावंच लागणार आहे.त्या आधी मनाचा कोपरा जास्तीत जास्त,स्वच्छ,नितळ ,पारदर्शक कसा होईल ते बघणं महत्वाचं. सर्वांकडे बघण्याची 'सम सकल' दृष्टी महत्वाची.चला तर मग मनांतला आणि मोबाईलमधलाही कचरा काढुन टाकु.चार चांगले ग्रुप ठेवु.चार चांगल्या व्यक्तींशी
मैत्री करु.
तुमच्याही मोबाईलमध्ये असतीलच असे काही ग्रुप्स!बघा शोधा.ओझं कमी करा.
बघा!पटतंय का!नाहीतरी माझी पोस्ट सरळ 'डिलीट' करा!
*सौ.पूर्वा लाटकर*
Comments
Post a Comment