निसर्ग

 निसर्गात 'इन्स्टंट'  असं काहीच नसतं.सुर्य त्याच्यावेळेनुसार त्याच दीशेला नियमित ऊगवतो आणि तसाच तो त्या त्या वेळेनुसार पश्चिमेला मावळतो.झाडांना पालवी अगदी अलगद फुटते .कळतही नाही कधी आपल्याला.बघता बघता झाड पानांनी भरुन जातं.कोवळ्या कळ्या हिरव्या आवरणात लपेटुन वाट पाहात रहातात फुलायची.त्याचं ते अगदी कणाकणाने फुलणं प्रत्येक दिवशीचं रुप मनाला भावून जातं.कळी ते फुल बनण्याचा प्रत्येक दिवशीचा प्रवास खुप संयमित असतो.घाई नाही गडबड नाही .तिथे असतो एक ठहराव.वाट पाहाणं .फळं येणं ती परिपक्व होणं त्याचा हंगाम यासाठीही एक नियमितपणा आसे सुसुत्रता आहे.आंब्याच्या झाडाचा मोहोर कधी अनुभवलाय?मोहोर येणं,तो फुलणं,गळुन गेलेल्या फुलांनंतर अगदी बारीक मोहरीच्या दाण्यांसारखी फळं धरणं.ती फळं ,त्यांचा आकार मोठा होणं.कैरीत रुपांतर होणं .कैरी जून झाल्यावर पुन्हा पिवळी पडत आंबा होण्याापर्यंतचा एक मोठा पल्ला आहे.तो त्या त्या वेळेनुसार पार पाडतो.तेथे घिसाडघाई नसते. 

पावसाळ्यात आभाळ काळ्या ढगांनी कितीही ओथंबून आलं तरी 'तो' बरसायचा तेंव्हाच बरसतो.तेंव्हाही त्याच्या वाटेकडे डोळे लावावे लागतातच.

   सगळेच पशु पक्षी.किडामुंगी.बारीकसारिक जीवजंतु या निसर्गनियमाचं तंतोतंत पालन करतात.शिस्तबद्ध पद्धतीने आयुष्य जगतात.पण 'हा' दोन पायांचा माणूस नावाचा प्राणी आहे ना.तो स्वत:ला खुपच 'शहाणा ' समजतो.तो हे असले निसर्गाचे नियम वगैरे पाळत नाही.किंबहुना तो असले काही नियम मानतच नाही.त्याला चक्क पायदळी तुडवतो.आणि मग आपल्या मर्जीनुसार वागतो.बेदरकार,बेछुट वागतो.निसर्गाला मोडु तोडु पाहतो.देवाने एक सुंदर,बहुमोल असं खेळणं त्याच्या हातात दिलं त्याची तो पार वाट लावतो.खिळखीळं करतो.काहीकाळ आसुरी आनंद मिळत असेलही त्याला.पण अगदी थोडावेळच.मग निसर्गही असे काही तडाखे देतो ना त्यातनं सावरायला या माणसाला वेळच मिळत नाही.त्याची सगळी साधनं बळ ,पैसा अपुरी पडतात.

म्हणुन निसर्गाला देवता म्हणा,शक्ति म्हणा!पडद्यामागचा सूत्रधार म्हणा.त्याच्या नियमाच्या चौकटीत राहुन जिवनाचा आनंद घ्या.कारण ....कारण निसर्गात 'इन्स्टंट' असं काहीच नसतं.होय ना!


 🌳🌳🌳  सौ.पुर्वा लाटकर🌳🌳🌳

Comments