जळमटं मनाची

 'जळमटं...मनाची'

      सौ.पुर्वा लाटकर


दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीय.घरांघरात स्वच्छतच,साफसफाईची कामे अगदी शिगेला पोहोचली आहेत.घरातली अडगळ ,रद्दी,जुन्या वस्तु ,भांडी टाकुन द्यायच्या वस्तु.घराबाहेर काढुन टाकायची लगबग.प्रत्येक वस्तुवर एकदा तरी  स्वच्छतेचा हात फिरेल अशी धावपळ चालु आहे.आढ्याला लागलेली जळमटं,फॅनवर  बोट बोट साठलेली धुळ साफ करायचीय. स्वयंपाकघरात तर चिकट,ओशट डाग टाईल्स ओटा  घासुन पुसुन स्वच्छ करायचा.असंख्य भांडी ,ऊपकरणी घासुन धुवायची कितीतरी कामे घरोघरी चालु आहेत.

 अशांतच हात चालवता चालवता मनांत आलं.ही घराची जशी स्वच्छता करतो आहोत तशीच मनाचीही करायला हवी .कित्येक वर्षांपूर्विची अडगळ मनाच्या माळ्यावर साठवलेली असते.कित्येक जखमा,शल्य,बोचरे ,टोकदार शब्द तळाशी साठवलेले असतात.कितीक अपमान,काही प्रसंग ,वैर यांची जपणूक केलेली असते.एखाद्याने दिलेली वागणूक दिर्घ काळ स्मरणाच्या गाठोड्यात साठवलेली असते.आणि ही सगळी ओझी,नकारात्मकता,मलिनता आपल्या मनांवर ह्रदयांवर आपल्या सबकाॅन्शस माईंडमध्ये साठवलेली असते.याला काढुन टाकणे खुप गरजेचे असते.तेच ते नको असलेले प्रसंग अाठवुन काहीच साध्य होत नाही.एखादा असा का वागला?हे माझ्याबाबतीतच का घडलं असं वारंवार मनांत घोकुन काहीच पदरी पडत नाही.ऊलट त्या आठवणी,प्रसंग अजुनच घट्ट  आणि गडद होत जातात.

 गेली काही वर्षे पुण्यात असतांना एक मेडीटेशनचा कोर्स केला'हार्टफुलनेस' असं त्या मेडीटेशनचं नाव आहे.त्या पद्धतीने ध्यान करतांना 'क्लिनिंग प्रोसेस 'असते ,त्यात तुम्ही तुमच्या ह्रदयांवर जमा झालेली नकारात्मकता ,मलिनता काढुन टाकायची असते.रोजच्या रोज आपण फर्निचर पुसलं तरी त्यावरही धूळ साचतेच ना,तसंच रोजच्या घडणाय्रा प्रसंगाचं,आलेल्या अनुभवांचं एखाद्या वाईट घटनेचं कसं 'क्लिनिंग' करायचं हे शिकवले जाते.आणि हे झाल्यावरच ध्यानाच्या पुढच्या पायय्रा गाठता येतात.

    तसंच दिवाळीत आपण घराची जळमटं काढुन टाकतो तशीच मनाचीही काढावीत.जुनी ओझी जाणून काढुन टाकावीत.बोचरे कंगोरे घासुन गुळगुळीत करावेत.भांड्यासारखीच मनंही लख्ख ऊजळावीत.बारीक सारीक सगळी स्वच्छता करावी.मन बघा कसं 'ऊडु ऊडु झालंय' वाटु लागेल.अशा स्वच्छ  झालेल्या मनांच्या समईत स्नेहाचे तेल हळुवार घालावे .मग बघा कशी दिवाळी प्रसन्नता आणेल.आनंद आणेल.

सारं काही लखलखुन निघेल.झळाळुन निघेल.मनांच्या गाभाय्रातुन हलकेच एक लकेर बाहेर पडेल.

'दिवे लागले रे दिवे लागले'

तमाच्या तळाशी दिवे लागले'🪔🪔🪔🪔

Comments