*गुरुपौर्णिमा*


आज गुरुपौर्णिमा!गुरुंबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस!त्यांच्याप्रती कृतज्ञता दर्शविण्याचा दिवस!आज त्यांच्यासाठी काही करण्याचा ,देण्याचा दिवस! अनेकांना विविध क्षेत्रातील गुरु मिळतात!अअध्यात्मिक क्षेत्रात तर शेकडो गुरु आहेत.प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या परीने गुरु करतात.काहीजणांना ग्रंथ हेच गुरु वाटतात तर काही या भवतालातुन शिकत असतात.मला मात्र हा निसर्गच मोठा गुरु वाटतो.

           आपल्या अवतीभोवती जो निसर्ग असतो तोच  खरा गुरु!सदैव तो आपल्याला काहीतरी देत असतो.आता हेच पाहा ना पडणाय्रा प्रत्येक पावसाचा थेंब किती समर्पित भावनेने कोसळतो.त्याला कुठे पडावं हे माहित नसतं.पण त्या प्रत्येक पडणाय्रा थेंबांचा आपण ऊपयुक्त वापर केला तर समतोल राहिल.

     शांत सरोवर,खळाळणारे झरे,वाहत्या नद्या,सागराची गाज,भरती ओहोटी आपलं मन शांतवतं.त्याच्या सानिध्यात आपले ताणतणाव निवळतात.ती निशब्द शांतता खुप काही शिकवत जाते.आयुष्यातले चढ ऊतार भरती ओहोटी बघुन हे चक्र असंच चालु राहणार.आपण स्थिर रहायचं हे सांगतात.

           ऊगवतीचा दरदीवशीचा सूर्य  नेमाने येतो.येतांना त्याच्या सहस्ररश्मी किरणांनी जीवन तेजस्वी करतो.त्या क्षणी आपलंही मन  सकारात्मतेने ऊजळुन जाते.मनातला अंधार लोप पावतो.येणाय्रा दिवसासाठी स्फुर्ती मिळते.ऊत्साह वाढतो. 

   तीच तेजोमय अवस्था मावळतीच्या किरणांमध्येही जाणवते.त्याचा ऊत्साह तसुभरही कमी झालेला नसतो.त्याची तांबडी केशरी किरणे जातांनाही काही दान पदरात टाकुन जातात.  आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर तुम्ही असा तुमचं आयुष्य सतत भारलेलं असलं पाहिजे असा संदेश देतात.

              एखाद्या दिवशी मिट्ट काळोखात भरगच्च चांदण्यांनी भरलेलं आभाळ कधी न्याहाळलंय? त्या इवल्याश्या लुकलुकणाय्रा तारका आपल्याच प्रकाशात किती छान चमकत असतात.एका एका चांदणींचं स्वत:चं जग असतं.भोवती कितीही काळोख असु देत आपल्या इवल्याश्या तेजाने तो अंधार दूर करण्याचा प्रयत्न करतात.किती शिकण्यासारखं आहे ना त्यांच्याकडुन!नाहीतर आपण माणसे छोट्या छोट्या गोष्टीत नाराज होतो.खट्टु होतो.अंधारापलिकडेही काहीतरी चांगलं आहे हे बघतच नाही.

         त्याच आकाशात पूर्णाकृती चंद्रमाही असतो.किती शितल ,शांत,अविचल.आपल्यालाही त्याच्या किरणांनी न्हाऊ घालतो.शांतवतो.तो तेजस्वीपण तितकाच आहे.पण त्याचं तेज हवहवंसं वाटणारं आहे.त्याच्या प्रतिंबाकडे पाहात असतांना मनही तेजाळतं,अवतीभोवती असलेल्यांना आपल्या अस्तित्वाने त्यांच्या जीवनातले कलह कसे शांतवायचे हे शिकवतं!

 दूरवरचे निळे डोंगर अविचल,न डगमगणारे.वारा,पाऊस,ऊन,वादळे झेलत स्थिर ऊभे असतात.आपणही त्यांच्यासारखंच धिरोदात्तपणे आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायला शिकलं पाहिजे.

     मातीच्या कुशीत पहुडलेलं बी मातीला रेटुनच वर ऊगवतं.आणि तिथुनच त्याचा संघर्ष चालु होतो.जणु आईच्या गर्भातुनच हे लढण्याचं सामर्थ्य घेऊन येतं.निसर्गचक्रानुसार ते वाढतं,फुलतं,फळतं .त्याचंच बीज तयार होतं ,पुन्हा ते मातीत पडतं.आपलंही आयुष्य असंच निसर्ग क्रमानेच चालु असतं.पण माणसं त्यात अडथळा अाणतात आणि निसर्गचक्रच ऊलटं पालटं करुन टाकतात.निसर्गानुसार चाला,त्याचे नियम पाळा तर आयुष्य विस्कटणार नाही.

   गळणारं झाडावरचं प्रत्येक पान अगदी हळुवार,हलके गळुन पडतं सहजपणे .ते झाड ते गळणं स्विकारतही.असंच आपणही आपलं पिकणं,गळणं स्विकारायला हवं सहजपणे.आपलं असं काहिच नाही इथे.निर्विकारपणे कशाचंही दु:ख न करता ,कोणतेही क्लेश न करता मातीत मिसळुन जाणं स्विकारायला हवं !

       .....आणि मातीत मिसळता मिसळता पुन्हा नव्याने ऊबदार कुशीत जन्म घेण्याची आस पण ठेवायला हवी.  

   निसर्ग हा असा असतो जन्मापासून मृत्युपर्यंत !सतत सोबत !कधी धीर देतो,कधी शिकवतो,कधी धडा शिकवतो तर कधी कानशिलात पण लगावतो.तोच मोठा गुरु! 

    त्याच्याप्रती अत्यंत प्रेम,सदभावना आहेत.त्याला शत शत नमन!

        *सौ.पुर्वा लाटकर पुणे*

           *१३जुलै २०२२*

             *गुरुपौर्णीमा*


Comments