........*आणि कळ्यांची फुले जाहली*

  

   काल संध्याकाळी फिरुन येतांना.बागेतल्या कुंपणावरच्या वेलीवरील काही हाताशी येत असलेल्या कळ्या सहज खुडल्या.आल्यावर एका बाऊल मध्ये ठेऊन दील्या.देवाला दीवाबत्ती केली.नेहमीप्रमाणे रामरक्षा,मारुतीस्तोत्र म्हंटले,जप केला.त्यानंतर स्वयंपाकाला लागले.स्वयंपाक झाल्यावर जरा विसावले.तेव्हढ्यात मंद दरवळ आला.हा रोजच्या अगरबत्तीचा सुवास नव्हे.कोठुन येतोय दरवळ?ऊठुन पाहिले असता मघाशी आणलेल्या चमेलीच्या काही कळ्या टपटपीत,पांढय्राशुभ्र,ताज्या फुलांमध्ये रुपांतरीत झाल्या होत्या.आणि त्याचाच  मंद गोड!दरवळ घरभर  पसरला होता.फुले ओंजळीत घेऊन त्याचा गंध भरुन घेतला.खुप ताजतवानं वाटलं! मन प्रसन्न झालं.मनावरचा किंचीत असलेला ताणही कुठल्याकुठे पळून गेला. क्षणार्धात तो गंध आठवणींच्या लडी ऊलगडत मला बालपणात घेऊन गेला.आणि नजरेसमोर दिसला नागपूरचा भलामोठा ब्रिटीशकालीन बंगला,ते कौलारु लालचुटुक छप्पर.ऊंच छत.मोठमोठ्या खोल्या.समोर भलेमोठे अंगण,त्यातली फळझाडे,फुलझाडे.मागील परसदार पण तेवढेच मोठे.पाण्याने गच्च भरलेला हौद.भांडी घासण्यासाठी मोठा वर्‍हांडा.आणि तिथल्याच एका खोलीच्या खिडकीलगत असलेली ,पसरलेली हिरवीगार चमेलीची वेल.असंख्य कळ्यांनी ती वेल बहरुन जाई.शाळेतुन घरी आल्यावर ,हातपाय धुतले की पावले आपोआप वेलीकडे वळत.हाताशी येतील तितक्या कळ्या फ्रॉकच्या ओच्यात गोळा करायच्या.वेल वाकवुन,वाकवुन कळ्या तोडायच्या.या धांदलीत काही फांद्या तुटुन हातात यायच्या.

      त्या सगळ्या कळ्या मग एकत्र ठेवुन मोठमोठे गजरे गुंफायचे.खराब होऊ नयेत म्हणुन ओल्या रुमालात गुंडाळुन माठाजवळ ठेवुन द्यायचे.सकाळी त्या सगळ्या कळ्या पूर्णपणे ऊमललेल्या असायच्या.घमघमाट पसरायचा.ते गजरे शाळेत जातांना दोन वेण्यावरच्या एका वेणीत घालायचा.त्यावेळी वेणी जाड की घातलेला गजरा!असा प्रश्न पडायचा. खरोखर खुप गंधभरले,मंतरलेले दिवस होते ते.

        या ओंजळभर कळ्या मला माझ्या बालपणात घेऊन गेल्या.कळ्यांनी माझ्याही मनाच्या पाकळ्या ऊमलल्या.माझ्याही नकळत!

     *सौ.पुर्वा लाटकर२०जुलै२०२२*

Comments