*माती,माय आणि लेकरु*


        एखाद्या शॉर्टफिल्मला शोभेल असं वातावरण आणि अगदी मातीशी नाळ जोडेल अशी यातली पात्रं!खरंतर गेले कित्त्येक दिवस मी अनुभवतेय,निरीक्षण करतेय ,आज थोडं शब्दांत मांडायचा प्रयत्न करतेय

       आजुबाजुला टोलेजंग अशा वीस मजली ,तीस मजली इमारती.बाजुने रात्रंदिवस सुसाट वाहणारा हायवे.वाहनांचे कर्णकर्कश्य भोंगे,निर्माणाधीन इमारतींच्या बांधकामाचा कोलाहल,मशिन्सचा आवाज.या सगळ्या पार्श्वभूमिला छेद देणारे जमीनीचा,शेतजमीनीचे काही चौकोन,त्रिकोण.निगुतीने जपलेले.बिल्डरांच्या घशात जाऊ न देता पारंपारिक शेती करणारा मुठभर शेतकरी.

    अशाच एका जमिनिच्या तुकड्यावर एक कुटुंब राहतेय.शेतातच बांधलेले एक कच्चे घर,वर पत्रा टाकुन,प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेला.आडव्या दोन तीन खोल्या.आजुबाजुला आंब्याची वीस पंचवीस झाडे,नारळाची झाडे आणि सध्या मोकळी असलेली जागा.या जागेवर पावसाने अनेक प्रकारचे तण,गवत ऊगवलेले दिसते.

  दारात आंब्याच्या बुंध्याला बांधलेली गाय ही एकच जमेची बाजु दिसतेय.जमेची यासाठी की या घरात वीज नाही,पाणी नाही,गॅसही नसावा.कारण या सगळ्यात वावरणारी जी 'माय' आहे ना ती तीथेच पडवीत चार दगड मांडुन,काटेकुटे वाळलेल्या फांद्या यावर रांधतांना दिसते.रोज सकाळी आणि संध्याकाळी केशरी ज्वाळा धूर ओकत असतात.अंधारात तर त्या फारच ऊठुन दिसतात.

        तर गोष्ट आहे मायलेकरांची.माय अंगावर भडक गुलाबी,केशरी साडी ल्यालेली,काळीसावळी,शेलाटी तीशीपस्तिशिची असावी.तीचं लेकरु तीन चार वर्षाचं.सतत तिच्यामागे धावणारं.ती फांद्या तोडायला जातांना,पाणी लांबुन हंड्यातुन आणतांना,ती रांधतांना,आंब्याची खाली भांडी घासतांना ते आईला चिकटलेलं असतं.क्वचीत एखाद्या निवांत दुपारी लेकरु झोपलेलं असेल तेंव्हा माय एकटी असे.

   या दोघांचं जग इतकं सिमीत आहे ना,कधी त्या हायवेपर्यंत पण ती जात नाही.एकुलत्या एक शेतघराजवळ कोणीही फिरकत नाही.ती कधी कोणाशी बोलली ते ही दिसत नाही.नाही म्हणायला एक पायजमा ,बनीयन,टोपी घातलेला वयस्कर माणूस गायीला चरायला घेऊन जाई.बहुधा तीचे सासरे असावेत.

       संपूर्ण फ्रेम मध्ये मायलेकरं ऊघड्या निळ्या आभाळाखाली मनसोक्त बागडतांना दिसतात.पावसांत भिजतांना दिसतात.साठलेल्या पाण्यात ऊड्या मारणारं लेकरु आणि काहीही न बोलता त्याच्या खेळाकडे पाहणारी माय दिसते.कधी तीथलीच काठी घेऊन पाण्यातुन भूर्रर्र करत आवाज करत खेळ चालू असतो.तरी कधी रानातल्या गवतात चटई टाकुन मायलेकरं बसलेले असतात.कधी शेतातुन एखादी भाजी आणतांना माय दिसायची.

      शहरांत राहुनही प्रगतीचा,तिथल्या कुठल्याही सुविधांचा लाभ यांना मिळतांना दिसत नाही.शेतातुन हाय टेन्शन वायर असुनही वीज नाही.नळाची जोडणी असूनही पाणी नाही.सगळ्या अभावांवर मात करत दोघे छान ,आनंदी जगतांना दिसतात.यांचं जगच निराळं.निसर्गाशी संवाद साधु पाहणारं ,पक्षांच्या किलबिलाटात जागं होणारं.सूर्य मावळल्यावर अंधारात गूडुप झोपणारं.लख्ख सूर्यप्रकाशात वावरणारं,पावसात भिजणारं.अनवाणी हिंडता हिंडता मातीशी सलगी साधणारं

    असं  हे जग,ती माय लेकरं आणि त्यांच मनमुक्त वावर .हे सारं टिपायला कॅमेराच हवा.मी शब्दचित्र रेखाटलंय.बघा आवडतंय का मायलेकराचं वेगळंच भावविश्व!

       *सौ.पुर्वा लाटकर पुणे*

Comments