*अॉनलाईन बीनलाईन*
*सौ.पूर्वा लाटकर*२३.९.२०२२*
पूर्वी पैशाने गच्च भरलेलं पाकीट किंवा जडभारी पर्स हे वैभवाचे,समृद्धीचे किंवा श्रीमंतीचे लक्षण समजले जाई.गलेलठ्ठ नोटांनी भरलेलं पाकीट खीशातुन काढतांना त्याचा ऊर अभिमानाने भरुन यायचा.आजुबाजुचे लोकही मोठ्या विस्मयाने ते बघत राहायची!हाय ...पण गेले ते दिवस आणि तो जमानाही.
नोटबंदी झाल्यापासुन सगळंच कसं अॉनलाईन झालंय.सगळीकडे ..जिथे पाहु तिकडे फक्त डीजीटल पेमेंट,कार्ड पेमेंट ,मनी ट्रान्सफर आढळतात. भाजी,दळण,किराणा,दुध,वडापाव ,हॉटेल रेस्टॉरंट असो किंवा सोन्याचांदीपासुन ते फर्निचर ,इलेक्ट्रॉनिक वस्तु असो सगळ्यासाठीच हीच पद्धत वापरली जातेय.लोकांच्याही ती इतकी अंगवळणी पडली आहे ना की हल्ली रोख रक्कम कोणी जवळ बाळगतच नाही.विशेषत: तरुण पिढी.खीशात एखादं ATM कार्ड आणि बँकेत पुरेसे पैसे असणं एवढंच गरजेचं आहे.
माझी एक तरुण शेजारीण सांगत होती ...'काकु अहो हल्ली ATM मध्ये मी जातच नाही ,सगळंच अॉनलाईन पेमेंट करते.त्यामुळे पैसे काढणं,खरेदी करणं,घरात पैसे अाणुन ठेवणं मी विसरुनच गेलेय.'मला तीच्या या वाक्याचे जरा आश्चर्यच वाटले.असो.
पण काहीवेळा हीच सवय कशी गोत्यात आणु शकते याचं एक ऊदाहरण नुकतंच अनुभवलंय म्हणुन हा पोस्ट प्रपंच!
झालं असं की एका शनिवारी पुण्याच्या PMPML ने प्रवास करत होते.बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.अशातच एका मधल्या स्टॉपवर एक अकरावी बारावीत शिकत असलेला.किडकीडीत,चष्मा घातलेला मुलगा घाईघाईत बस मध्ये चढला.तो चढल्याबरोबर बस वेगातच पुढे निघाली.त्याने कंडक्टरकडे बसचा पूर्ण दिवसाचा पन्नास रुपयाचा पास मागीतला.जो कोणत्याही बसला,कुठुनही,कुठेही जातांना चालतो.कंडक्टरने पास दीला.त्यावर त्याने ''अॉनलाईन पेमेंट चालतं ना!' त्यावर कंडक्टरने नकारार्थी मान हलवली.मुलाला पहिला धक्का बसला त्याच्याजवळ अजिबातच पैसे नव्हते.त्याने मोबाईल काढुन पलीकडल्या व्यक्तिला रागवायला सुरवात केली.बहुधा त्याची बहीण किंवा मैत्रिण असावी.त्याच्या गोय्रापान कपाळावरची शीर रागाने ताडताड ऊडत होती.ज्या ओव्हर कॉन्फीडन्स मध्ये जो बसमध्ये चढला होता तो गळुन पडला.एक केवीलवाणा,गरीब,बिच्चारा भाव त्याच्या चेहय्रावर आला होता.दिसायला तो चांगल्या घरातला वाटत होता.शेवटी संतापुन त्याने फोन कट केला.आता त्याला वास्तवाचे भान आले होते.आजुबाजुच्या प्रवांशाकडे त्याने पन्नास रुपये मागायला सुरवात केली.काहींनी नकार दीला.शेवटी एक पंजाबी मध्यमवयीन काकुंना त्याची दया आली.'ये लो बेटा पचास रुपये 'असं म्हणत त्याला पन्नासची नोट दीली.त्याने ती कंडक्टरला दीली .त्याचा व्यवहार पूर्ण झाला.आता काकुंचे पैसे ट्रान्सफर तो करायचा प्रयत्न करु लागला..मोबाईलवरुन.पण ते काही सक्सेस होत नव्हतं.त्याच्या सुदैवाने पुढच्याच बसस्टॅापवर त्याचा वर्गमित्र भेटला.तो भेटल्यावर त्याच्या जरा जीवातजीव आला.तो त्याला विचारु लागला!'अरे तुझ्याकडे कॅश आहे का थोडी ?मला या आंटींचे पैसे द्यायचेत.'त्याच्याही खीशात पन्नास रुपये नव्हतेच पण दहा वीसची नोट आणि चिल्लर असे काही पैसे त्याने काकुंना परत दीले.बाकीचे पाठवेन नंतर असंही तो म्हणाला.आता मित्राशी त्याच्या गप्पा चालु झाल्या.त्या गप्पांतुन असं ऊलगडलं की नेहमी कार,बाईकने तो प्रवास करायचा.आज पाऊस असल्याने अचानकच एकेठीकाणी जावे लागत असल्याने बसने निघालो.त्यात बसमध्ये अॉनलाईन पेमेंट चालतं अशी कोणीतरी चुकीची माहीती त्याला दीली.त्याचा राग आता काहीसा निवळला होता.सधन ,चांगल्या घरातल्या मुलाला फक्त पन्नास रुपयांसाठी अनोळखी लोकांपुढे नाईलाजाने हात पसरावा लागला .त्यावेळी त्याची ती लाजीरवाणी अवस्था त्याला स्वत:ला पाहावत नव्हती,तसेच इतरांनाही पाहावत नव्हती.
या अॉनलाईनचे काही फायदे तसेच काही तोटे.वरील प्रसंग पाहतांना वाटले तुमच्याकडे कार्डमध्ये कितिही पैसे असो.पण स्वत:सोबत काही रोखरक्कम बाळगणं गरजेचे आहे.न जाणो वरील प्रसंग कोणावरही ओढवु शकतो.
......आणि कालच वर्तमानपत्रात बातमी वाचली.सध्या खीसेकापु,पाकीटमारीच्या गुन्ह्यांची संख्या जवळ जवळ शुन्यावर आलीय.हल्ली पाकीटात पैसेच ठेवत नाही ना कोणी!
मंडळी काय वाटतं तुम्हांला!मांडा तुमची मतं!व्यक्त व्हा.कदाचित एखादा सुवर्णमार्ग,मधलामार्ग सापडेलही यातुन.
Comments
Post a Comment