*(अलिबाग ते अॅमस्टरडॅम पूर्वार्ध 2)*

        


व्हिसा मिळायला तिन आठवडे लागणार होते.त्यामुळे परत पुण्याला गेलो.

   10मार्चच्या सुमारास व्हिसा येणार असल्याचा मेसेज आला.ज्या व्हिसाची आम्ही ऊत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघत होतो ,त्याचं कुरीयर दरवाजाबाहेर लावलेल्या दुधाच्या पिशवीत तीन पाकीटं टाकुन कुरीयरवाला कधीच गेला होता.एवढे महत्वाचे डॉक्युमेंट हातात न देता दुधाच्या पिशवीत टाकले या हलगर्जीपणाचा राग आला! असो.व्हिसा स्टँप मारुन पासपोर्ट हातात पडले.आता पुढची तयारी.

   आमची फ्लाईट 3एप्रीलची होती मध्यरात्रीची!

    म्हणतात ना  'संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासुन तयारी' या ऊक्तिप्रमाणे ,बॅगांची खरेदी करण्यापासुन शुभारंभ करायचा होता.कारण आमच्या बॅगा अलिबाग— पुणे एवढ्या प्रवासासाठी लागणाय्रा होत्या

   पुण्यातच खरेदीचा धुमधडाका चालु झाला.चेक ईनच्या तीन मोठ्या बॅग्ज,केबीन बॅग्ज,पासपोर्टसाठी खास पाऊच,शुज,गाॉगल्स,कपडे,स्वेटर,जॅकेटस .काही वस्तु अॉनलाईन मागवल्या.

  गुढीपाडव्याच्या आधी  पुण्यातलं घर आवरुन परत अलिबागला आलो.

आता इथेही माझी वेगळीच धावपळ सुरु झाली.चटण्या ,पापड, थालपीठभाजणी,चकलीची भाजणी,मेतकुटं.चिवडे.नारळाच्या वड्या.

   अलिबागचे खास पोहे,राजपुरोहितचं फरसाण,शेव,मिरगुडं. लेकजावयासाठी गिफ्टस .बॅगा भरत चालल्या होत्या.वजनाची धाकधुक ह्रदयाचे ठोके वाढवत चालली होती.त्यासाठी घरीच वजनकाट्याची पण खरेदी झाली.अशा धावपळीत येणारे फोन,प्रत्येकाच्या शुभेच्छा,सुचना घेत होतो.

   आणि शेवटी 3एप्रील संध्याकाळी ६वाजता  ६बॅगा,पर्स,लॅपटॉप बॅग्ज (मुलाचे दोन लॅपटॉप होते अॉफीससाठी लागणारे) अलिबागवरुन मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी निघालो.फ्लाईट मध्यरात्री दोनची होती.पण सगळाच अनुभव पहिल्यांदाच असल्याने वेळ हाताशी ठेवुनच निघालो.रात्री बरोबर दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  हवाई अड्ड्यावर पोहोचलो.  (बाकी ऊद्याच्या लेखात)

   *सौ.पुर्वा लाटकर*अॅमस्टरडॅम (पहाटेचे पाच वाजलेत इकडे)*

Comments