*अलिबाग ते अॅमस्टरडॅम    पुर्वार्ध अंतिम भाग)* 3


 आमची फ्लाईट KLM 878 ही डच कंपनीची होती.मुंबई अँमस्टरडॅम डायरेक्ट फ्लाईट साडेनऊ तासाची होती.

      विमानतळात शिरलो.खरंतर काऊंटर्स तीन तास आधी सुरु होतात असं कळलं.पण सहज म्हणुन मुलाने चौकशी केली असता काऊंटर सुरु होते.रांगेत पुढे पाचसहा जणच होते.आमच्या मोठ्या बॅगा व्यवस्थित वजनात भरल्या.त्या चेकइन झाल्या!त्याचबरोबर आमच्या दोघांच्याही केबिन बॅग्ज तिथल्या अॉफिसरने फ्री मध्ये पाठवतो.कशाला ओझं कॅरी करताय असे म्हणत त्याही चेकइन केल्या!हुश्श!वजनात बॅगा बसल्या आणि हातातलं आणि मनावरचं ओझं गेल्याने पिसासारखं हलकं वाटु लागलं! बोर्डींग पास आणि पासपोर्ट हातात आले.आता जवळ फक्त मुलाची लॅपटॉप बॅग,माझी खांद्यावरची पर्स त्यात एक लॅपटॉप ठेवला होता.आणि अगदी सोबत असाावी म्हणुन एकच केबिन बॅग एवढंच सामान ऊरलं

  पुढे सिक्युरीटी चेकच्या काऊंटरला गेलो.तिथेही अजिबातच गर्दी नव्हती!ते दिव्य पण विनासायास पार पडलं.

 पुढचं काऊंटर इमिग्रेशन तिथेही कोणतेही प्रश्न न विचारता फॉर्म भरुन घेण्यातआला.तिथुनही पटकन सुटका झाली.

 गेट नंबर 73 ला आमचे फ्लाईट लागणार होते.ही सगळी प्रक्रीया केवळ अवघ्या तासाभरातच आटपली .अकरा वाजले होते.गेटजवळ येऊन थांबलो होतो.आता प्रतिक्षा होती फक्त विमानात आत जाण्याची!

  तिन तास वेळ होता!थोडंफार खाऊन ,कॉफी घेऊन आम्ही तिथेच प्रतिक्षा करत बसलो.

  विमातळावरचे तीन तास असा निबंध लिहायला सांगीतला असता तर माझा पहिला नंबर नक्कीच आला असता.मोठमोठी विमानं सुटत होती.ती अगदी जवळुन बघायला मिळाली.

 टॉयलेटमध्ये जाण्यासाठी मी आत शिरत होते.तेवढ्यात एक कर्मचारी व्हिलचेअर ढकलत घेऊन आला.त्यावर  चक्क अनुराधा पौडवाल होत्या.व्हिलचेअरवरुन ऊतरुन त्याही टॉयलेटमध्ये शिरल्या!तोच गोरापान लख्ख वर्ण,लांबसडक  मोकळे सोडलेले केस.सिल्कची साडी!हातात पर्स!चेहय्रावर तोच तेजस्वीपणा जो स्क्रीनवर बघायला मिळतो.मी एकदोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला.पण त्या काही विशेष बोलल्या नाहीत.लंडनला कॉन्सर्टसाठी चालल्याचं कळलं.

  बरोबर दीडवाजता आमच्या विमानाचं काऊंटर सुरु झालं.आधी व्हिलचेअरवरचे वृद्ध,नंतर साठीच्या आसपासचे वृद्ध,लहानमुले,बिझनेसक्लासची मंडळी,इतर शहरातुन कनेक्टींग फ्लाईसाठी आलेले प्रवासी असे करत आत सोडण्यात येत होते.विमान भरत चालले होते.शेवटी आमचा नंबर लागला!आणि विमानात शिरुन ,सिट शोधुन स्थानापन्न झालो.

    काही वेळातच विमानाचं इंजीन धडधडु लागलं.रनवेवरुन पळत स्मुथली टेक अॉफ घेतलं.रनवेवरचे चमचमणारे लाईट आणि मध्यरात्रीची लखलखती मुंबई बघतच प्रवास सुरु झाला.

  आता साडेनऊ तासाची निश्चिंती होती.गेल्या दोनतीन महिन्यातली धावपळ बसल्या बसल्या सहज नजरेसमोरुन तरळुन गेली.झोपायचा प्रयत्न केला पण झोप लागणं शक्य नव्हतं.डोळे मिटुन पडुन राहीले!

   

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम पहाटे पाच  !तापमान 2॰ सेल्सियस)*

Comments