*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 4)*

    


आमचा सगळा फ्लाईट क्रु डच होता!पायलटपासुन सगळेच! विमान 35हजार फुट ऊंचीवरुन ऊडत होते.साडेनऊ हजार किलोमीटरचा लांबचा पल्ला त्याला गाठायचा होता.

     विमानात फ्लाईटमध्ये बसल्यानंतर आणि ऊतरण्याच्या आधी दोनदा हलका नाष्टा देण्यात आला.त्याचबरोबर चहा,कॉफी,ज्युस,पाण्याच्या बाटल्या पण देण्यात आल्या.थंडीसाठी शाली आणि इयरफोन पुरवण्यात आले होते.

डच हवाई सुंदय्रा म्हणण्यापेक्षा सेविका म्हणणे अधिक ऊचित ठरेल.कारण प्रत्येकाच्या सीटजवळ जाऊन हलक्या आवाजात,हसतमुख चेहय्राने अभिवादन करत त्या हे सगळं देत होत्या.बय्राच सेविकांची वयं चाळीसच्यावर असावीत.पण इतक्या नम्रतेने आणि आनंदाने,चटपटीतपणे त्या त्यांची कामे पार पाडत होत्या.नंतर रिकाम्या डीशेस ,ग्लास घेऊन जात होत्या.

दुसय्रा दिवशी सकाळी आठच्या सुमारास गच्च ढगांतुन हळुहळु विमान खालीखाली येऊ लागले.आता विरळ ढगांमधुन खालची ऊतरत्या छपरांची घरे,असंख्य कालवे,हिरवीगार शेते,रस्ते!त्यावरुन धावणाय्रा कार्सचे दर्शन झाले.नेदरलँडच्या भुमीचे हे पहिले रूप पहात असतांनाच विमान धावपट्टीवरुन धावू लागले.काही वेळातच सफाईदरपणे वळण घेत विमान स्थिरावले.दूरच्या विमानतळावर  मोठ्या अक्षरांत नांव दिसले!Schipol !होय शिपोल,स्किफॉल,अॅमस्टरडॅम एअरपोर्ट अशी वेगवेगळी नावे आहेत.

  सिट वरुन दरवाजाकडे चालत जातांना  जे दृष्य नजरेस पडले याने मात्र एक भारतीय म्हणुन माझी मान शरमेने खाली झुकली.संपूर्ण त्या भागाला कचराकुंडीचे स्वरुप आले होते.खाल्लेल्या रिकाम्या प्लेटस,कागदी ग्लास,प्लास्टीकबॉटल्स,लेजची पाकीटे,प्लास्टीकच्या पिशव्या,शाली ,सगळं प्रत्येकसिटखाली अस्ताव्यस्त भिरकावुन दिलं होतं.शाली सीटखाली लोळण घेत होत्या.तुडवल्या जात होत्या.आरडओरडा,धक्काबुक्की करत प्रत्येकजण ऊतरायची घाई करत होता.यातले सगळेच भारतीय एका ऊच्च आर्थिक स्तरांतुन आलेले,ऊच्च शिक्षीत होते.एकदोन प्रवासी परदेशी होते.ते शांतपणे हा मासळीबाजार बघत सीटवर बसुन होते.खरंतर विमानाच्या मागच्या भागात डस्टबीन्स होते.सेविकापण तत्परतेने सगळे नेत होत्या तरीही इतका कचरा!

     विमानांतुन ऊतरतांना त्याच डच सेविका हसतमुखाने अभिवादन करत निरोप देत होत्या.मला मात्र एक भारतीय म्हणुन त्यांच्या नजरेला नजर देणं जड गेलं. 

  पुन्हा एकदा इमिग्रेशन काऊंटरवर आलो.आम्ही तिघेही एकत्र असल्याने आणि मुलीकडे आलोय म्हंटल्यावर फारशी चौकशी न होता पटकन सुटका झाली.पट्ट्यांवरुन फिरत सगळ्या बॅगादेखील पंधरावीस मिनिटात हातात आल्या.बॅग्ज ट्रॉलीवर टाकुन एअरपोर्टच्या आवारातच लेकजावयाची वाट पाहु लागलो.थोड्याच वेळात दोघेही आले.आमच्या बॅगा आणि आम्ही कारमध्ये मावणं शक्य नव्हतं म्हणुन मोठी टॅक्सी केली.पंधरावीस मिनिटातच लेकीच्या घरी पोहोचलो.एवढ्या कमी अंतरासाठी टॅक्सिचे भाडे झाले होते,साडेसहा हजार!🤔

      

*सौ.पुर्वा लाटकर,अँटवर्प,बेल्जीयम,पहाटे पाच)*

Comments