*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 6*


   कोणताही देश,शहर ,गाव जाणुन घ्यायचं असेल तर तिथल्या सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे सोयीचे पडते.तिथली व्यवस्था,लोक,भाषा,पेहराव यांची जाण येते. म्हणुनच इथे फिरतांना या सार्वजनिक वाहतुकीने फिरण्याचा निर्णय घेतला.

  आज जाणुन घेऊ इथल्या बस सेवेबद्दल!घराजवळ पाच,सात मिनिटाच्या अंतरावर बस स्टॉप आहे!संपुर्ण पारदर्शक काचेचा बसस्टॉप दोन्ही बाजुनेकाचा,वरुन काचेचं छत! समोरुन ओपन असलेला.बसस्टॉपच्या बाजुच्या खांबावर इलेक्ट्रॉनीक बोर्ड.त्यावर बस कोठे जाणार त्याचे नाव.बस किती मिनटात येणार ती वेळ आणि बसचा नंबर लिहिलेला असतो.आपल्याकडे असणाय्रा व्यवस्थेपेक्षा अगदी ऊलट व्यवस्था आहे.बस डाव्या बाजुने येतात.समोरच्या बोर्डवर वेळ झाली की अगदी अचुक वेळेला बस येऊन थांबते.लाल रंगाची लांबलचक विजेवर चालणारी बस आवाजही न करता हळुवारपणे येऊन थांबते.इकडे लेफ्ट हँडड्रायव्हिंग आहे.स्वयंचलित  समोरचा दरवाजा ऊघडला जातो.पलिकडे ड्रायव्हिंगसीटवर पायलटसारखा ,टाय,गॉगल लावलेला ,गोरापान दणकट ड्रायव्हर बसलेला असतो. त्याच्यासमोरच दोन स्वाईप मशिन लावलेल्या असतात.लोक शांतपणे आत समोरच्य चढतात.आधी हाय,होई (डचभाषेत)असे म्हणत आपलं बसचं कार्ड स्कॅन करतात.काहींचं मोबाईलवर तिकीट असतं.त्यावरचा QR Code स्कॅन करतात. आणि सिटवर जाऊन बसतात,गर्दी नाही.धक्काबुक्की नाही.बसची वाट पहाणं नाहि.अस्वच्छता नाही.तिकीट घ्या म्हणुन मागे लागणं नाही.सुट्ट्यापैशांवरुन वाद नाही.स्टँडींग जावे लागेल याची काळजी नाही.आहे ना सगळं सुखकर!

   पुढच्या काही सीटस जेष्ठनागरीक ,अपंगांसाठी राखीव असतात.  प्रवासी चढलेले ड्रायव्हरला समोरच दिसतं.स्वयंचलित दरवाजे स्मुथली बंद होते.बस रस्त्यावर धावु लागते.

  बसच्या ड्रायव्हिंगसिटवर बायकाही असतात.पन्नाशीच्या पुढच्याच.त्याही भलीमोठी बस लिलया चालवतात.

  बसमध्ये जागोजागी छताला लहान टिव्ही एवढे स्क्रिन असतात.त्यावरही बसचे नाव नंबर.खालोखाल येणाय्रा बसस्टॉपची नावे .बसस्टॉप किति वाजता येणार ती वेळ लिहीलेलं असतं.त्याबरोबर ती बस चालु असते. या शिवाय बसस्टॉप यायच्या अाधी अनाऊंसमेंट पण होते.प्रत्येक सिटजवळच्या हँडलवर STOP असे लिहिलेले लाल रंगाचे बटण असते.तुमचा स्टॉप यायच्या अाधी ते प्रेस केलं की ड्रायव्हरला कळतं तुम्हांला ऊतरायचे आहे,त्याप्रमाणे बस थांबते.बसच्या मध्यभागी ऊतरण्यासाठीचा दरवाजा असतो.तेथेही मशिनवर ऊतरतांना पुन्हा कार्ड स्वाईप करायचे.बिप आवाज येतो.हे कार्ड ATM कार्डसारखंच असतं.त्यात दर महिन्याला तुम्ही ठराविक रक्कम जमा करायची.प्रत्येक रोजच्या प्रवासानुसार ती रक्कम कमी होत जाते.

    बसची पायय्रा ऊतरतांना चढतांनाची ऊंची अर्धाफुटा एवढीच असते त्यामुळे वृद्ध माणसांना त्रास होत नाही.काही अाया बाबागाडीसकट बसमध्ये चढतात सहजगत्या.मोठमोठ्या प्रवासी बॅगा,सामान   नेतांना त्रास होत नाही.एखाद्या वृद्ध माणसाला सामानासहित चढायचा त्रास होत असेल तर ड्रायव्हर बसमधुन ऊतरुन.विरुद्ध बाजुला येऊन सामान आणि त्या वृद्ध व्यक्तिला बसमध्ये बसवतो.आणि पुन्हा ड्रायव्हिंगसीटवर जाऊन बसतो.

   मोठमोठ्या लांबलचक बसेस.कॅनाल्स,ब्रिज वरुन धावतांना.आजुबाजुचं सौंदर्य न्याहाळतांना आपलं ऊतरायचं ठिकाण केंव्हा येतं कळतही नाही! 

  मंडळी आवडला ना आजचा बसप्रवास!


*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments