अलिबाग ते अॅमस्टरडॅम (पूर्वार्ध)    

       


एका संध्याकळी लेक जरा लटक्या रागानेच म्हणाली!'आई तुझी इच्छा नाहीये का ,माझे घर बघण्याची? नेदरलँडला येण्याची? ' मी म्हंटलं अगं इच्छा तर खुप आहे ,पण सगळं जुळुन यायला हवं!मी आणि तुझे बाबा तर सध्या फ्री आहोत,फक्त प्रश्न आहे तुझ्या भावाचा (म्हणजे मुलाचा)त्याला जर कंपनीने परवानगी दीली तर माझी काहीच हरकत नाही.' 

    ठरल्याप्रमाणे पुढच्याच आठवड्यात परवानगी मिळाली. नेदरलँडमधुन काम करायची.त्यानंतर नेदरलँड सरकारला परवानगीचं पत्र मागवलं.माझ्याकडे तीन पाहुणे येणार आहेत तर परवानगी द्यावी!त्यांनीही ती लगेच दीली.त्यानंतर आधी तिकीट बुक झाले विमानाचे!त्यानंतर व्हीसा अपॉईंटमेंट मिळाली 23फेब्रुवारीची!तिकीटे जानेवारीतच काढली होती.

   एक न संपणारी मोठ्ठी प्रोसेस चालु झाली.आमचे तिघांचे पासपोर्टस त्याच्या प्रत्येक पानाच्या काॅपीज!तिने आम्हांला तिघांनाही नेदरलँडला येण्याचे आमंत्रण पाठवले इमेलवरुन.त्याच्या कॉपिज,तीन महिन्यांचे बँक स्टेटमेंटस,इन्शुरन्स,व्हॅक्सिन सर्टीफिकेटस.लेक,जावयांचे पासपोर्टस,रेसिडेन्शीयल कार्डस,बँक स्टेटमेंटस. व्हिसासाठीचे वेगळे फोटोज!लागतील म्हणुन पॅनकार्ड,आधारकार्ड यांच्या काॉपिज,टॅक्स भरतो त्याचा पुरावा!मारुतीच्या शेपटासारखी यादी रोज वाढतच होती.रोज नवनवीन कागदपत्र जमा होत होती.हे काम एजंटला न देता स्वत:च करयचं ठरवलं होतं त्यामुळे धावपळ होत होती.प्रत्येकाच असा स्वतंत्र गठ्ठा तयार झाला.ती कादपत्रे त्यांच्या यादीनुसार लावून घेतली.भरपुर इतरही कॉपीज घेतल्या.सगळं बाड घेऊन आम्ही व्हिसा अॉफीसला जायला निघालो.दुपारी तीनची अपॉइंटमेंट होती.आम्ही एकलाच पोहोचलो.ऊन रणणत होतं.थोडंसं खाऊन पुन्हा येऊन थांबलो.बरोबर तीन वाजता आम्हांला आत सोडले.दोन काऊंटर होते नॉर्मल आणि प्रिमियम !आम्ही पहिल्यांदाच आलो असल्याने दुसरा चॉईस निवडला.त्याची फी थोडी जास्त होती.पण विना अडथळा काम होईल याची खात्रि होती.पाचव्या मजल्यावर युरोपच्या व्हिसाचं लाऊंज होतं.थोड्याच वेळात आमचं टोकन नंबर पुकारलं गेलं.एकएक करत तिघांच्याही कागदपत्राची छाननी झाली.कागदपत्र परिपूर्ण असल्याने सगळी प्रोसेस सुरळीत पार पडली.बोटांचे ठसे,फोटो घेण्यात आले.निवांत,चहा काॅफी घेत काम चालु होतं.व्हिसा अॉफीसमधल्या चटपटीत,हसतमुख तरुण मुलामुलींची टीम पटापट कामे करत होती.तिथे ठेवलेल्या गुळगुळीत विविध देशांच्या माहितीपर पुस्तकांमध्ये मला शिवाजी सावंतांचं मृत्युंजय दिसलं.हे एकुलतं एक पुस्तक बघण्यापेक्षा याची यादी कशी वाढेल याचा विचार करतच आम्ही बाहेर पडलो.संध्याकाळी सहाला परत.

     


*सौ.पुर्वा लाटकर*

Comments