*अलिबाग ते अॉमस्टरडॅम लेख 10*

   युरोपमध्ये एकुणच सायकल चालविण्याचे प्रमाण प्रचंड आहे.इथे नेदरलँडसमध्ये आल्यापासुन रस्त्यांवर कार्स,बस  आणि सायकल ही वाहने प्रामुख्याने दिसतात.

 अठराव्या शतकापासुनच सायकल चालविण्याची पद्धत होती.पुढे इंगल्डमध्ये लोक सायकल सोडुन कार कडे वळायला लागले.पण त्याचवेळी युरोपमध्ये सायकलसाठी खास रस्ते तयार होऊ लागले.अगदी जाणून बुजुन कार्सकडे त्यांनी पाठ वळवली.पुढे 1970 पासुन सायकल चालवणे खुप मोठ्या प्रमाणात सुरु झाले.

वय वर्षे तीन ते नव्वद या वयोगटातले  लोक सायकल चालवतांना दिसतात.स्रिया आणि पुरुष सारख्याच प्रमाणात सायकल चालवितात.

नेदरलँडची भूमी पूर्णपणे सपाट आहे.चढऊतार,डोंगर,दय्रा काहीही नाही.या शिवाय इथलं हवामानही थंड असतं.कितीही सायकल चालवली तरीही दमछाक होत नाही.घाम येत नाही.

प्रत्येक डच कुटुंबात प्रत्येकाची सायकल असतेच.आई,बाबा आणि दोन लहान मुलं मजेत सायकल चालवतांना दिसतात.मुलं शाळा,क्लास,कॉलेजसाठी ,आॉफीससाठी,बाजारहाट करण्यासाठी .कोठेही जायचे असल्यास सायकलच वापरतात.अगदी लांब अंतरावर जायचे असल्यास सायकल बस स्टॉप अथवा रेल्वेस्टेशन नजीक लावतो आणि पुढचा प्रवास करतो.

यात गरीब श्रीमंत असा भेद नाही.ऊच्च पदावरील अधिकारीसुद्धा सायकल चालवत कंपनीत येतात. काही महिलांच्या सायकलला पुढच्या चाकाजवळ बाबागाडी लावलेली असते.त्यात अगदी लहान मुल ,पाळलेले कुत्रे आणि सामान घेऊन त्या जातांना दिसतात.अगदी वृद्ध महिला ,पुरुषही सायकल चालवितांना दिसले.दोन आज्या किंवा आजोबा गप्पा मारत सायकल चालवतांना पाहिलंय.

पिझ्झा डिलिव्हरी, Uber eats ,ग्रोसरी डिलिव्हरी,सुशी (एक जपानी पदार्थ)  डिलिव्हरी करणारी मुलंही सायकलवरुन पार्सल घेऊन जातांना सर्रास दिसतात.

 काही सायकली साध्या,काही गिअरच्या तर काही सायकलला बॅटरी लावलेली असते.त्या खुप वेगात जातात.

 सायकलींसाठी सगळीकडेच पार्कींगची सोय असते.शेकडो सायकल्स तेथे पार्क केलेल्या असतात.काही वेळा दोनमजली पण पार्कींग असते.

सायकलसाठी सगळीकडेच वेगळा ट्रॅक असतो.त्यावरुन फक्त सायकलच चालवायची.चालण्याची मुभा नसते त्या ट्रॅकवरुन.

  सायकल्स रेल्वे,लांबपल्ल्याच्या बसेस,विमाने यातुन नेण्याची परवानगी असते.काही ठिकाणी फोल्डींग सायकल नेता येताात.

कारच्या मागच्या डीकीमागे दोन तीन सायकल्स अडकवण्याची सोय असते.

  एकुणात कार कमी वापरतात.सायकल सेफ चालवावी हे यांचे धोरण असते.

सायकल चालविण्याचा डच लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?तर डच लोक हे निरोगी असतात.आनंदी दिसतात,असतात.सायकलमुळे दरवर्षी मृत्युच्या प्रमाणात 6500 ने घट झाली आहे.याऊलट सायकल चालवतांना अपघात होऊन मृत्यु पावणाय्रांचे प्रमाण फक्त 190 इतके आहे.

डच मुल चालायला लागलं की लगेच सायकल चालवायला लागतं.परवा बेल्जीयममध्ये आई बाबा एक मुल पाच वर्षाचे तर एक अगदी तीन वर्षाचे .बघुन खरंच आश्चर्य वाटतं!कौतुक वाटतं.फोटो काढायला परवानगी नाही .नाहीतर काढला असता.आणि अॅमस्टरडॅममध्ये सायकलच्या पुढच्या दांडीवर प्रेयसीला बसवुन प्रवास करणारे अनेक प्रियकरदेखील बघीतले.

  अशी ही डच माणसाच्या रोजच्या जीवनातली ,अविभाज्य घटक असलेली सायकल जगण्याचा एक भाग बनुन गेलीय. 

 

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments