*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 13*

  नेदरलँडर्स !होय डच माणुस स्वत:ला नेदरलँडर्स म्हणुन संबोधतो.या लोकांचा छंद म्हणजे फुलझाडे,फळझाडे लावणे.त्याची निगा राखणे.जोपासना करणे.फावला वेळ,सुट्टीचा दिवस असेल आणि  हवामान चांगले असेल तर डच हमखास आपल्या बागेत काम करतांना दिसेल.समोरची बाजु फुलझाडे आणि मागच्या अंगणात फळझाडे.सफरचंद,पेअर,अंजीर,चेरी अशी झाडे.काही भाज्यांची लागवड करतो.हे देखील या दिवसांतच.त्यांची ही आवड ,छंद जोपासण्यासाठी इथल्या नर्सरीजही तेवढ्याच परिपूर्ण असतात.आज अशाच एका नर्सरीचा फेरफटका आपण मारणार आहोत.

 रांंझाईन असं या नर्सरीचं नाव.पण त्या भल्यामोठ्या बंदिस्त आवारात शिरताक्षणीच याचा आवाका लक्षात येतो.नर्सरी नव्हे तर मॉलच! मोठ्या प्रवेशद्वाराजवळ मोठमोठ्या  विविधरंगी फुलझाडांच्या  कुंड्या स्वागतास दोन्ही बाजुस हजर असतात.

आत शिरताच अनेकविध इवली इवली निळी,जांभळी,गुलाबी,पिवळी फुले  आणि त्याची रोपे मोहात पाडतात.प्रत्येक रोप जोपासलेले ,बहरलेले.किती विविध रंगांची पाने,फुले .सगळीच पहिल्यांदाच पाहात होते.गुलाब जास्त दिसले नाहित.पण आपल्याकडच्या दोन तीन रंगांची जास्वंद फक्त ओळखीची आणि जवळची वाटली.

लिंबु,संत्री इत्यादीची झाडे पण फळं लगडलेली होती. पलिकडच्या बाजुस मोकळ्या जागेत रोपांची लागवड केली होती.आत मॉलमध्ये फक्त विक्री होत होती.

  बागेसाठी लागणाय्रा मातीपासुन ते सगळ्या अवजारांपर्यंत असे अद्ययावत दुकान होते.

कुंड्या तर अगदी लहान आकारापासुन ते भल्यामोठ्या आकारात ऊपलब्ध होत्या.

पाणी घालण्यासाठी लागणारे पाईप्स,खुरपी,गवत कापण्याची यंत्रे,हातात घालण्याचे रबरी मोजे,टिकाव,घमेले.पायात घालायचे गमबुट.तण काढण्याची यंत्रे.झाडे कापण्यासाठी लागणारे कटर.शेकडो प्रकार होते.

किटकनाशकं,खतं याचेही दालन सज्ज होते.

बागेत ठेवण्यासाठी लागणारे फर्निचर !डायनिंग टेबल,खुर्च्या!छोटे छोटे सिलेंडर असलेले गॅस स्टोव्हज! पण विक्रीस ठेवले होते.

    बागेत पाळण्यासाठी लागणारे रंगीत छोटे पक्षी,फीशटँकस !मासे.ससे.पिंजरे.झाडांवर अडकवण्यासाठी पक्षांचे पिंजरे !त्यांचं खाद्य.त्यांच्यासाठी लागणारी औषधं !

काय नाही त्या मॉल मध्ये!चालुन चालुन थकल्यावर निवांत बसण्यासाठी एक कॉफी शॉप!

 एवढी फुलं बघीतल्यावर डोळे तृप्त होतात. बाहेर पडावसंच वाटत नाही.जाता जाता जमेल तशी डोळ्यांत आणि कॅमेरात बंदीस्त करत बाहेर पडलो.

   

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments