*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 14*


    *AMSTERDAM*


कॅपिटल अॉफ नेदरलँडस,सीटी अॉफ लेक्स,सिटी अॉफ म्युझीयम!

 अशा अनेक नांवाने ओळखले जाणारे एक भले मोठे शहर!

होफदॉर्फ ते अॅमस्टरडॅम सुमारे चाळीस मिनिटांचा प्रवास आहे!

शहरांत प्रवेश करतांनाच मोठ मोठे हायवे लागतात.आम्ही निघतांनाच जोरदार पाऊस आला.इथल्या पावसाचा काही नेम नसतो.बसने ऊतरुन चालतच .कॅनॉल राईडसाठी अालो.इथल्या सगळ्याच शहरात कॅनाल्स आहेत .पण अॅमस्टरडॅममध्ये तीन भले मोठे कॅनाल्स फार पुर्वीपासुनच आहेत.या कॅनालमुळेच जहाजांमधुन व्यापार मोठ्या प्रमाणावर चालायचा.पुढे कॅनाल शेजारीच राजवाडे,घरे बांधण्यात आली.ती आजही जतन करुन ठेवली आहेत.

  वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोट राईडस आहेत.त्या पूर्ण तास दीडतास कॅनालमधुन फिरवतात.त्यातुन अॅमस्टरडॅम मधील अनेक पुरातन वास्तुंचे दर्शन होते.आम्ही पण अशीच एक बोट राईड घेतली.बोट संथपणे पुढे जात होती.बोटीच्या दोन्ही बाजुला अनेक वास्तु त्याची माहिती मिळत होती.विशीष्ट बांधणीतल्या त्या वास्तु,राजवाडे,चर्च.कालव्यावर बांधलेले जुने दगडी पुल !अजुनही छान जतन केलेले आहेत.एके ठिकाणी अॅन फ्रँकचे घर आहे.त्या वास्तुचे नुतनीकरणाचे काम चालु होते.तिथेच तीच्या आठवणींचे म्युझीयम देखील आहे.

   पंधराव्या,सोळाव्या शतकातील इमारती ,त्याचा इतिहास याचा धावता आढावा बोटीमध्येच सांगीतला जात होता. बोट राईड पूर्ण झाली.पाऊस असल्याने फोटो काढता आले नाहीत.

शहराच्या मध्यवर्ती भागात विस्तीर्ण अशा जागी अनेक म्युझियम्स एकवटली आहेत.रिक्स म्युझीयम,व्हॅनगॉग म्युझीयम,मोका म्युझीयम अशी अजुनही काही म्युझीयम्स बघायला जगभरातले लोक गर्दी करतात.त्यामुळे हा भाग सदोदीत गजबजलेला असतो.पेंटींग,शिल्प ,पुरातन वस्तु आदी येथे बघायला मिळतात!एक एक म्युझियम बघयला पाच,सहा तास सहज लागतात.आमची धावती भेट असल्याने म्युझीयम पाहता आली नाहीत.

   याच आवारात बागेत चेरी ब्लॉसम गुलाबी,पांढय्रा  रंगात  फुलला होता.या शिवाय भल्या मोठ्या वर्तुळाकार जागेत ट्युलिप्सच्या असंख्य कुंड्या ठेवल्या होत्या.दर्शनी भागात STOER  ही  मोठी अक्षरे  होती.अनेक लोक त्या ठिकाणी येऊन फोटो काढत होते. पुर्वी इथे I  AMSTERDAM ही अक्षरे होती .आता ही अक्षरे शिपोल विमानतळासमोर ऊभी केली आहेत.

    अनेक जुन्या वास्तु हॉटेल्स,अॉफीसेस,बँकांमध्ये रुपांतरीत केल्या आहेत.तसेच येथे आंतरराष्ट्रीय नाटक अकादमीची पण इमारत बघीतली. 

    एका कँडीच्या दुकानात शिरलो.कीती प्रकारच्या कँडीज असाव्यात याची कल्पनाच न केलेली बरी.मला तर पुर्वी परीच्या राज्यात असलेले चॉकलेटचे डोंगर आठवले.सगळ्या प्रकारच्या कँडीज चवीसाठी घेतल्या.

येथेही सायकल्स,बस ,ट्रेन या बरोबरच शहराच्या सगळ्या भागातुन धावणारी ट्राम बघीतली.सार्वजनिक वाहतुकीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर ऊपयोग होतो.

दिवसभर पावसांत चालत,फिरत कॉफीचा आस्वाद घेत या भल्या मोठ्या शहराची एक झलक बघीतली!आणि पुन्हां पाऊस सोबतीला घेऊनच माघारी अालो.

  

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments