*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 14*


      Grote  Market  Netherlands.

    

  ग्रोटे मार्केट हे नेदरलँडसमध्ये भरणारे खुले मार्केट आहे!आपल्यासाखेच आठवड्यातुन एकदा भरणारे!जणु आठवडेबाजारच! प्रत्येक ठिकाणच्या  Centrum मध्ये भरणारा हा बाजार.सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत भरतो.ठिकठिकाणचे वार मात्र वेगवेगळे असतात.

या मार्केटमध्ये तेथील शेतकरी आपल्या भाज्या आणि फळे विक्रीस ठेवतो.आज चक्क शेपुची भाजी मिळाली.तसेच विविध प्रकारची फळे पण होती.

 पुढच्या स्टॉलवर ताजे ब्रेडस होते.खुप निरनिराळ्या आकाराचे,प्रकाराचे मिश्र धान्यांचे! त्याला वरुन तीळ,जवस,भोपळ्याच्या बीया,सूर्यफुलाच्या बीया,ओटस लावुन अजुन पौष्टीक बनवले होते.कप केक्स,बिस्कीटस,न्याहरीचे पदार्थ विक्रीस होते.इथल्या लोकांच्या जेवणात मुख्य पदार्थ ब्रेडच असतो ,त्यामुळे ब्रेडची खरेदी मोठ्या प्रमाणात होत होती.

 पुढचा स्टॉल होता पिझ्झा बेस आणि त्यावर घालायचे अनेक प्रकारचे स्प्रेडस!अॉलिव्हची फळे,मश्रुम  इत्यादी भाज्या फळे यांचे काप करुन ठेवले होते.पिझ्झा बेस पण वेगवेगळ्या आकारात दिसले.

त्यापुढचा स्टॉल ड्रायफ्रूटसचा!कधी पाहीले नसतील एवढे प्रकार तिकडे ठेवले होते.काजु,बदाम,पिस्ते, अक्रोड,खजुर एवढेच ओळखु आले.खारे शेंगदाणे आणि खोबरे पण होते.याचीही विक्री मोठ्या प्रमाणात होत होती. 

पुढच्या विभागात लहानमुलांना आकर्षित करणारा होता!त्या होत्या कँडीज!खुप साय्रा प्रकारच्या,रंगांच्या,स्वादाच्या कँडीज आपलेही मन मोहुन टाकणाय्रा होत्या.या कँडीजसाठी तरी क्षणभर 'लहानपण देगा देवा' असा विचार मनांत येतोच!

पुढे एकेठिकाणी रिस्टवॉचचा स्टॉल होता.खुप घड्याळे विक्रीसाठी होती.घड्याळाची दुरुस्तीही याच वेळी होते.नाहीतर घड्याळ दुरुस्त करणारे एरवी नसतातच!

  पुढच्या काही पावलांवर मला गोडसर,खरपुस काहीतरी भाजल्याचा वास आला .तो येत होता वॅफल्सच्या स्टॉलवरुन!वॅफल्स नेदरलँडस,बेल्जियम इथला जगप्रसिद्ध खाण्याचा प्रकार!हे देखील छोट्या मोठ्या आकारात मिळतात!पण इथे ताजे वॅफल्स तयार करुन मिळत होते.एक प्रकारचं  गव्हाच्या कणकेप्रमाणे दिसणारं पीठ ,त्याचा गोळा करुन यंत्रात टाकतात.ते भाजलं जातं. तळहाताएवढी पोळीसारखा कुरकुरीत ,मध्यम जाडीचा पापुद्रा तयार होतो.पुन्हां दुसरा गोळा टाकुन अजुन एक पापुद्रा तयार करतात.या दोन्हींच्या वर मधासारखा एक गोडसर पाक लावतात.एकमेकांवर ठेवुन ,कागदांत गुंडाळुन आपल्या हातात देतात.गरमा गरम कुरकुरीत,मस्त भाजलेला गोड वॅफल्स हातात!तरी मधला पाक कमी लावायला सांगीतला होता.तरी गोडच!एरवी यांचे सगळे वॅफल्स गोडमिट्ट असतात!अरे हो या प्रकारच्या वॅफल्सना स्त्रुप वॅफल्स म्हणतात!

  इथेही चीजचे मोठे दुकान लागले होते.चीज अनेक स्वादांचे

निरनिराळ्या आकारात कापुन ठेवलेले होते.येथेही लोक खरेदी करत होते.

डच माणुस फुलांशिवाय राहुच शकत नाही.फुलं ही त्यांच्या आयुष्यातला एक महत्वाचा भाग आहे.कोणाकडे जातांना,वाढदिवसासाठी,घराच्या सजावटीसाठी,आजारी व्यक्तीला भेटायला जातांना तर कधी सहज म्हणुनही कोणाकडे जातांना फुले घेऊन जातोच.त्यामुळे अनेक प्रकारची फुले,त्यांचे  बुकेज तयार असतात.किंवा सांगेल तसा तयार करुन देतात.

याशिवाय कपडे,इलेक्ट्रॉनीक वस्तु ,खेळणी यांचेही स्टॉल्स असतात.

मासे,चिकन,मटण, पोर्क  या सगळ्या प्रकारच्या विक्रीसाठी वेगवेगळे ट्रक ऊभे होते.सगळे ताजे मासे सुरमई,कोलंबी  इत्यादी प्रकारची मासळी मिळते!

    या शिवाय रेस्टॉरंटस,काॉफीशॉप्स ,मॉल्स सगळीच दुकाने ऊघडी असतात.त्यामुळे बय्रापैकी गजबज असते.

 कसा वाटला नेदरलँडसच्या बाजारातला फेरफटका?

    

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments