*अलिबाग ते अॅमस्तरडॅम लेख 17*


    *Antwerp  —Belgium*

 

एका देशातुन दुसय्रा देशात प्रवास म्हंटलं की डोळ्यासमोर विमानप्रवासच येतो.किंवा फार फार तर जहाज!पण आम्ही जो प्रवास नेभरलँडस ते बेल्जीयम केला तो होता बस प्रवास !

   नेदरलँडसवरुन बसचे तिकीट बुक केले होते.दुपारी साडेबाराची बस होती.भल्या मोठ्या बस टर्मिनसवर देशांतर्गत प्रवास करणाय्रा मोठमोठ्या बसेस येत होत्या ,सुटत होत्या!लंडन,पॅरीस,जर्मनी इत्यादी ठिकाणी बस जात होत्या.बरोबर साडेबाराला लांबलचक दोनमजली बस येऊन थांबली.प्रत्येकाचे तिकीट बघुन बसचा ड्रायव्हर बसमध्ये पाठवत होता.त्याआधी आपल्याकडच्या मोठमोठ्या बॅग्ज बसच्या खालील मोठ्या डीकीत ठेवल्या गेल्या.याच डीकीत अनेक प्रवाशांच्या फोल्डेड सायकल्स पण होत्या.

आम्हांला बेल्जियमला जायचं असल्याने वरच्या मजल्यावर पाठविण्यात आले.

खाली पॅरीससाठी प्रवास करणाय्रांना बसविण्यात आले.

दरम्यान एक स्री अगदी लहान बाळाला घेऊन आली.ड्रायव्हरने तीला त्याचे वय विचारले.तीला इंग्लीश येत नव्हते आणि ड्रायव्हरला तिची भाषा समजत नव्हती.शेवटी एका सहप्रवाशाने मध्यस्ती करत तीला ड्रायव्हरचे म्हणणे सांगीतले.बसमध्ये लहानबाळासकट प्रवास करत असाल तर कंपलसरी कारसिट सारखी सिट आणावी लागते.बसची कंपनी आणि ड्रायव्हर दोघेही बाळाच्या जीवाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते.कारसीटशीवाय मुल बसमध्ये नीट बसु शकत नाही.ते पडलं,त्याला लागलं तर कोणाची जबाबदारी?म्हणुन त्या महिलेस बसमध्ये प्रवास नाकारण्यात आला.पुढे त्या महिलाप्रवाशाचं काय झालं ते कळलं नाही.

इथेही बसमध्ये कंडक्टर नव्हता.एकटा ड्रायव्हर तिकीट तपासणे.सामान डिकीत ठेवणे.प्रवाशांच्या अडचणी सोडविणे,शंकासमाधान करणे असा अनेक पदरी रोल छानपणे निभावत होता.

    बसमध्ये प्रवासी बसल्यानंंतर बस मार्गस्थ झाली.शहराबाहेर पडुन हायवेला लागली.हायवेला फक्त बसेस,कार्स आणि मोठमोठे कंटेनर्स .बंदीस्त मालवाहु ट्रक.इथले सगळेच ट्रक,टेंपो बंदीस्त असतात.ओपन ट्रक,मालवाहु टेंपो अजिबातच आढळले  नाहीत.सायकल्स पूर्णपणे नाहीत.त्याऐवजी हायवेच्या दोन्ही बाजुस लांबवर सायकल ट्रॅक दिसले.

ताशी शंभर ते एकशेवीस स्पीडने बस धावत होती.हायवेवर अनेक कंपन्या,कारखाने गोडाऊन ,कचरा रीसायकलींग करणारे  प्लँटस दिसले.शेती होती.पण काही लागवड केलेली दिसत नव्हती.आपल्याकडे घाटावर जशी काळी माती तशीच इकडे पण काळी माती होती.शेताच्या बाजुलाच शेतकय्रांची घरे म्हणण्यापेक्षा बंगले होते.प्रत्येक बंगल्यांवर सोलर पॅनेल लावुन स्वत:साठीची वीजनिर्मिती करतात.शेतात मेंढ्या,गाई,घोडे,बदकं इत्यादी प्राणी पाळलेले दिसले.

बसट्रॅकच्या बाजुला मोहरीची लागवड केलेली दिसली.पिवळीधम्मक मोहरीची फुले फुलली होती.मधेमधे मोठमोठे कालवे,त्यावरचे पुल दिसत होते.बस एवढ्या स्पिडमध्ये असुनही काही जाणवत नव्हतं.पोटातलं पाणी पण हलु नये इतके रस्ते स्मुथ होते.आणि ड्रायव्हरचं स्कीलतर दिसुन येतच होते.हळुवार वळणे घेत ओव्हरटेकही न करता,कुठेही हॉर्न न वाजवता बस धावत होती.

प्रवासीपण प्रवासाचा आनंद घेत होते.बसचा कुठेही हॉल्ट नव्हता.

बरोबर साडेतीन वाजता बेल्जीयममधल्या अँटवर्प या शहरात बस पोहोचली.आम्ही ऊतरलो.

नेभरलँडस ते बेल्जीयम फक्त तीन तासांत!आहे ना गंमत!

 

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments