*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 19*


*सेंट्रल स्टेशन अँटवर्प*


    साधारणत: 1895 ते 1905 साली बांधलेलं हे भव्य रेल्वे स्टेशन.संपूर्ण दगडी बिल्डिंग असलेलं आणि  वेटींगरुमवर मोठा डोम असलेलं रेल्वेस्टेशन.हा डोम  185 मीटर रुंद आणि  44 मीटर ऊंच असा आहे.हे बांधण्यासाठी दगड आणि काचेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला गेला.लक्षवेधी ही वास्तु अतीशय निष्णात अशा वास्तुविशारदांच्या कुशल कारागीरीचे वैशिष्ट्य आहे.ही वास्तु आता बेल्जीयममधील सर्वात सुंदर वास्तु म्हणुन गणली जाते.

  या सुंदर अशा रेल्वेस्टेशनचं ऊद्घाटन 11 अॉगस्ट 1905 रोजी करण्यात आले. पुढे 1975मध्ये हे स्टेशन पुरातन वास्तु म्हणुन संरक्षीत म्हणुन घोषीत करण्यात आले. 2000—2009 मध्ये याची क्षमता दुपटीने वाढवली गेली.रेल्वेट्रॅक्स   पण वाढविण्यात आले.

 या सेंट्रलरेल्वेस्टेशनला दोन मुख्य दरवाजे आहेत.एक दर्शनी बाजुस तर दुसरा मागील बाजुस.दोन्ही दरवाज्यांच्या आधी मोठी कमान आहे.मोठा डोम आणि अाजुबाजुचे अनेक छोटे डोम आहेत.दोन्ही दरवाजांवर सोनेरी रंगाच्या लखलखत्या अनेक प्रतिकृती आहेत.सिंह,मानवी आकृती आहेत. भव्य दर्शनी दरवाजा बघुनच आतल्या वास्तुची कल्पना येते.दोन लाकडी कोरीव काम असलेले रंगीत काचांची संगती असलेले  दरवाजे ओलांडुन आपण भल्या मोठ्या दिमाखदार अशा वास्तुत पाय ठेवतो.भला मोठा वेटींग लाऊंज कायम प्रवाश्यांनी गजबजलेला असतो.मध्यभागी छताला ऊंच डोमची आतली बाजु दिसते.वर सगळ्या बाजुंनी निळ्या,लाल,केशरी ,हिरव्या काचांचे रंग.चारही बाजुस सोनेरी प्रतिकृती.मध्यभागी दोन्ही बाजुने ये जा करण्यासाठी लाकडी जीना.तो जीना आणि कठडा पण आकर्षक आहे. सध्या तिकीटांसाठी वेगवेगळी मशीन,रेल्वेचे अॉफीस अशांनी हा भाग व्यापलेला आहे.एकदा पाय टाकल्यावर बघतच राहावे अशी भव्य,सुरेख,दिमाखदार वास्तु.त्याची प्रत्येक कलाकृती थक्क करणारी.मी तर या सेंट्रल स्टेशनच्या प्रेमातच पडले.एका बाजुने खाली प्लॅटफॉर्म जाणारा रस्ता आहे.वर जीना चढुन आलं की समोरच चांदीच्या धातुसारखा मोठा हाताचा  पसरट पंजा आहे.मागच्या लेखात या हाताच्या दंतकथेचा ऊल्लेख आहे.त्याचबरोबर  या बाजुची कमान आणि दर्शनी भाग पण देखणा आहे. सोनेरी अक्षरात *ANTWERPEN*  असे लिहीले आहे. 

   यापुढे चालु होतात प्लॅटफॉर्म्स! अनेक प्लॅटफॉर्म असलेली स्टेशन्स आजवर बघीतली.पण या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य म्हणजे इथे प्लॅटफॉर्मचे अनेक मजले आहेत.चार मजली  रेल्वे ट्रॅक्स आणि प्लॅटफॉर्म्स असलेले हे रेल्वेस्टेशन आहे.प्रत्येक मजल्यासाठी जायला सरकते जीने तसेच पायय्रांची सोय आहे.वरच्या प्लॅटफॉर्मवर काॅफीशॉप्स,रेस्टॉरंटस अशा अनेक सोयीआहेत.

सगळ्या प्लॅटफॉर्म वरुन एकाचवेळी रेल्वे ये जा करत असतात.लंडन,पॅरीस,जर्मनी,नेदरलँडस अशा देशांसाठी पण येथुन रेल्वे सुटतात.तसेच लोकल ट्रेनसारख्या ट्रेन.दोन शहरांसाठीच्या ट्रेन्स अशांची सुविधा आहे.इलेक्ट्रॉनीक बोर्डवर गाड्यांची नावे,वेळा,प्लॅटफॉर्म नंबर दिसतात. शेकडो प्रवासी येथे येतात.

   जगातले सर्वात सुंदर रेल्वेस्टेशन असा अमेरीकेने ऊल्लेख केला आहे.एक ऐतिहासिक वारसा असलेली वास्तु. केवळ ही वास्तु बघण्यासाठी देखील अनेक पर्यटक येत असतात.बेल्जीयमच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेले *Central Railway Station Antwerpen*!

    

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments