*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 20*
*Keukenhof*
क्युकेनहॉफ — हे आहे जगप्रसिद्ध आणि जगातील सर्वात मोठ्या अशा ट्युलीप्स गार्डनचे नांव.
नेदरलँडसमधील हॉलंड परगण्यातील लीसे या गावात हे सर्वात मोठे ट्युलीप्स गार्डन आहे.हे ट्युलिप्स गार्डन 32 हेक्टर इतके विस्तिर्ण आहे.या गार्डनमध्ये अंदाजे सात मिलियन ट्युलिप्स फुलतात.
फारपूर्वी म्हणजे सोळाव्या शतकात तुर्की देशांतुन ट्युलिप्स नेदरलँडसमध्ये आयात करावे लागायचे.त्यामुळे ते अतीशय महाग होते.ट्युलिप्सच्या एका फुलाच्या काडीची किंमत त्यावेळच्या दोनहजार रुपये एवढी होती.सोन्यापेक्षाही त्याला जास्त भाव असायचा.
पुढे येथील राजाने त्याची लागवड करायला परवानगी दीली.इथल्या ऊत्तर समुद्राकडुन येणारे वारे,मार्चमधील मध्यम कमी थंड असलेलं तापमान आणि स्प्रिंग सिझन या सगळ्यामुळे ट्युलिप्स फुलायला पोषक असे वातावरण मिळाले.आयात केल्यापासुनच पुढील काही वर्षात ट्युलीप्सची फुलं ही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी तयार होऊ लागली.फक्त युरोपात निर्यात होणारी ही फुले आता जगभरात जातात.ट्युलिप्सची शेती ही इथे मोठ्या प्रमाणावर केली जाते.शेतकय्रांसाठी आणि नेदरलँडससाठी हे नगदी पीक अगदी फायदेशीर ठरले आहे.फार मोठी आर्थिक ऊलाढाल या ट्युलिप्समुळे होते आहे.
ट्युलिप्स म्हंटलं की एक टपोरे मोठी दांडी असलेले फुल समोर येते.क्युकेनहॉफ हे अनेक भागात,मोठमोठ्या ऊंच अशा वृक्षांनी ,झय्रांनी व्यापलेले आहे.
येथे शेकडो ट्युलिप्सच्या जाती आहेत.अनेक रंगांचे ट्युलिप्स कलात्मक पद्धतीने लावले आहेत.अगदी नजर जाईल तिकडे फक्त ट्युलिप्स ,ट्युलिप्स आणि ट्युलिप्सच!
किती विविध चमकदार रंग!फुलांचे टपोरलेपण ,तेजस्वीपणा
नजर हटतच नाही.ट्युलिप्सच्या प्रत्येक जातीमध्ये विविधता आहे.यावर अजुनही खुप संशोधन चालु आहे.जास्तीतजास्त टिकाऊपणा ,रंगांमध्ये वेगळेपण अाणण्याचा प्रयत्न चालु आहे.
लाल,पिवळे,पांढरेशुभ्र,गुलाबी,केशरी, लव्हेंडर,काळे.हिरवटसर रंगाचे ,दुहेरी रंगांचे,अनेकरंग एकाच ट्युलिप्स मध्ये असणारे किती रंग!फोटोत किती साठवु आणि मनांत,डोळ्यांत किती बांधून घेऊ असं झालं होतं अगदी!माझे अत्यंत आवडते फुल!
ट्युलिप्सचा सिझन हा फक्त दोन महिनेच असतो.दरवर्षि कोणती ना कोणतीतरी थीम घेऊन ही फुलांची रचना केली जाते.यावर्षी मात्र कोणतीही थीम नव्हती.23 मार्च ते 14 मे असा यावर्षीचा सिझन होता.
फक्त आणि फक्त हे क्युकेनहॉफ गार्डन बघण्यासाठी सुद्धा जगभरातुन अनेक पर्यटक येतात.त्यासाठी खास टुर्स आयोजित केल्या जातात.विमानतळावरुनच त्यांच्या बसेस सुटतात आणि ट्युलिप्स गार्डन बघायला घेऊन जातात.त्यामुळे पर्यटकांची बरीच गर्दी असते.
या भल्यामोठ्या ट्युलिप्स गार्डनमध्ये मध्यभागी एक मोठी विंडमील आहे.कॉफीशॉप्स आहेत.मधेमधे कारंजी आहेत.खळखळणारे झरे आहेत.हिरवेगार गवताचे लॉन्स आहेत.जपानी चेरीब्लॉसमपण गुलाबी पांढय्रा रंगात ठिकठिकाणी फुललेला दिसतो.या खेरीज डॅफोल्डीस (डॅफोल्डीस म्हंटलं की वर्डसवर्थची कविता आठवते) ची फुलेही अनेकरंगात आहेत.हयासिंथची फुलेही विविध रंगात दिसतात.
नेदरलँडसचं राष्ट्रीय फुल अर्थातच ट्युलिप्सच आहे.ट्युलिप्स हे प्रेम ,दयाळूपणा आणि सह्रदयतेचे प्रतिक मानले जाते.
लाल ट्युलिप्स हे प्रेमाच्या व्यक्तिला भेट म्हणुन देतात.तर गुलाबी ट्युलिप्स हे आनंदासाठी आणि भावना व्यक्त करण्यासाठी म्हणुन देतात.
पिवळे ट्युलिप्स हे ऊत्साह आणि ऊमेद याचे प्रतिक मानले जाते.
इंद्रधनुष्यामधल्या जवळपास सगळ्याच रंगात ट्युलिप्सची फुले आढळतात.अपवाद फक्त निळ्या रंगाचा.
ट्युलिप्सची लागवड ही अॉक्टोबर महिन्यापासुनच केली जाते.तेंव्हापासुन त्याची निगा राखुन,जोपासना करुन त्याची फुले फुलण्याच्या वेळेपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत आणि पुढेही सिझन संपेपर्यंतचा काळ ट्युलिप्ससाठी द्यायचा असतो.
ट्युलिप्स फुलण्यापासुन ते मे पर्यंतचा सिझनचे तीन टप्पे असतात.या तीनही वेगवेगळ्या टप्प्यांवर फुलांचा बहर वेगवेगळा असतो.पहिला सिझन मार्चमध्ये फुले ऊमलण्याच्या अवस्थेतला असतो.यावेळी डॅफोल्डीस आणि क्रोकस पूर्ण फुललेला तर ट्युलिप्स फुलण्याच्या पहिल्या
अवस्थेत,,अर्धोन्मिलित असतो.
दुसय्रा सिझनच्या टप्प्यावर हयासिंथच्या फुलांना बहर आलेला असतो तर ट्युलिप्स ऊमलुन त्याचे रंग दाखवण्याच्या अवस्थेत असतो.
तिसय्रा टप्प्यावर ट्युलिप्सची फुले फुलुन त्याचा बहर दाखवत असतात.
दरवर्षी केवळ दोन महिने फुलुन ही फुले जगाला वेड लावतात.जगभर जातात!असे हे जगप्रसिद्ध सर्वातमोठे नेदरलँडसचे कोकेनहॉफ गार्डन!आज 14 मे या कोकेनहॉफच्या ट्युलिप्सचा शेवटचा दिवस!
आज स्विझर्लंडवरुन परत येतांनाच एअरपोर्टवरच बोर्ड फ्लॅश होत होता.थोडसं वाईट वाटलं.पण मनांतला ट्युलिप्स मात्र कायम फुललेलाच राहील.आठवणीत!फोटोत!
सौ.पुर्वा लाटकर!
Comments
Post a Comment