*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 22*


  कालच्याच लेखाचा धागा पकडुन पुढचा लेख लिहीतेय.

एकटेपणावरचा ऊपाय म्हणुन बरीचशी वृद्ध मंडळी कोणता ना कोणता प्राणी पाळतात.त्यात कुत्रे पाळण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

  एकंदरीतच युरोप हा 'Pet friendly' आहे.कोणताही प्राणी पाळतांना सरकारची परवानगी आवश्यक आहे.कुत्रे पाळण्याआधी त्याची नोंद सरकार दरबारी करावी लागते.त्यानंतर त्याला एक UBN Number मिळतो.तो मिळाल्यानंतर व्हेटर्नरी डॉक्टरांकडे कुत्र्याला घेऊन जावे लागते.तेथे त्याची संपूर्ण तपासणी तसेच लसीकरण होते.त्यानंतरच त्या कुत्र्याला घरी घेऊन जाता येते.

इकडे पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण 38% आहे.सर्वात जास्त कुत्रा,त्या खालोखाल मांजर,पक्षी,मासे तसेच सरपटणारे प्राणी पण पाळतात.

     कुत्रा हा माणसाचा सर्वात जास्त विश्वासु तसेच जवळचा असल्याने कुत्रा हा बहुतांश घरात असतोच.कित्येक वृद्ध त्याला फिरायला नेतांना दिसतात.अनेक प्रकारची,जातींची लहान मोठी कुत्री दिसतात.या सगळ्याच कुत्र्यांना रेस्टॉरंटस ,कॉफीशाॅप मध्ये परवानगी असते.काही दुकानांमध्ये पण परवानगी देतात.रेल्वेत,बसमध्ये,मेट्रोत लहान कुत्र्यांना प्रवास करण्याची सवलत असते.मोठी कुत्री असतील तर तिकिट काढावे लागते.मोठमोठ्या पार्कसमध्ये,सार्वजनिक ठिकाणी पण कुत्री नेता येतात.

कुत्र्यांना  दुपारी बारा ते एक आणि संध्याकाळी सहा ते सात एवढ्या वेळातच फिरवुन आणावी लागतात.

  कुत्रे पाळणे खुप खर्चीक आहे.त्यासाठी सरकारकडे ठराविक रक्कम टॅक्स म्हणुन भरावी लागते.या शिवाय त्याचं लसिकरण,औषधोपचार,ठराविक प्रकारचं खाणं ,स्वच्छता ,देखभाल ,त्यांचे विशिष्ट ट्रेनिंग याचा खर्च बराच असतो.तरीही कुत्र्यांबाबतचं प्रेम,आवड,सोबत हे सगळं  मिळवण्यासाठी लोक ते करतात.

एकटेपणावरचा ऊत्तम ऊपाय म्हणजे कुत्रे पाळणे.त्याला पाळण्याचे फायदे देखील खुप आहेत.त्याला फिरायला नेतांना पाळणाय्रांचा वॉक होतो.बाहेर फिरल्याने ताण नाहीसा होतो.ब्लडप्रेशर,ह्रदयविकार,कोलेस्ट्रॉल,ट्रायग्लिसराइडस आदींचा त्रास कमी होतो.कुत्र्यांबरोबर खेळल्याने शारीरिक हालचाली होतात.नियमित चालणे होते .बय्राच वृद्धांमध्ये डिप्रेशन आलेले असते ते या कुत्रे पाळल्याने कमी होते.आनंदासाठी लागणारी संप्रेरके त्यांच्या मेंदुत तयार होतात.त्यांचा मुड चांगला होतो.

  कुत्र्यामध्ये आणि मालकात एक प्रकारचा दुवा तयार होतो.दोघांमधलं प्रेम,बॉंडींग यामुळे इमोशनल अॅटॅचमेंट तयार होते.दोघांमध्ये मित्रत्वाचं नातं तयार होतं.कुत्रे तुमच्याकडुन काहीही मागत नाहीत.ते फक्त निस्वार्थी प्रेम करतात.त्यामुळे तुम्ही कुठेही जा,कुठेही असा घरी यायची ओढ लागते.या शिवाय तुम्ही एका प्राण्याला घर देता,सुरक्षा देता,त्याचा सांभाळ करता हे पण खुप मोठे कार्य नकळत घडते.

   येथे ग्रोसरी शॉपमध्ये,मॉलमध्ये एक सेक्शन प्राण्यांचा असतो.त्यात त्यांचे खास फुड असते.वेगगळ्या प्रकारचे बेल्टस असतात,त्यांच्या खाण्यापिण्यासाठी वेगळी भांडी असतात.ऊबदार ब्लँकेटस असतात.कपडे असतात.त्यांना झोपण्यासाठी मऊ कुशन्स,गाद्या असतात.वेगवेगळी खेळणी असतात.अनेक प्रकार इथे बघायला मिळतात.

   एवढी कुत्री आजुबाजुच्या घरांमध्ये,पार्कमध्ये,रस्त्यांवरुन चालतांना दिसली तरी कुठेही कुत्र्यांचे भुंकणे ऐकु येत नाही.यासाठीचं ट्रेनिंग त्यांंना दिलेलं असतं.कुत्र्यांचे मालक पण आपल्या कुत्र्यांचा त्रास शेजारी पाजारी व इतर लोकांना होऊ नये म्हणुन काळजी घेतात.वेळेत परत येतात.

एका सर्व्हेनुसार कुत्रा पाळणाय्रा आनंदी लोकांचा आकडा एकोणसाठ टक्के असतो,न पाळणारे लोक छत्तीस टक्के आनंदी नसतात,किंवा तुलनेत कमी असतात.आहे ना आनंदाची बातमी!

      मग काय पाळणार ना आजपासुन एक प्राणी!ज्यांच्याकडे आधीपासुनच आहे ते 'आनंदी प्राणी आहेतच!तुमचं काय?


टीप:नेदरलँडस हा देश रेबीजमुक्त आहे.त्यामुळे येथे रेबीजची लस दीली जात नाही.

    

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments