*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 24*

 

 स्विर्झलँड —पृथ्वीवरचा स्वर्ग


   आज जाणार आहोत माऊंट टिटलिसला.हॉटेलमधुन ब्रेकफास्ट करुन बाहेर पडलो.समोरच बस स्टॉप होता.बस पकडुन पुन्हा एकदा थुन रेल्वेस्टेशनला.तेथुन ट्रेन पकडुन इंटरलाकेनला ऊतरलो.परत दुसरी ट्रेन पकडुन 

  ल्युसर्न या स्टेशनवर     ऊतरलो.पुन्हां तिसरी ट्रेन पकडुन ऐंगेलबर्ग या माऊंट टिटलीसच्या पायथ्याशी असलेल्या गावात आलो.

रेल्वेस्टेशन ते माऊंट टीटलीसचा पायथा इथे जाण्यासाठी बस आहे.ती फ्री आहे.

   खरंतर हे ज्या सोप्या शब्दांत लिहिलंय इतकं सोपं आणि सहज मुळीच नाहिये.त्याची पुर्वतयारी सगळा अभ्यास करुन ,माहिती काढुन,स्वत:चा नकाशा बनवुन त्याप्रमाणे अंमलात आणणे सोपे नाही.हे सारं श्रेय माझ्या मुलीला चैत्रालीला जातं.

    या सगळ्या बस,रेल्वे प्रवासाचा स्वीस पास तीने आधीच अॉनलाईन काढुन ठेवला होता,त्यामुळे स्टेशनवर जायचं प्रत्येक जाणाय्रा रेल्वेची वेळ बघायची.प्लॅटफॉर्मवर जायचं .मधल्या वेळेत कॉफी ब्रेक घ्यायचा असं करत  शेवटी माऊंट टीटलीसच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचलो.

     तिथेच एक छान भारतीय रेस्टॉरंट आहे. Spice नावाचं.तिथे मोजकेच पदार्थ होते.पण चवीला छान होते.माऊंट टीटलीसला जाऊन यायला काही तास लागणार होते म्हणुन येथेच पोटांत इंधन टाकणं गरजेचं होतं.मस्त  गरमागरम वडापाव,पावभाजी,फ्राईड राईस  आणि आलं घातलेला कडक चहा मिळाला.खाऊन तृप्त झाल्यावर पुढे केबल कारची तिकीटे काढण्यासाठी गेलो.पाचच मिनिटात तिकीटे मिळाली. तेथुनच आत चालत गेलो.तिकीटे स्कॅन केली आणि केबलकार मध्ये जाऊन बसलो.केबलकार थांबलेली नसते.फिरत असते.फिरताफिरताच त्यात पटकन बसावे लागते.पुढे गेल्यावर आपोआप दरवाजे बंद होतात.हे सगळं आॅमॅटीकली होत असतं .बाहेरच्या लहानशा केबीनमध्ये असणारी एक व्यक्ती फक्त लक्ष ठेवुन असते.आम्हांला स्वतंत्र केबल कार मिळाल्याने छान वाटलं.हळुहळु केबल कार वर जाऊ लागली खालची घरे.पार्किंग मधल्या गाड्या,बसेस अगदी खेळण्यातल्या सारखी वाटत होती.आधी मोठमोठी झाडे.खाली हिरवेगार गवत.तळ्यांचे अारशासारखे चकाकणारे चमकदार आकार.वर जातांना भितीयुक्त मजा वाटत होती.थ्रिलींग वाटत होतं.अनेक पर्वतरांगा मागे पडत होत्या.पर्वतांच्या डोक्यावर बर्फाचे मुकुट दिसु लागले.केबलकार मध्येच जोरदार झटका देऊन अजुन वर जायची तेंव्हा घाबरायला व्हायचं.पण खालचे दृश्य पाहुन अचंबीत होण्याची वेळ आली होती.

एका टप्प्यावर केबल कार थांबली.ऊतरलो.पुढे बर्फाचे डोंगर.आजुबाजुला नुसता बर्फच!नेहमीप्रमाणे फोटोसेशन झालं. हल्ली सगळंच आयुष्य 'कशासाठी तर फोटोसाठी' असं झालंय.त्यामुळे फोटो मस्टच!थोडयावेळ थांबुन पुढच्या टप्प्यावर गेलो.आता यापुढे आजुबाजुला बर्फाशिवाय काहीच नव्हते.हळुवारपणे केबल कार वर वर जात होती.केबल कारमध्ये फक्त आम्हीच.आजुबाजुला जिवघेणी शांतता ,शुभ्रता.श्वास रोखुन हा प्रवास चालु होता.त्यातच स्नो फॉल सुरु झाला.बर्फाचे भुरुभुरु पडणारे कण  वाय्राच्रा विरुद्ध दिशेने बघीतले तर दिसत होते.येणाय्रा जाणाय्रा केबल कार फक्त दिसताात.इतक्या ऊंचावर जाईपर्यंत फक्त आपणच आपले असतो.कोणाशीच संपर्क नसतो.त्यामुळे मनांवर दडपण येतं.खाली ,वर,आजुबाजुला,दिसेल तीथपर्यंत बर्फाची चादर ओढलेले,धीरगंभीर ,अतीथंड पर्वतच दिसत राहतात.

   ही केबल कार पण अजुन एका टप्प्यापर्यँत घेऊन आली.यातुन ऊतरुन अजुन एका मोठ्या रिव्हॉल्विंग केबलकारमध्ये बसलो.यात इतरही प्रवासी आपल्याबरोबर असतात. त्यामुळे हायसं वाटलं.गोलाकार ,मोठी संपूर्ण काचेची अशी ही केबलकार.यात ऊभं राहायची फक्त सोय असते.यात ती रिव्हॉल्विंग कारच्या प्रवाशांना अॉपरेट करायला एक व्यक्ती असते.तिचा सतत संपर्क तीथल्या अॉफीसशी होत असतो.

  ही रिवॉल्विंग कार 360 अंशाच्या कोनातुन फिरत फिरत वर जात असते.ही जगाच्या पाठीवर असलेली एकमेव अशी रिवॉल्विंग केबल कार आहे.हिची निर्मिति 1992 साली झाली. माऊंट टिटलीस हे जगातले सगळ्यात पहिले रिवॉल्विंग केबल कार बसवणारे 

    ठिकाण ठरले आहे.

हा सर्वात शेवटचा आणि सगळ्यात रोमांचक असा प्रवास होता.अामची ही  केबलकार गोलाकार फिरत वरवर जात होती.आता अनेक पर्वतरांगा दिसु लागल्या.एकामागे एक अनेक पर्वत,पांढरेशुभ्र,स्नो फॉल सुरुच होता.सगळंच दृश्य अदभुत दिसत होते.सगळंच थक्क करणारं,चकीत करणारं होतंं.खरोखर वेड लावणारं  होतं.पृथ्वीवरचा स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच!शुभ्र काही जीवघेणे!डोळ्यांत साठवायचं की कॅमेय्रात टिपायचं!

     हा रिवॉव्हिंग केबलकारचा काही मिनिटांचा प्रवास चित्तथरारक होता.पुन्हा एकदा ही केबलकार थांबली शेवटच्या टप्य्यावर!येथे ऊतरलो.स्नो फॉल अजुनच जोरात सुरु झाला .माऊंट टीटलीस दहा हजार फुट!आल्प्सच्या पर्वत रांगांमधलं एक ऊंच ठीकाण.येथे पर्यटकांसाठी खुप अॅक्टीव्हिटीज आहेत.पण स्नो फॉल खुप असल्याने करता आल्या नाहीत. तापमान —4 पर्यँत खाली आलं होतं. थंडीने गारठलो ,भिजलो, तरीही  आनंद घेतला स्नो फॉलचा.आपल्यासाठी स्नो फॉल दुर्मिळच!तिथेच बर्फात चाललो.फोटोसेशन केलं.

इथे समोरच शाहरुखखान व काजोल यांचं मोठं कटआऊट लावलंय.'दिलवाले दुल्हनियाँ ले  जायेंगे' या चित्रपटाचं शुटींग माऊंट टिटलीस तसेच स्विर्झलँडच्या इतर भागात झालंय.त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रसिद्धी आणि यशासाठी हे कटआऊट आठवण म्हणुन लावलंय.

     भारतीय पर्यटक येथे मोठ्या प्रमाणावर होते.

    स्नो फॉलचा मनसोक्त आनंद घेऊन ,मनांत आल्प्स पर्वतांची भव्यता,शुभ्रता,शांतता साठवुन घेत परतीच्या दिशेने चालु लागलो.इथेच काॉफीशॉप्स,चॉकलेट बनविण्याचे प्रात्यक्षिक बघायला मिळते.प्रसिद्ध स्विस चॉकलेटस आणि सुवेनीयरची दुकाने आहेत.

येतांना पुन्हा रिवॉव्हिंग केबल कार,केबल कारचे दोन  टप्पे पार पाडुन खाली आलो.परत येतांना मनांत मात्र एक स्वर्गीय अनुभुती घेतल्याचं समाधान होतं.

    प्रत्येकाने हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यायला हवा!


     *सौ.पुर्वा लाटकर अॉमस्टरडॅम*

Comments