*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 25*

     

  हिंदीत एक म्हण आहे,'मंझील की तरफ जाना है तो सफर का भी लुफ्त ऊठाओं'


काल मी तुम्हां सगळ्यांना माऊंट टिटलीसच्या मंझील पर्यंत नेऊन पोहोचवलं.पण तिथे जाणारा मार्गच इतका सुंदर,सुरेख आहे ना त्या बद्दल आजच्या लेखात.

आज परत जाऊया थुन रेल्वेस्टेशनवर .थुन हे  शहर एका प्रचंड मोठ्या तळ्याकाठी वसलेलं आहे.तळं  शब्दच इथे खुप छोटा वाटतो.सरोवर म्हणणे योग्य ठरेल. इतका मोठा  विस्तार,लांबी,आणि खोली आहे ना  की नजलेच्या टप्प्यातही न मावणारी.सगळीकडे लेक असाच ऊल्लेख म्हणुन आपणही लेकच म्हणु! 

लेक थुनचा हा 48.3 km इतका मोठा आहे.यात बोट क्रुझ ,बोटींग ,फिशींग सगळ्या अॅक्टिव्हिटीज चालतात.या लेकच्या बाजुनेच रेल्वेलाईन तसेच ,रोडस आहेत .त्यामुळे तुम्ही कोणत्याही वाहनाने गेलात तरी हा निळाशार  लेक सतत तुमच्या  एका बाजुने दिसत राहातो. एका बाजुला विस्तिर्ण असा लेक तर दुसय्रा बाजुने जंगल,झाडे,हिरवेगार लुसलुशीत गवताने आच्छादलेली जमीन.त्यात ती ऊतरत्या छपराची  छोटी मोठी घरे.प्रत्येक घरासमोर सुंदर फुलापानांनी  नटलेली बाग.घराच्या खिडक्या,दरवाजे एका वेगळ्याच धाटणीचं !घरं तर इतकी सुंदर ना वाटतं की ट्रेनमधुन ऊतरुन जाऊन राहावं.

   लेकच्या बाजुने प्रवास करतांना त्याचं निळं पाणी,गर्द झाडी,फुलांचे ताटवे,दुरवरच्या डोंगररांगा.त्याचं तळ्यात पडणारं प्रतिबिंब.सगळंच कसं मोहात पाडणारं. 

थुनचं तळं इंटरलाकेनच्या पुढेपर्यंत सोबत राहातं. तळं संपुन काही वेळ ऊंच ऊंच डोंगर रांगा बघायला मिळतात.त्यातुन पांढरेशुभ्र मोत्यांच्या माळा विखुरल्यासारखे  वाहणारे लहान लहान झरे,ऊंच कड्यावरुन झेपावणारे धबधबे .एकातुन दोन,दोनातुन तिसरा असे विभागत जाणारे धबधबे.एका बाजुला दरी,डोंगराच्या कुशीत दूर दुर वसवलेली एकटी दुकटी घरे .प्रवास चालुच राहातो.

ल्युसर्न ते ऐंगेलबर्ग या रेल्वेला पॅनोरामा ट्रेन असे नांव आहे.त्याच्या काही खिडक्याही पूर्ण काचेच्या आहेत.तुम्हांला या प्रवासाचा जास्तीत जास्त आनंद मिळावा ,जास्त चांगले व्ह्रुज बघता यावेत यासाठीची ही सोय.

ल्युसर्नपासुन अजुनच बहारदार सफरीला सुरवात होते.ट्रेनलाही दोन इंजीन्स जोडले जातात.आता डोंगरांच्या कुशीतुन आपण हळुहळु वर जायला लागतो.येथुनच लेक ल्युसर्न हा दुसरा एक मोठा लेक आपल्यासोबतीला येतो.त्याचे हिरवेगार पाणी ,ऊंच डोंगर आपले बोट धरुन एका अनोख्या सफरीला नेतात.ट्रेन सतत असंख्य वळणं घेत ऊंचावर नेत असते.ती ऊंची पण बसल्या जागी पण जाणवते.बाजुची घरं आता खाली खाली जाऊ लागतात.डोंगर रांगाची ऊंची वाढु लागते.जंगलातली भली मोठे वृक्ष मागे मागे जातात.वाटेत छोटी छोटी स्टेशने मागे पडत राहतात.आता डोंगर रांगांच्या माथ्यावर बर्फाचे शुभ्र मुकुट दिसायला लागतात.

   ते बघत बघतच आपला प्रवास चालु राहातो.कधी हिरवाईने गच्च भरलेले डोंगर.कधी ऊभे तासलेले खडक,कधी बर्फात,धुक्यात,ढगांत हरवलेले डोंगर.खोल खोल दय्रा.अर्ध्या वाटेपर्यंत सतत सोबतीला असणारे लेक थुन ,लेक ल्युसर्न .इवली इवली दिसणारी चित्रातल्यासारखी घरे.फोटोग्राफर्ससाठी तर खुले आमंत्रणच आहे.

    असा हा सुंदर ,सुरेख,वळणावळणांचा सिनिक प्रवास  कधी संपुच नये असं वाटणारा.


*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments