*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 26*


माऊंट टीटलिसची सफर झाली.पॅनोरॅमिक ट्रेनने प्रवासही झाला.

   आता पुन्हा थुन येथे जाऊया.आम्ही राहीलो होतो त्या हॉटेलच्या मागेच थुन लेक आहे.दुसय्रा दिवशी सकाळीच थुन लेकला गेलो.त्याचं निळंशार पाणी.दूरपर्यंत असणारा त्याचा विस्तार बघीतला.शेजारीच कॉफीशाॉप आहे.तेथे ऊन्हांत बसुन कॉफीचा आस्वाद घेतला.

लेकला लागुनच एक चर्च आणि म्युझीयम आहे.ते पाहिलं.चर्च बेलचे दर तासाला पडणारे ठोके वातावरणांत गंंभीरपणा आणतात.तिथेच  लेकच्या बाजुने पायी फिरलो.

दुपारी बसने निघालो.बसचा रस्ताही लेकच्या साईडने जातो.ते बघत मधल्या एका स्टॉपवर ऊतरलो.लेकच्या बाजुने कुठेही थांबलात तरी तुम्हांला सिनिक व्ह्यु दिसतोच.जाल तेथे लेक,लागुन असलेली घरं,कॉफीशॉप्स,मोठमोठ्या क्रुझराईडस.दुरवर धुक्यात लपेटलेले  बर्फाच्छादीत डोंगर.सतत सोबतीला असतात.

स्टॉपवर ऊतरुन रस्ता क्रॉस  केला की लगेचच केव्हजला जायची वाट सुरु होते.ऊंच डोंगरावर हे केव्हज नैसर्गीकरीत्या तयार झालेले आहेत.पण येथे जाण्यासाठी पायय्रा,वळणाळवळणाचा रस्ता  आहे.डोंगरावरुन मोठे धबधबे ओसंडुन जोराने खाली येत असतात.सहा,सात टप्पे आहेत वर जाण्यासाठी.प्रत्येक टप्प्यावर धबधब्याचं अनोखं रुप दिसतं.खाली अगदी लहान झुळझुळणाय्रा पाण्याचा धबधबा.जसं जसं वर जाऊ तसा धबधब्याचे फेसाळते रुप विस्तारत जाते.संपूर्ण वर जाण्याचा मार्ग हा बांबुचे कठडे लावुन सुरक्षीत केला आहे.मधेमधे झाडं,झुडपं,फुलं पानं वेलींनी सजवुन जास्तीत जास्त सुशोभित केला आहे.

मधे मधे कॉफीशॉपचे थांबे आहेत.सुवेनियरची शॉप्स आहेत.वर जाईपर्यंत चांगलीच दमछाक होते.

  आम्ही मधल्या टप्प्यापर्यंत गेलो आणि जोरदार पाऊस सुरु झाला.तेथुनच मागे फिरावे लागले.वरजाईपर्यंत केव्हज बंद होणार होते.जेथपर्यंत आलो तेथुनही लेकचा नजारा मस्त दिसतो.

      इथला पाऊस केंव्हा तुमच्या    मनसुब्यावर पाणी टाकेल याचा काही नेम नसतो.असो.धबधब्याचा आनंद घेऊन पुन्हां खाली आलो.

   त्याच बसस्टपवरुन इंटरलाकनची बस पकडली आणि इंटरलाकनच्या मोठ्या मध्यवर्ती रस्त्यावर ऊतरलो.

इंटरलाकन हे शहर दोन मोठ्या तळ्याच्या एक म्हणजे थुन लेक आणि दुसरा ब्रियांझ लेकच्या मधे लॉक झाल्यासारखा  आहे.म्हणुन शहराचं नांव इंटरलाकन.

ब्रियांझ लेक पण थुन लेक इतकाच विस्ताराने मोठा आणि नैसर्गिक सौंदर्यांने नटलेला आहे.दोन्हीही लेकच्या भोवती छान गांव वसलेली आहेत.

   इंटरलाकेन हे गांव अजुन एका कारणासाठी  भारतीयांमध्ये प्रसिद्ध आहे कारण इथे यश चोप्रा यांचा ब्रॉंझचा पुतळा येथील एका बागेत ऊभा केला आहे.तो पुतळा पाहण्यासाठी भारतीय लोकांची मोठी गर्दी असते.पुतळ्यासमोर कॅसिनो नावाचे हॉटेल आहे.समोर ऊंच डोंगर ,हिरवळ,आजुबाजुला असणारे मोठमोठे वृक्ष आहेत.मधोमध थुईथुई नाचणारं कारंजं आहे.अशा  रम्य ठिकाणी यश चोप्रांचा पुतळा ऊभारला आहे.

   यश चोप्रा यांनी इंटरलाकेनमध्ये अनेक चित्रपटांचं शुटीँग केलं आहे.त्यांच्या चित्रपटांमुळे इंटरलाकेन फेमस झालं.भारतीय पर्यटकांची संख्या वाढली.यासाठी इंटरलाकेनच्या  गव्हर्मैंटने `Ambassador of Intrelaken 'असा अॉनर देऊन सत्कारही केला होता.

याच पुतळ्याच्या परिसरात एक फुलापानांमध्ये चालणारं घड्याळही बसवलंय.

   याच्याच समोर एक मध्यवर्ती रस्ता आहे.युरोपमधला सगळ्यात महागडा रस्ता म्हणुन ओळखला जातो.कारण सगळ्यात महाग असलेली स्विस घड्याळे.ब्रँडेड पर्सेस,शुज,वेगवेगळ्या ब्रँडसचे कपडे,स्विस चॉकलेटस,सुवेनियर येथे मिळतात.प्रसिद्ध स्विस काऊ बेल्स पण येथे दिसल्या.एका टोकापासुन दुसय्रा टोकापर्यंत दुतर्फा ही महागडी दुकानांची रांग आहे.विंडो शॉपिंग भरपुर केली.गंमत म्हणुन सगळ्याच्या किंमतीची लेबलंही बघीतली.

 याच रस्त्यावर फाईव्ह स्टारपेक्षाही अनेक स्टार 9,10 स्टार असलेले भलेमोठे  व्हिक्टरी हॉटेल आहे.हॉटेलसोबत फोटो मात्र काढले.

    भरपुर भटकंती झाली पायदुखेपर्यंत.इथेच माझा पुतण्या,सुन आणि नात आमची सर्वांची ठरवुन भेट झाली. ती मंडळी पण पंधरा दिवसांच्या युरोप टुरवर आली होती. त्यांचा काही दिवस मुक्काम होता तिथे.गप्पा झाल्या ,खाणंपिणं झालं.एकमेकांना भेटुन तेही स्विर्झलँडमध्ये खुप भारी वाटलं

निरोप घेऊन आम्ही पुन्हां बसमध्ये  चढलो.

बस तळ्याच्या शेजारुन धावत होती.गडद काळंशार पाणी.भोवतीने लुकलुकणारे असंख्य बोटींचे,घरांचे दिवे ,त्याचं  पाण्यात पडणारं प्रतिबिंब.वेगळंच भासत होतं.

     ऊतरुन हॉटेलमध्ये गेलो.ऊद्या पुन्हा परतीचा प्रवास असणार आहे.चारपाच दिवस या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या स्विर्झलँडचा स्वर्गिय अनुभव घेतला. आनंदाचं ,तृप्ततेचं मापं शिगोशीग  भरलं होतं.

 *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments