*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 30*

    

   आज जरा इथल्या हवापाण्यावर बोलु काही.माझ्या मागील बय्राच लेखात कधीही पडणारा पाऊस  या बद्दल वेळोवेळी लिहिलंय.तर आज याच हवामानाबद्दल लिहीणार आहे.

       एअरपोर्टवर एप्रीलमध्ये जेंव्हा ऊतरलो आणि बाहेर आल्या आल्या मस्त थंडीचा तडाखा बसला.राजस्थानची  मायनस तीन, चार,पाचची  अंश   सेल्सियसची थंडी अनुभवलीय.सिमला,कुलु मनालीतल्या थंडीचा अनुभव घेतलाय.पुण्यात तर डिसेंबर,जानेवारीत जोर असतोच थंडीचा.पण इथल्या थंडीचा तडाखा जोरदार होता.स्वेटर ,शुज घातलेले असुनही थंडी हाडापर्यंत शिरलीच.घरी आल्यावर पायात सॉक्स ,स्लिपर घातले .अंगात,स्वेटर,वरुन शाल,डोक्याला स्टोल एवढं करुनही हुडहुडी भरलेलीच होती.गरम चहा,पाणी,सुप सारखं चालुच होतं.त्यावेळी चार पाच अंश सेल्सियस इतकं कमी तापमान होतं.या अशा वातावरणाची सवय व्हायलाच पंधरा दिवस लागले.

याचं कारण इथलं हवामान.रोजचं बदलणारं तापमान.ढगाळ वातावरण,कधीही पडणारा पाऊस ,त्यात 'विंड स्पीड' जास्त असेल तरीही गारठ्यात वाढ व्हायची.सुर्य ऊगवला तरीही त्याची तिव्रता कमी असते.सतत ढग आल्याने किरणे सलग आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.सुर्याची ऊष्णता जास्त असेल आणि विंड स्पीड पंधराच्यावर असेल तरीही ऊन्हांतही कुडकुडायला होतं.

 इथे सुर्योदय पहाटे लवकर होतो.सुर्यास्त साडेआठ ,नऊनंतर.होतो. दहाच्या पुढेच अंधार पडायला लागतो.

   इथे सिझन खरंतर दोनच समर आणि विंटर.पण स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार त्याचे चार भाग पाडले आहेत. स्प्रिंग,समर,विंटर आणि अॉटम .

  एप्रिल,मे,जुन स्प्रिंग सिझन असतो.जुलै ,अॉगस्ट,सप्टेंबर समर सिझन असतो.अॉक्टोबर,नोव्हेंबर,डिसेंबर अॉटम .जानेवारी,फेब्रुवारी,मार्च विंटर सिझन असतो.

    विंटर सिझनमध्ये तपमान मायनसमध्ये जाते.तर समर मध्ये वीस ,पंचवीस अंश सेल्सियस जाते. 

पाऊस  आणि वारा हा वर्षभर सतत असतो.त्यामुळे कोणताही बाहेर पडण्याचा प्लॅन ठरवायचा असेल तर 'अलेक्सा'ला विचारावे लागते.त्याप्रमाणे थंडीची पावसाची जॅकेटस,स्वेटर्स घालावी लागतात.मुख्य म्हणजे इथल्या हवामानाचा अंदाज अचुक असतो बरं का. सांगीतलेल्यावेळी पाऊस हमखास येणार म्हणजे येणार.

पावसामुळे अनेक प्लॅन रद्द करावे लागतात,पुढे ढकलावे लागतात.पुढच्या आठवड्याच्या हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर  फिरण्याचा बेत आखता येतो.

    आज वेदर सनी आहे.पाऊस पडणार नाही.असं असेल तर लगेच प्लॅन ठरवला जातो.

   ऊन पडलं की तास दोन तास अंगावर घेत बाहेर बॅकयार्डमध्ये बसायचं.कधी कधी जेवणाची ताटंही बाहेर नेऊन जेवतो .इतकं ऊन हवंहवंसं वाटतं इकडे.संध्याकाळचा चहा,कॉफीपण ऊन्हांत बसुनच पितो.रात्री आठपर्यंत बय्रापैकी ऊजेड ऊन असतं.

      रोज सकाळी ऊठलं की 'अलेक्सा' हाऊ इज वेदर टुडे?'असा प्रश्न विचारायची सवय झालीय.अजुनही सकाळी सात डीग्री,सहा डीग्री तापमान असतं.दिवसभर वाढत जाऊन सतरा,अठरापर्यंत जातं.स्वेटर घालावाच लागतोय.

बाहेर पडतांना तर पूर्ण तयारीनिशीच बाहेर पडावे लागते.

      कधी ढगाळ,कधी वारा,कधी पाऊस तर कधी कधी   सुर्यदर्शन असे सरड्याप्रमाणे रंग बदलणारे  इथले तापमान.इथे 'ये रे घना  ,ये रे घना' च्या  ऐवजी  ' 'ये रे ऊन्हां , येरे ऊन्हां' असं सतत गुणगुणावसं वाटतं. 


*नेदरलँडसच्या थंडीत गारठलेली*

   

 *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments