*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख  9*

  


परदेशात पाय टाकल्या नंतरएक बाब प्रकर्षाने आकर्षित करते ती म्हणजे इथली असलेली कमालीची स्वच्छता!या स्वच्छतेसाठी इथले नागरिक तसेच प्रशासन जागरुक असते.

   इथे वावरतांना इथल्या कचरा व्यवस्थापना बद्दल पाहिलं ,अनुभवलं ते मी शब्दांत मांडायचा प्रयत्न करते.

इथे रहिवासी घरे आणि दुकाने,मॉल्स ,रेस्टॉरंटस वेगवेगळ्या ठिकाणी असतात!घराशेजारी कोणतेच दुकान अथवा व्यवसाय नसतो.शहराचा  किंवा त्या त्या विभागाचा मध्यवर्ति भाग ज्याला Centrum म्हणतात त्या विभागात ग्रोसरी म्हणजे किरणामालाची दुकाने,कॉफी शॉप्स,मॉल्स,स्टेशनरी ,कपड्यांची दुकाने,पिझ्झाची दुकाने इत्यादी दैनंदीन गरजेसाठी लागणाय्रा वस्तुंची दुकाने असतात.रस्त्यावर काहीही मिळत नाही.

याच  Centrum मध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉक्स ठेवलेले असतात   कचरा टाकण्यासाठी निळा,केशरी,ग्रे कलरचा,हिरवा!यावर कशात कोणता कचरा टाकायचा ले लिहीलेले असते.काचेच्या वस्तुंसाठी केशरी.कागदासाठी  आणि थर्माकोलसाठी निळा ,झाडझुडपं गवत ,ओला कचय्रासाठी हिरवा.

त्यावर पण एक बारकोड असतो.त्या त्या विभागातील लोकांकडे एक कार्ड असतं ते कचय्राच्या डब्यावर असलेल्या बारकोडला दाखवलं तरच कचय्राचा डबा ऊघडतो.कोणीही यावं आणि कचरा टाकावा अशा पेट्या नसतात.तिथले नागरिक हे कटाक्षाने पाळतांना दिसतात.

काॉफीशॉप्स ,केकशॉप्स इत्यादी ठिकाणी मात्र कचय्राचे डबे सर्वांसाठी खुले होते.

या शिवाय जुने कपडे,नको असलेलं सामान ,वस्तु टाकण्यासाठी मोठ्या आकाराचे डस्टबिन्स होते.

    रहिवासी घरांजवळ प्रत्येक शंभर फुटांवर दोन प्रकारचे कचय्राचे डबे आढळले. हे डबे  सुमारे दहा फुट  खोल असतात.येथेही नागरिक कार्ड दाखवुनच कचरा टाकु शकतात.ठराविक दिवसांनी एक मोठा ट्रक येतो .संपुर्ण केराचा डबा  स्वयंचलीत मशीनने ऊचलुन त्यातला कचरा त्या ट्रकमध्ये भरला जातो.या सगळ्या प्रक्रीयेला फक्त दोन मिनिटे लागतात.आणि एकच ड्रायव्हर कम अटेंडंट हे काम पार पाडुन पुढे जातो.

  आणखी गंमतीची गोष्ट मला नजरेस पडली ती म्हणजे रस्त्याच्या कडेला जागोजागी खांबांवर पिवळ्या रंगाचे,कुत्र्यांची चित्रे असलेले बॉक्स होते .लेकीला विचारले असता ती म्हणाली ,ते बॉक्सेस कुत्र्यांची विष्ठा टाकण्यासाठी ठेवलेले असतात.येथे बरेच लोक श्वानप्रेमी आहेत.कुत्र्याला फिरायला घेऊन जातात.त्यासाठीची ही व्यवस्था!

मला सार्वजनिक ठिकाणी,रस्त्याच्या कडेला,बसस्टॉपवर एकाच प्रकारचा कचरा आढळला ती म्हणजे सिगारेटसची थोटके.ती मात्र जागोजागी मोठ्या प्रमाणात आढळली.तरीही इतर कचरा नसल्याने.मुख्य म्हणजे थुंके लोक नसल्याने स्वच्छता अबाधित राखली जाते.

 रेल्वेतही  प्रत्येक सीटजवळच छोटा बॉक्स कचरा टाकण्यसाठी असतो.बसमध्येही कचरा टाकण्यासाठी मध्यवर्ती भागात एक बॉक्स असतो.

नेदरलँड —बेल्जियम या दोन देशांना जोडणाय्रा बसने प्रवास करतांना प्रत्येक सीटच्या शेजारी नवीकोरी प्लास्टीक पिशवी अडकवलेली दिसली.

   कचरा ,त्याचे व्यवस्थापन,ते टाकण्यासाठी लागणाय्रा सुविधा सगळंच नियोजन छान वाटलं.

नुसतंच देश स्वच्छ ,सुंदर आहे असं बघण्यापेक्षा तो तसा का आहे हे बघणंही मला महत्वाचं वाटलं. 

   *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments