*एक खमंग चुरचुरीत पत्र*


*प्रिय वडापाव यांस

   पत्रास कारण की ,मी इकडे युरोपमध्ये आल्यापासुन तुला खुपच 'मिस' करतेय.इथल्या थंडगार वातावरणात,बोचय्रा वाय्रात,कधीही पडणाय्रा पावसांत गारठलेल्या मला तुझी तिव्रतेने आठवण येतेय.बाहेर फिरतांना तर जास्तच!माझी नजर तुलाच शोधत असते.चुकुन तु इथे भेटशील अशी वेडी आशा मनांत असते.

तिकडे इंडीयात हो असंच म्हणायचं असतं.म्हणजे महाराष्ट्रात रे मी तुझ्याकडे खुप दुर्लक्ष केलं.  तेलकट, मैदा,बेसन असलेला, अनहायजेनिक असं म्हंटलं.तुला कित्येकदा नावंही ठेवली ,पाणऊतारा केला.त्याबद्दल खरंच सॉरी रे!पण यार तु हवा होतास रे इथे,मजा आली असती.तुझं ते गुबगुबीत ,कुरकुरीत पिवळसर रुप,तुझी ती  आलं,लसुण ,मिरची कढीपत्ता,कोथिंबीर घातलेली भन्नाट चव!दोन लुसलुशीत  पावांच्या मधोमध लसणाच्या चटणीसह पहुडलेलं रुपडं सतत डोळ्यांसमोर येतंय!

इथे म्हणे त्या जाड,ढोल्या बर्गरला तुझा भाऊ म्हणतात.छे दोन जाडे जाडे पाव त्यावर ते सॅलड नामक पाला,कसले कसले सॉस,मेयॉनीज,चीज आणि मध्ये टीक्की! गारढोण!चव ना ढव शिवाय तुझ्या पेक्षा कितितरी पट महागडा!कुठे तु आणि कुठे तो!तुलनाच कशी करतात सगळे तुझ्याबरोबर देव जाणे!

    तु आणि तुझ्या जोडीला वाफाळता चहाचा कप!अर्थातच तुझ्यानंतर तो हवाच !दोघांचीही खुप आठवण येते.इथे चहा तर बिल्कुल मिळत नाहीच.मिळते ती कॉफी किंवा कॅपॅच्युनो!त्यात  साखर आपणच घालायची ,दुधही आपणच घालायचं!नुसता फेस असलेली दिसायला देखणी कॉफी ! नुसतंच  ' काय  भुललीया वरलीया रंगा  ' असं वाटतं.दुध आणि साखरेचे सॅशे देतात बरोबर! 

परवा मात्र गंमतच झाली.स्विर्झलँडला गेलो होतो.माऊंट टीटलीसवर चढाई करण्यापुर्वी काहीतरी पेटपुजा करावी म्हणुन मोबाईलवर थोडं गुगललं' .तिथे एक इंडीयन रेस्टॉरंट दिसलं.आत शिरलो तर तु आहेस असं कळलं.आॉर्डर दीली.जोडीला पावभाजी आणि फ्राईड राईस पण होता.चहाही होता.थोड्या वेळाने डीश समोर आली.तुझं तेच गुबगुबीत,खुसखुशीत रुपडं ,लसणाची चटणी,दोन गोल पावांच्या स्लाईसमध्ये पाहीलं आणि मग काय 'दिल गार्डन गार्डन हो गया' पलिकडचे बर्फाचे डोंगर दिसेनासे होऊन फक्त तुच दिसत होता.पहिला बाईट घेताच मन तृप्त झालं.आहाहा!तुला कडकडुन भेटले !आणि सोबत वाफळलेल्या आल्याच्या चहाचा आस्वादही घेतला! आता स्वारी खुश होऊन माऊंट टीटलीस वर चढाई करायला सज्ज!

                 तुझीच एक पंखा (म्हणजे फॅन रे)

 टीप:आल्यावर भेटुच.मला तुझ्याबरोबर 'पोटभर' गप्पा मारायच्या आहेत.


   सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम

Comments