सूर्य मावळतीला कललेला आहे.पूर्णपणे बुडायच्या आधीचा काळ!सोनेरी संधीप्रकाश!कातरवेळ अजुन व्हायचीय.सूर्याच्या मावळतीची किरणे माडावर,झाडाच्या शेंड्यांवर,घरांवर ,छपरावर ,डोंगरावर अजुन शिल्लक आहेत.सूर्यमहाराज त्यांचा केशरी ,सोनेरी शेला हलकेच ओढुन घेत आहेत !तीच ती वेळ.दिवस संपायच्या आधीची!

  अशावेळी जरा बारकाईने अवतीभवती पाहिलंत,आवाज ऐकलेत तर लक्षात येईल की पक्षी घरट्याकडे परतण्यापूर्वी किलबिलाट करत आहेत.तोच सकाळचा ऊत्साह त्यांच्यात दिसुन येतोय.एकीकडे घरट्यात परतायची ओढ तर दुसरीकडे घरी परततांना चार गुजगोष्टी तरी कराव्यात असं वाटायला लावणारा काळ.झाडाच्या शेंड्यावर  बघा खंड्या आपली जोरदार शिळ वाजवत कितीतरी वेळ बसलाय.दुसरीकडे दिव्यांच्या खांबावर दयाळ नरमादी गोड आवाजात गप्पा मारत आहेत निवांताने!बुलबुलांची बघा या झाडावरुन त्या झाडावर ऊडता ऊडता मंजुळ गाणी ऐकु येत आहेत.वर आकाशातुन परतणारी हिरव्यागार राव्यांची जोडी किर्रर्र किर्रर्र  बोलत चाललीय!काय बरं म्हणणं असेल त्यांचं!हळद्या,सनबर्ड,नाचरा हे पण आपापल्यापरीने या आनंदाच्या आवाजात भर टाकत आहेत.कोकीळेची कुहुकुहु साद बय्राच ऊशीरापर्यंत ऐकु येतेय.धीरगंभीर आवाज करत भारद्वाज वातावरणात जरा गंभीरपणा आणतोय. आकाशात फिरणारा एकटा दुकटा बगळा असो.किंवा स्थलांतरीत पाहुणे म्हणुन आलेले पक्षी असो.त्यांचाही विशिष्ट आवाज येतो.या सगळ्या आवाजाचा मिळुन एक सुरेल अॉर्केस्ट्रा तयार होतो.आणि आपल्याही नकळत आपण त्या सुरावटीत हरवुन जातो.

हे सगळं अगदी अल्पकाळ सुरु असतं.हळुहळु सुर्य पुर्ण अस्ताला जातो.निशेची काळी गडद छाया सगळ्या वातावरणावर पसरु लागते.हिरवे झाड,माड,घरे,डोंगर सगळे अंधारात लुप्त होते.पक्षी घरट्यात चिडीचुप होतात.वातावरणात अनोखा शांतपणा येतो.मनही थोडं सैरभैर व्हायला लागतं.कातरवेळ पुढे येऊन ठेपते.माझीही पावलं नकळत देवघराकडे जातात.समईच्या शुभ्रवाती तेववुन मनाचा आणि वातावरणातला अंधार लोपण्यासाठी.


    *सौ.पुर्वा लाटकर*

Comments