*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 34*


पॅरीस रेल्वेस्टेशनला ऊतरलो.तेथेच जवळच असलेल्या 'सर्वान्ना' या  जगभरात साऊथ इंडीयन चेन असलेल्या रेस्टॅारंटमध्ये मेदुवडा सांबार ओनियन ऊत्तपम आणि खास साऊथच्या फिल्टर कॉफीचा आस्वाद घेऊन तिथेच असलेल्या बसस्टॉपवर थांबलो.तेथुन बस पकडुन हॉटेलला गेलो.थोड्यावेळ विश्रांती घेऊन बाहेर पडलो. बस डायरेक्ट लुव्र म्युझियमला जाणार होती.जगप्रसिद्ध असलेले लुव्र म्युझियम पॅरीसच्या अनेक स्थळांपैकी महत्वाचे ठिकाण.जातांनाच पॅरीस दर्शन घडत होते.निमुळते ,चिंचोळे रस्ते.इथल्या घरांची,बिल्डिंगची रचना युरोपमधल्या इतर भागांपेक्षा खुपच हटके आहे.इथे बैठी घरे ,बंगले नाहीतच.त्याऐवजी पाच ,सहा मजली पांढय्रा ,पिवळसर दगडांच्या इमारती आहेत.प्रत्येक मजल्यावर मोठमोठ्या काचेच्या तावदानी खिडक्या आहेत.खिडक्यांना कोरीव काम केलेल्या नक्षिदार ग्रिल आहेत.बाल्कनीपण आहेत.बाल्कनीला पण छान नक्षिदार ग्रील आहेत.त्यामुळेच या इमारती ऐतिहासिक वाटतात.खिडक्यांमध्ये,बाल्कनीमध्ये ,प्रवेशद्वाराजवळ सगळीकडेच गुलाबी,निळी,जांभळी,पिवळी नाजुक फुले असलेली रोपे लावलेली दिसतात,या फुलांमुळे  सगळीकडे शोभा वाटते.

वाटेत बय्राच जुन्या इमारती,मोठमोठे डोम असलेल्या,मोठे खांब असलेल्या लांबलचक पुरातन इमारती दिसतात.बहुतेक इमारतींचं रुपांतर फाईव्ह स्टार किंवा तत्सम मोठ्या हॉटेल्समध्ये केलं गेलंय.काही इमारती सरकारी अॉफीसेस म्हणुन वापरली जातात.सगळ्याच इमारती देखण्या आणि सुस्थितीत जतन केलेल्या दिसल्या.

   लुव्र म्युझीयमच्या परिसरात पण अनेक म्युझीयम्स आहेत.तेथे जवळच सेन नदीपण वाहते.नदीतुन बोटींग चालु असते.थोड्यावेळ त्या परिसराचा आनंद घेऊन म्युझीयमच्या दिशेने निघालो.खुप अवाढव्य असा याचा परिसर आहे.म्युझीयमला जाण्यासाठी खुप विस्तिर्ण अशा गार्डन मधुन जावे लागते.आजुबाजुला अनेक हिरवेगार वृक्ष लावले आहेत.जंगलातुन जातोय असा भास होतो.मध्येच एक दोन लहान तळी आहेत.तळ्याच्या मध्यभागी कारंजे आहेत.तळ्याच्या बाजुनेच अनेक खुर्च्या ठेवलेल्या आहेत.अनेकजण पाण्याचे तुषार अंगावर झेलत इथे बसलेले दिसतात.ठीकठिकाणी रंगीबेरंगी फुलांचे ताटवे लावलेले आहेत.त्यामुळे परिसर अजुनच रमणीय झाला आहे.

याच परिसरात जागोजागी पुतळे ठेवलेले दिसतात.साधारणत: पंधराव्या शतकातले आहेत.या पुतळ्यांमुळे एका ऐतिहासिक काळात आल्यासारखं वाटतं.

   लुव्र म्युझीयम पर्यंत जाईपर्यंतच बरंच चालावं लागतं.या शिवाय म्युझीयमचा आवाकाही  खुप मोठा आहे.अनेक अाडव्या इमारतींनी बनलेली ही म्युझीयमची वास्तु बाहेरुन अतीशय देखणी आहे.प्रत्येक इमारतींवर मानवी आकृत्या,पुतळे,प्राणी,पक्षी,अनेक चिन्हे या सगळ्यांची सुरेख शिल्पे आहेत.बारीक नक्षिकाम आहे.कोरीवकाम केलेलं आहे.सुवर्णमंडीत अशा काही आकृत्या आहेत.अनेकविध पुरातन इमारतींनी हा लुव्र म्युझीयमचा परिसर व्यापलेला आहे.

केवळ बाहेरची वास्तु बघण्यासाठी दोन तीन  तास सहज लागतात.संपूर्ण लुव्र म्युझीयम बघायचे झाल्यास दोन तीन दिवसही पुरणार नाहीत.आम्ही बाहेरुनच बघीतले त्याचेच समाधान मोठे होते.

 या परिसराचे अजुन एक आकर्षण म्हणजे काचेचा भलामोठ्या आकाराचा पिरॅमिड.अनेक चौकोन,चौकोनांनी बनलेला हा काचेचा पिरॅमिड अलिकडच्या काळात बनलेला आहे.त्यात आत जाऊन पण बघता येते.रात्रीच्या वेळी हा सुंदर परिसर दिव्यांनी ऊजळतो तेंव्हा या पिरॅमडमध्ये पण अनेक इवले इवले दिवे चमकत असतात.लुव्र इमारतीच्या आतुनच बस साठी,कारसाठी,टॅक्सिसाठी खास रस्ता तयार केला आहे.

   अनेक कॉफीशॉप्स  पण या परिसरात आहेत.कॉफी आणि क्रेपचा आस्वाद घेऊन आम्ही आयफेलटॉवरकडे जाणारी बस पकडली.

   *सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments