*अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 36*

 

BIBLIOTHECk डच भाषेत म्हणजे लायब्ररी.आज योगायोगाने एका जवळच्याच लायब्ररीत जाण्याचा योग आला.झालं असं की मुलीचा पासपोर्ट रिन्यु करायचा होता.त्यासाठी काही डॉक्युमेंटसच्या काॅपीज काढायच्या होत्या.घरच्या प्रिंटरची इंक संपली होती.त्यामुळे लायब्ररीत चौकशी केली असता काॅपिज काढता येत असल्याचं कळलं.लेक म्हणाली 'आई लायब्ररी बघायला आवडेल का?'मी एका पायावर तयार झाले.खरंतर गेले दोन सव्वादोन महिने याच लायब्ररीवरुन बसस्टॉपला जात होतो.पण आत कशी आहे काही कळायला मार्ग नव्हता.बाहेरुन काही दिसत असलेली सगळीच पुस्तके डच भाषेत दिसत होती,त्यामुळे जाण्यात काही स्वारस्य वाटत नव्हतं.

लायब्ररीच्या प्रवेशद्वारापाशी गेलो.आपोआपच काचेचा मोठा दरवाजा ऊघडला गेला.आत प्रशस्त हॉल होता.चारही बाजुने काचेची तावदाने होती. ठीकठिकाणी पुस्तकांची नीटनेटकी लावलेली रॅक्स होती.दोन्ही बाजुने पुस्तके व्यवस्थित लावलेली होती.अनेक विषयवार आणि विभागवार पुस्तकांची रचना होती.आत बसुन वाचण्यासाठी अभ्यासिका होती.लायब्ररी तीन मजली होती.खालच्या लायब्ररीत एका बाजुला इंटरनेटचा विभाग होता.त्या ठिकाणी लहान मुलांसाठी काँप्युटर वापरता यावा यासाठी छोट्या छोट्या खुर्च्या ठेवल्या होत्या.काही ठिकाणी मोठ्या व्यक्तिंसाठी ऊंच खुर्च्या होत्या.पंधरा वीस कॉंप्युटर होते.

  एका बाजुला लहान मुलांच्या पुस्तकाचा विभाग होता.अनेक पुस्तके तेथे मुलांच्या ऊंचीचा विचार करुन अगदी सहज हाताशी ठेवली होती.मुले पुस्तके शोधतील,बघतील रमतील अशी सचित्र पुस्तके.बसायला रंगीबेरंगी खुर्च्या.ऊत्कृष्ट प्रकाशयोजना.अशी छान व्यवस्था होती.पुढचा विभाग पण मुलांचाच तेथेही थोडी मोठी मुले पायरी चढुन हाताने पुस्तक घेऊ शकतील अशी आकर्षक पद्धतिने ठेवली होती.तेथेही कोपय्रा कोपय्रात मुलांना शांत वातावरणात वाचता यावे अशी योजना केली होती.

  येथे आल्यावर काही मंडळी स्वत:ची पुस्तके एका पोस्टाच्या पेटीसारख्या मोठ्या आडव्या फटीतुन आत टाकत होती.त्यावरच्या कॉंप्युटर स्क्रीनवर कोणती पुस्तके जमा होत आहेत याची नावे येत होती.हे बघुन मला थोडी गंमत वाटली.पुस्तके जमा करण्याची ही आधुनिक पद्धत आवडली.त्याचबरोबर नवीन पुस्तके घ्यायची असतील तर त्यासाठी एका टेबलवर कॉंप्युटर ठेवला होता.तेथे जाऊन हव्या असलेल्या पुस्तकांच्या नावाची यादीची प्रिंट आऊट घ्यायची.त्याप्रमाणे लायब्ररीत ती पुस्तके शोधुन ती घेऊन जायची.

    या लायब्ररीत प्रौढ स्रिया तसेच मुली चटपटीतपणे काम करतांना दिसली.मदतीला लगेच धावुन येत.मुलीला प्रिंटआऊट काढतांना काही अडचण आली तर लगेच येत.तीचे शंकासमाधान निरसन होईपर्यंत थांबत.

  रोजच्या वर्तमानपत्रांचा एक विभाग होता.मासिके,नियतकालिकांचा एक विभाग होता.वाचण्यासाठी भले मोठे टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था होती.सगळ्याच लायब्ररीत स्वच्छता होती.प्रकाशयोजना अशी

होती की पुरेसा ऊजेड वाचण्यासाठी मिळावा.एक ऊबदार वातावरण तयार केले गेले होते.काॅफी मशीन पण होते.कॉफीचा ग्लास एका हातात आणि पुस्तक एका हातात असा दोन्हींचा आनंद घेता येतो.टॉयलेटसची पण सोय होती.

    एका बाजुला ई बुक वाचण्यासाठी सोय केली होती.वरचा मजला शिकण्यासाठी ठेवला होता.

  इतकी पुस्तके ,मासिके,वर्तमानपत्रे सगळं  समोर असुनही माझी अवस्था 'काला अक्षर भैस बराबर' अशी झाली होती.कारण..कारण एकच भाषा.

  पुढच्यावेळी येतांना थोडीतरी डच भाषा शिकायची असं मनाशी ठरवलंय.बघु कितपत यशस्वी होतंय.

 

*सौ.पुर्वा लाटकर अॅमस्टरडॅम*

Comments