*एक झुंज......बयाची*


काल दुपारच्या कलत्या ऊन्हावेळी सहज घराच्या टेरेसमध्ये ऊभी होते.सहाव्या मजल्यावरील फ्लॅटच्या टेरेसवरुन खुप दुरवरचा नजारा नजरेस पडतो.मागच्या बाजुला मस्त हिरवीगार शेती..त्यात ऊस  तरारुन वर आलाय तर कुठे कणसांमध्ये भरीवपणा येऊन ती दाणेदार दिसु लागली आहेत.काही ठिकाणी भाजीपाल्याची लागवड केलीय.नारळाचे माड,आंबा,पपई अशी फळझाडे पण आहेत.दुरवरच्या डोंगररांगा.निर्माणाधिन इमारती ,मध्येच हिरवाई बहरलेली दिसते.

अशातच शेताच्या कडेला असलेल्या थोड्या खुजा रानटी झाडावर काहीतरी हलतांना दिसलं.आधी वाटलं मोठी घार असावी.पण मागचे पंख वेगळेच भासत होते.जरा निरखुन पाहीलं तर तो भारद्वाज होता.त्याचे ते काळे निमुळते होत जाणारे  पंख वेगाने वरखाली होत होते.पुढचं सोनेरी अंग झाडाच्या अगदी टोकाला असलेल्या फांदीवर जोरदार हेलकावे खात  होतं.त्याच्या तिक्ष्ण नखांनी सुगरणीचं घरटं अगदी घट्ट पकडुन ठेवलं होतं.भणाणता वारा ,ती हलणारी फांदी आणि टोकाशी बांधलेलं सुगरणीचं ऊभं सुबक घरटं.सगळंच हेलकावत होतं.भारद्वाज कसाबसा त्या घरट्यावर,फांदीवर तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होता.घरट्यात बहुधा अंडी किंवा पिले असावीत.काही करुन त्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रचंड अट्टाहास आणि आटापिटा चालु होता.

भारद्वाजाचा हा कावा सुगरणीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.बहुधा ती आसपासच असावी.तिने जोरजोराने चिं चिं असा चित्कार काढत भारद्वाजाच्या जवळुन फेय्रा घालु लागली.तीचा पण आवेग,आक्रोश कळत होता.आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी ती त्वेषाने धावुन जात होती.पण इथे सामना बरोबरीचा नव्हता.इवलेसे सुगरणीचे पंख,तो चित्कार,ते तावातावाने धावुन जाणं.खुप वेळ चालु होतं.एखादी अटीतटीची मॅॅच चालु असावी असं वाटत होतं.नकळत माझाही श्वास वाढला.हातात करण्यासारखं काहीच नव्हतं.निव्वळ बघ्याची भूमिका घेण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता,

इकडे भारद्वाजपण ती फांदी आणि घरट्यावरील पकड सोडायला तयार नव्हता.इतकावेळ प्रयत्न करुनही काहीच निष्पन्न होत नव्हतं.मलाही आश्चर्य वाटलं.सुगरणीच्या घरट्याचं आपण नेहमीच कौतुक करतो.इथे तर त्याच्या चिवटपणाची आणि मजबुतीची परिक्षाच चालु होती.इतकावेळ सुगरण आई एकटीच लढा देत होती .थोड्यावेळात बाबाही मदतीला धावले.आता दोघेही मिळुन मोठमोठ्याने चित्कार करत भारद्वाजाला हुकसुन लावण्याचा प्रयत्न करु लागले.ही झुंज जवळ जवळ अर्धा पाऊणतास चालु होती.जरावेळाने अजुनही काही सुगरणपक्षी मदतीला आले.आता झाडाभोवतीने सुगरण पक्षांचा गोलाकार वेढा पडला.सगळेच भारद्वाजाला त्रास देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न करु लागले.एव्हांना भारद्वाजही दमला असावा.त्याचाही दमसास कमी पडु लागला .आणि अचानक तो ऊडुन शेजारच्या झाडावर जाऊन बसला.इकडे मी पण सुटकेचा नि:श्वास टाकला.हुर्यौ.मॅच जिंकली.एका आईचा ,इवल्याश्या सुगरणीचा विजय झाला.सुगरण आनंदाने चिवचीवत घरट्यावर जाऊन बसली.ती टोकाची फांदी,इवले घरटे वाय्रासंगे आनंदाने डोलु लागले.इतकंच काय सगळं शेत ,आजुबाजुचा निसर्गही मजेत डोलुन या आनंदात सामील झाला होता.

   माझीही पावलं आनंदात थिरकत आत वळली.


    *सौ. पुर्वा लाटकर*

Comments