*त्या बाया*


  शेजारी नव्यानेच बिल्डींगचं काम सुरु झालं होतं.बरेच दिवस मोकळा असलेला प्लॉट ,मुलांसाठी खेळाचं मैदान झाला होता.पण आता जमीन सपाटीकरण करुन त्यावर ठिकठिकाणी खोल खड्डे घेण्यात आले.लोखंडी सळ्या,सिमेंट,वाळू ,खडी याचे ठिग येऊन पडले.लाकडी फळ्या,बांबु ,पाण्याची पिंप ,याचबरोबर जेसिबी,सिमेंट कॉंक्रीट मिक्स मशीन ,ट्रक्सची घरघर चालु झाली.आजुबाजुच्या शांत,निवांत वातावरण भंग पावले.

    अशातच कामावर येणारे मजुर,कामगार यांचीही खुप मोठी संख्या होती.यात स्रीया ,पुरुष दोघांचाही वाटा होता.

     एके सकाळी साधारणपणे आठच्या सुमारास एक टेंपो येऊन थांबला.त्यातुन दहा बारा बायका पटापट खाली ऊतरल्या .प्रत्येकीच्याच हातात पिवळसर रंगाचा थैला होता.गच्च दाबुन बसवलेला होता.वर त्यात कपडे दिसत होते.एका बाजुला वापरुन जुनी  झालेली,चेपलेली पेप्सी,मिरांडा,स्प्राईटची दोन लिटरची बाटली पाणी भरुन आणलेली होती.

       सगळ्याच बायका वर्णाने रापलेल्या,काळ्या,सावळ्या,केसांचा घट्ट ,तेल लावुन बुचडा बांधलेला होता.कानात खड्याचे टॉप्स आणि नाकात खड्याची छान चकाकणारी मोरणी घातली होती.कपाळावर रुपयाचा कुंकवाचा लाल भडक गोल होता.  दोन्ही हातात जाडजुड ,टिकणाय्रा  भरपुर  अशा काचेच्या लाल,हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. अंगावर हिरव्या,मरुन,लाल रंगाच्या जरी काठपदर असलेल्या, चुरगाळलेल्या साड्या होत्या.काही जणी सुटवंग म्हणजे एकेकट्या होत्या तर काही जणींच्या कडेवर लहान मुले ,बोटाशी धरलेली मुले होती.आल्या आल्या तिथेच एका बंगल्याच्या भिंतीशी रेलुन बसल्या.सगळ्या जणींनी बरोबर आणलेल्या थैल्यातले डबे काढले.भात,सांबार अजुनही काही पदार्थ होते.आधी लेकरांना खाऊ घातलं.स्वत:ही चार घास पोटात टाकले .प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पोटभर पिऊन तृप्त झाल्या.मुलांना खेळायला सोडलं.आणि आता त्या दिवसभराच्या कामासाठी तयार होऊ लागल्या. अंगात कॉटनचा पूर्ण बाहीचा शर्ट घातला.साडी थोडी वर खोचुन त्या भोवती लुंगी गुंडाळतो तसं कापड गुंडाळलं.डोक्यावर केस झाकले जातील असं कपाळापासुन टॉवेल कम फडकं गुंडाळलं.त्यावर कापडाची चुंबळ डोक्यावर मध्यभागी ठेवुन ती पण दोरीने घट्ट मानेमागे गाठ मारुन बांधून घेतली.अशी सर्व सिद्धता होत असतांनाच सिमेंट क्रॉंक्रीटचं अजस्र मशीन गरागरा फिरु लागलं.तयार होणारं लिबलिबीत,  मिक्स्चर घमेल्यात घेऊन  बाया धावु लागल्या.एकसारख्या.त्यांच्या हालचालीत लय होती.शिस्त होती.कामाचा अनुभव दिसत होता.पाय चालत होते.डोक्यावरच्या चुंबळीवर जड जड घमेली येऊन पडत होती.हाताने मुकादम दाखवेल त्या ठिकाणी घमेली रीती होत होती.पुन्हा न थांबता घमेली भरायला मशीन जवळ येत होत्या.काही जणींचा एक डोळा जवळच्या रेतीत खेळणाय्रा मुलांवर पण होता.लहान लेकरे खेळुन खेळुन दमल्यावर प्लास्टीकच्या सिमेंटच्या रिकाम्या पोत्यावर कापड टाकुन तिथेच झोपली होती.थोडी मोठी लेकरे  तिथल्याच घाण पाण्यात,वाळुत खेळत जीव रमवत होती.मध्येच आपली आई काय करतेय हे बघत होती.

   दुपारपर्यंत हे काम अव्याहत चालु होतं.दुपारी जेवणाची सुट्टी झाली.सकाळसारखाच डबा ऊघडुन सगळ्याजणी जेवल्या,लेकरांनाही जेवायला घातलं.काही लहान लेकरे अंगावर दुध पिणारी होती.त्यांनाही पदराआड घेऊन शांत केलं.त्यातल्या काही जणींनी कंबरेची चंची काढुन तळव्यावर तंबाखु मळायला सुरवात केली.कणभर पांढरा चुना मिसळुन ,पुन्हा मळुन ती गोळी दाढेखाली ठेवली.आता सगळ्याजणी पुन्हा कामाला लागल्या.मशीनच्या घरघराटा बरोबर त्यांचेही पाय भराभरा धावत होते.कष्टणारे हात राबत होते.सुर्य वरुन तळपत होता.पण कुठेही न थांबता,विश्रांती न घेता काम चालुच होतं.

       आता सूर्य अस्ताला चालला होता. त्याची किरणे आता तिरपी येत होती.ऊन्हाची काहीली कमी झाली होती.कामाचा वेग आता आटोपता होत होता.दिवसभराचं कामही आटोक्यात आल्यासारखं वाटत होतं.गरागरा फिरणारं मशीन ऊश्वा:स टाकल्यासारखं थांबलं.तसे हलणारे हात पण अचानक थांबले.सगळ्याजणी पुन्हा भिंती जवळ येऊन थांबल्या डोईवरचा टॉवेल चाढला,चुंबळ सोडली. अंगावरचा मळलेला शर्ट काढला. कंबरेला गुंडाळलेलं फडकंही काढलं.सगळ्या जणी तिथेच फतकल मारुन बसल्या .प्रत्येकीच्या पुढ्यात प्लास्टीकची घमेली होती.फावडी होती.एका मजुराने पाण्याची नळी आणुन टाकली प्रत्येकीने आधी सिमेंटची घमेली धुतली,फावडी साफ केली. घमेली पुन्हा स्वच्छ पाण्याने भरुन घेतली.आणि आता हात,पाय घासुन घासुन त्या पाण्यानेच साफ करु लागल्या.दिवसभराचा शिण जणु त्या पाण्याबरोबर काढुन टाकत होत्या.तोंडावर पाणी मारुन,केस ओल्या हातानेच सारखे करत त्या तरतरीत झाल्या.दिवसभरचा कष्ट केलेला समाधानी चेहरा होता,समाधान होतं.हसत,गप्पा गोष्टी करत पाण्यात हात घालत त्यांचा शिणवटा घालवत होत्या.लेकरंही आता त्यांना येऊन बिलगली.

           परतीच्या प्रवासाला लागण्यापुर्वी त्या जशा सकाळी ऊत्साहात आल्या होत्या त्याच ऊत्साहात घरी जाण्यासाठी निघाल्या.जातांना तिथेही जाऊन पुन्हा राबायचं आहे हे त्यांना मनांत ठाऊक असतं.पण घराची,झोपडीची,निवाय्राची,अासय्राची अनामिक ओढ त्यांना असते. अशाच असतात बाया.कष्टणाय्रा,राबणाय्रा,जिद्दीने लढणाय्रा,लेकरांना सांभाळणाय्रा,घरचं बाहेरचं बघणाय्रा,संसारासाठी हातभार लावणाय्रा.मरमर मरणाय्रा.तरीही त्या घमेल्यातल्या पाण्यासारख्या नितळ ,निर्मळ,पुन्हा ऊभारी घेणाय्रा.तरतरीत होणाय्रा.

   अशाच असता बाया सगळीकडेच.सारख्या.थोड्याफार फरकाने!

 .........अशाच असतात बाया!

   *त्या बाया*


            *सौ.पुर्वा लाटकर*

Comments