*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम लेख 12*
*लेक ट्युलेनबर्ग*
या सगळ्या धावपळीच्या दिवसांमध्ये पण काही क्षण विसाव्याचे ,विरंगुळ्याचे मिळाले.त्यातलाच काही निवांतक्षण मला ट्युलेनबर्ग लेकच्या काठी गवसले.
नेदरलँडसमध्ये घराबाहेर पडलं की एखाद्या सुंदर निसर्गचित्रात आपण प्रत्यक्ष वावरतोय असेच वाटते.स्वच्छ ,सुंदर रस्ते.छोटे छोटे चालाण्यासाठी पुल,कॅॅनाल्स,हिरवळ,आपोआाप ऊगवलेली जांभळी,पिवळी,पांढरी ,गुलाबी रानफुलं..ट्युलीप्सच्या वेगवेगळ्या रंगाच्या छटा दुतर्फा दिसतात. काही ठिकाणी चेरीब्लॉसम मस्त फुललेला दिसतो. अशावेळी फोटो काढायचा मोह आवरतच नाही.अशाच सुंदर वाटेवरुन चालत दहा मिनिटांच्या अंतरावर सुरेख असा निळाशार लेक आहे.या लेककाठी अनेकदा फिरायला गेलोत.
लेक ट्युलेनबर्ग हे मानवनिर्मित तळं आहे. ८५ एकर एवढ्या विस्तारात हे पसरलेलं आहे.तळं मानवनिर्मित असलं तरीही आजुबाजुचा परिसर नैसर्गिक जसा होता तसाच ठेवला आहे.
तळं संपूर्ण पणे एकसंध नसुन त्याचे तीन ते चार वेगवेगळे जलाशय आहेत.
मुख्य रस्त्याने आत शिरल्यावर ऊजवीकडे मोठमोठे वृक्ष दिसतात.त्या ऊंच वृक्षांवर बरेच पक्षी किलबील करत असतात,एका बाजुला छोटी छोटी झुडपे त्यावर फुललेली फुले दिसतात.थोडे पुढे गेलं की लुसलुशीत हिरवळ दिसते.लेकला जाण्यासाठी बरेच रस्ते आहेत.मुख्य रस्त्याने गेल्यावर डावीकडे लेक आणि ऊजवीकडे ट्युलीप्स , ,डॅफोल्डीसची छोटी बाग दिसते.लेकच्या काठावर वाळु टाकलेली दिसते त्यामुळे लाटा आल्या की समुद्राकाठी बसल्यासारखे वाटते.लहानमुलांसाठी खेळायला घसरगुंडी,सी सॉ, अशी खेळणी ठेवलीत. पलीकडे सगळ्यांसाठीच ओपन जीम सगळ्या सुविधांसह ऊपलब्ध आहे.
रस्ता सुंदर बांधल्याने त्यावर वॉक करायला,सायकलींग करायला,जॉगींग करायला येणारी बरीच डच मंडळी दिसतात.तरुणाई स्केटींग,स्केट बोर्डिंग करतांना दिसते.फुटबॉल,हॉलीबॉल सारखे खेळ खेळण्याची पण सुविधा आहे. तसेच लेकमध्ये मनसोक्त पोहता पण येते.नेदरलँडसमधील सगळीच ठिकाणं पेटफ्रेंडली असल्याने अनेक वृद्ध स्री, पुरुष आपआपल्या श्वानांना घेऊन फेरफटका मारायला येतात.आयुष्यात कधीही पाहिल्या नसतील अशा कुत्र्यांच्या विविध जाती इथे पाहायला मिळतात.काही श्वान इथे स्विमिंग करतात ,पाण्यात फेकलेला बॉल चपळाईने आणुन देतात.
एकुण लेकचा चार पाच किमी चा परिसर असुन कधी जंगलातुन गेल्याचा फील येतो.कुठे हिरवळीचा गालीचा अंथरलेला दिसतो ,कुठे ऊंच ऊंच हत्ती गवत वाढलेले,कुठे बाजुने पाण्याचे नैसर्गीक स्रोत वाहतांना दिसतात,तर कुठे चढ चढुन ट्रेक केल्यासारखे वाटते. एवढं सगळं असुनही मानवी वस्ती पण लागुनच आहे.एकसारखी दिसणारी ऊतरत्या छपरांच्या घराची ओळही पलिकडे दिसते.
लेकच्या परिसरातल्या वृक्षांवर किंगफिशर,पोपट,कबुतरं,घारी .
आपल्याकडे दिसणारा दयाळ पक्षासारखा मोठ्या आकाराचा काळापांढरा पक्षी .पण याचा आवाज काही मंजुळ नाही.इतरही अनेक छोटे छोटे गोड स्वरांत गाणी गाणारे पक्षी,चिमण्या,कावळे यासारखे पक्षी बघायला मिळतात.
एकुण सगळा प्रदेश पाणथळ असल्याने बदकं,पाणकोंबड्या, ग्रे हेरॉन ,पॉंड हेरॉन,बगळे ,विविध प्रकारचे पाणपक्षी अाढळतात.तसेच मोठमोठे पांढरेशुभ्र ,डौलदार ,मोठ्याचोचीचे राजहंस पण लिलया लेकमध्ये वावरत असतात.कधी कधी राजहंसाची जोडी आणि त्यांची पिल्लेही एकामागे एक जातांनाचे दृश्य मन मोहविते.
अनेक माशांच्या प्रजाती ,कासवे इथल्या पाण्यात दिसतात.
समर सिझन असेल आणि हवामान चांगलं असेल तेंव्हा डच कुटुंबच्या कुटुंबं इथे दिवसभर आनंद घेतांना दिसतात.बार्बेक्यु लावतात.घरुन जेवण,नाश्ता,कॉफी घेऊन येतात.लहानमुले वाळुत, झोपाळ्यांवर खेळतात.ऊन्हे अंगावर घेत त्वचा टॅन करत बसतात.त्यावेळी संपूर्ण परिसर जत्रेसारखा फुललेला असतो.कार पार्कींगची पण सोय मोठ्या प्रमाणावर असल्याने लांबुन लांबुनही लोक येतात.
या सगळ्या परिसरात कॉफीशॉप तसेच रेस्टॉरंटस आहेत त्यामुळे खाण्यापिण्याची सोयही केलेली आहे.जागोजागी टॉयलेटसची पण सोय केलेली दिसते.
अशा या लेकट्युलेनबर्गला फेरफटका मारतांना निसर्ग कधी आपल्यात भिनतो आणि त्यातला निवांतपणा कधी मनांत ऊतरतो ते कळतही नाही.इतक्या सुरेख निसर्गचित्रातुन चालतांना पाय अजिबातच थकत नाहीत.ऊलट नवी ऊर्जा मिळते.मनंही ताजंतवानं हलकं वाटु लागतं.कसा वाटला हा लेक ट्युलेनबर्गचा फेरफटका?
*सौ.पुर्वा लाटकर*
Comments
Post a Comment