*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टरडॅम* *लेख ८*


*क्रामझोर्ग*

  नेदरलँडसमध्ये बाळंतपण करायला आई किंवा सासुबाई अशा ऊपलब्ध नसतात.त्यांनी येऊन मदत करावी,काळजी घ्यावी अशी इथली मनोधारणाच नाही.मुलं अठरावर्षांची झाल्यापासुनच कमावती होतात,वेगळी राहतात.त्यामुळे व्यक्तीस्वातंत्र्य असते.स्वत:ची ,स्वत:च्या कुटुंबाची जबाबदारी स्वत:च घ्यायची .त्यामुळे बाळंतपण करायला कोणी येईल यावर अवलंबुन कोणीही राहात नाही.यासाठीच इथल्या हॉस्पिटलने 'क्रामझोर्ग' ची सुविधा ऊपलब्ध करुन दीली.ही सुविधा पण इन्शुरन्समध्येच समाविष्ट असल्याने वेगळे चार्जेस द्यावे लागत नाहीत.

      डिलिव्हरीनंतर साधारण दहा दिवसांपर्यँत ही सुविधा असते.

तर ही 'क्रामझोर्ग म्हणजे कोण हे आता पाहु.क्रामझोर्ग ही वयाने साधारणत:पन्नास ते साठ,पासष्ट वयापर्यंत असलेली एक बाई.जी सकाळी आठ ते संध्याकाळी पाचवाजेपर्यंत तुम्हांला सेवा देते.

    बाळाची,बाळाच्या आईची तब्येत बघणे,बाळ कसं धरायचं,डायपर कसं बदलायच?शी,शु च्या वेळा,दुधाच्या वेळा बघणं.बाळाला आंघोळ कशी घालायची? पाण्याचं तापमान कसं हवं? आई आणि बाबा  दोघांनाही  हे सगळं ट्रेनींग देणं. बाळाचं रडणं कसं आहे?यावरुन त्याला काय हवंय,काय होतंय ते ओळखणं, बाळंतीणीची खोली व्हॅक्युम क्लिनरने साफ ठेवणं,ती सॅनिटाईझ करणं.वॉशिंग मशीन लावणं,संडास,बाथरुम धुणं .बाळंतीणीसाठी सुप,नाश्ता,जेवण बनवणं.अशी सगळी घरातली कामे ही क्रामझोर्ग करते.

   इथे मला जर डच व्यक्ती कशा असतात याची चुणुक बघायला मिळाली.

  बरोबर सकाळी आठच्या ठोक्याला दरवाजाची बेल वाजायची.गुडमॉर्नींग असं म्हणत हसतमुख चटपटीत वयाने मोठी असली तरी) क्रामझोर्ग यायची.इथल्या पेहरावाप्रमाणे जिन्स,टी र्ट,जॅकेटस, शुज असा तीचा पेहराव असायचा .हातात एक दोन बॅगा असायच्या .बाहेरचे शुज व्यवस्थित एकेठीकाणी ठेवुन घरात घालण्यासाठी आणलेल्या स्लिपर्स ,चप्पल घालायच्या.आल्या आल्या इकडे   तिकडे न बघता सरळ बाळंतीणीची खोली गाठायच्य.तीचं काम सुरु व्हायचं.सगळी कामे नीटनेटकेप्रमाणे करायच्या .बाकीचं जाऊ दे.पण संडास बाथरुमपण इतकं तल्लिन होऊन स्वच्छ करायच्या ना की ,मलाच ओशाळल्यासारखं व्हायचं.त्यात त्यांना कुठेही कमीपणा,घाण काम करतोय,किंवा ऊगीचच चालढकलपणा कधीही दिसला नाही.

        क्रामझोर्ग स्वत:चा टिफीन घरुन आणायच्या.त्यामुळे जेवणाची वेळ झाली की ती पटकन जेवुन घ्यायची.पाण्याची बाटली ,कॉफी,एखादे फळ ,चीज ब्रेड असं सगळं तीच्यासोबत असायचं .तीला आम्ही कधीही काहीही खायला अॉफर केलं नाही की काॅफी पण दीली नाही.इथलं कल्चरच नाही ते.नाहीतर आपल्याकडे कामाला आलेल्या बायकांना नाश्ता,जेवण अगदीच नाहीतर चहा तरी हवा असतोच,आणि अर्थात आपण तो देतोही.

पूर्णपणे प्रोफेशनल!याशीवाय तुम्ही घरांत काय करताय,काय बोलताय,कसे वागताय या कशाकडेही ती ढुंकुनही बघत नाही.

आपले काम चोख,प्रामाणिकपणाने,कुठलीही कुचराई न करता आनंदाने करणे हे सगळे गुण मला घेण्यासारखे वाटले.या क्रामझोर्ग टेक्नोसॅव्ही पण असतात.त्यामुळे बाळाची सगळी माहीती हातातल्या टॅबमध्ये फीड करत बसतात.कधी कधी क्रामझोर्ग पण बदलतात.दहा दिवस एकचजण येईल याची गॅरंटी नसते.यामुळे ही फीड केलेली माहीती नवीन येणाय्रा क्रामझोर्गला आपसुकच पोर्टलवरुन कळते.तीला वेगळं काही सांगावं लागत नाही.

तर अशा या क्रामझोर्ग आई आणि सासुला पर्यायी व्यवस्था!


*सौ.पुर्वा लाटकर*

Comments