*पुन:श्च अलिबाग ते अॅमस्टर डॅम* *लेख४


  इथे आल्यावर इकडचे रुटीन सुरु झाले.मुख्यत्वे लेकीची काळजी ,तीचं खाणं पिणं,तीची विश्रांती हाच ऊद्देश होता.

  इथल्या सगळ्या सोयीसुविधा आधीच माहित असल्याने पटकन रुळता आलं.वॉशिंग मशीन,डीशवॉशर ,मायक्रोवेव्ह,इंडक्शची हॉट प्लेट,गोल गोल फिरुन घर स्वच्छ करणारा रोबोटीक रुंबा .इथल्या कचय्राचे व्यवस्थापन ,कार्ड वापरुन कचरापेटी कशी ऊघडायची.कचरा कसा टाकायचा.सगळं सवयीने जमलं होतं.

       डॉक्टरांच्या अपॉइंटेमेंटच्या वेळा सांभाळणं .तिच्याबरोबर क्लिनिकला जाणे ,येणे असं सगळं चालु होतं.

क्लिनिक घरापासुन चार पाच किमी च्या अंतरावर होतं.एका तिन मजली इमारतीत हे क्लिनिक होतं.मेन डोअर बंदच होतं .तिथे गेल्यावर ते सेंन्सरने ऊघडायचं.इथे कुठेही वॉचमन,गेटकिपर ,सिक्युरीटी,पार्किंग लॉट सांभाळणारी व्यक्ति कोणीही नसतं.अगदी रिसेप्शनिस्ट पण या क्लिनिकला नव्हती.अपॉइंटमेंट असेल त्यावेळी आपणच जायचं. मिडवाईफच्या केबीन समोर थांबायचं.वेळ झाली की मिडवाईफच 'हॅलो' म्हणत हसतमुखाने स्वत:दार ऊघडुन आत बोलावतात.

तर हे क्लिनिक तीन मजली होतं.वर जायला लाकडी जीना होता. एक लिफ्ट होती पण ती कुरकुरणारी.कधी बंद पडेल याचा नेम नाही अशी.आत अडकण्याचीच भीती जास्त.

पहिल्या मजल्यावर रक्त,लघवी तपासणारी लॅबोरेटरी होती.दुसय्रा मजल्यावर फिजिओथेरपी आणि एकदोन केबीन्स होत्या.

अगदी वरच्या मजल्यावर मिडवाईफ,सोनोग्राफी यांच्या केबीन्स होत्या.प्रत्येक केबीनवर ठळकपणे ती कशाची आहे ते लिहीलेलं असल्याने कोणाला विचारायची गरज पडत नाही.

सुमारे पस्तीस ,चाळीस पायय्रा चढुन लेकीसोबत हळुहळु चढत आम्ही क्लिनीकला पोहोचलो.आता तीला नववा महिना लागला होता.वेटींग एरीया लहानसा,आटोपशीर होता.तिथे भरपुर पुस्तके !मासिके,माहितीपर पत्रके यांनी रॅक भरले होते.मधोमध कॉफी मशीन होते.तिथे वेगवेगळ्या सेटींगनुसार,कॉफी,ब्लॅककॉफी,कॅप्यचिनो घेता येते.मंद स्वरात संगीत चालु होते.समोरच भलामोठा टि.व्हि.देखील होता.एका कोपय्रात लहानमुलांसाठी छोटुसे टेबल ,खुर्च्या ,काही खेळणी,पुस्तके अशी व्यवस्था होती.सगळंच  डच भाषेत असल्याने वाचायची अडचण!

 इकडे डच लोक तुम्हांला बघीतल्यावर हाय,हॅलो करतातच .ओळख असो अथवा नसो.वर्षानुवर्षांची मैत्री असल्यासारखे ,गोड शब्दांत हसुन ग्रीट करतात.आपणही तितकाच पटकन हसुन रिस्पॉन्स द्यायचा असतो.दुकानांत फिरतांना!बसमध्ये,रस्त्यावरुन चालतांना कधी अचानक समोरुन 'हाय'हॅलो' येईल सांगता येत नाही.कधी कधी नुसतं 'होई' असं म्हणुन ती व्यक्ती निघुन जाते.याची खरंतर आपल्याला सवय नसते पण ती करुन घ्यावी लागते.आपण त्यांना परत ग्रीट नाही केलं तर मॅनरलेस,तुसडा,अॅरोगंट असा शिक्का बसतो.पर्यायाने आपल्या देशाबद्दल गैरसमज होतो ,त्यामुळे हाय हॅलो ला हाय हॅलोचंच ऊत्तर. असो.

 ठरल्याप्रमाणे अपॉईंटमेंट पार पडते.इथे पेशंटकडुनच तुम्हाला काय वाटतंय ,कसं वाटतंय?डिलिव्हरी कधी होईल असं तुला वाटतंय.असे अनेक प्रश्न विचारतात.त्यांचं काम एकच तपासुन सगळं ' ओक्के ' आहे असं सांगणं.

शेवटच्या दिवसात एक फाॅर्मपण भरुन घेतला त्यात अनेक प्रश्न होते.त्यानुसारच तुमची डिलिव्हरी प्लॅन केली जाते.इमर्जन्सीला कोणता निर्णय घ्यायचा,कोणी घ्यायचा,कोण जबाबदार असणार?हॉस्पिटलला तुझ्यासोबत कोण असणार?

असा फॉर्म भरुन दीला की तो त्यांच्या पोर्टलाला जातो.त्यानुसार मोठ्या हॉस्पिटलला सुचना देण्यात येतात.थोडक्यात पेशंटची बरीचशी जबाबदारी ते पेशंटवरच टाकतात.काही झालं तर आम्ही जबाबदार नाही .असाच एकुण सुर दिसला.

   इथल्या मिडवाईफ्स  स्वत: पेशंटला कोणत्याही सुचना देत नाहीत.आहार कसा असावा ?काय खावे?कोणती पथ्ये पाळावीत? असं काहीही सांगत नाहीत.अगदी अायर्न कॅल्शीयमच्या गोळ्या पण देत नाहीत.सगळं काही आहारातुन जावं अशी त्यांची अपेक्षा असते.

इथे पहिलीच खटकलेली बाब म्हणजे सगळ्या प्रेग्नंट महिलांना चाळीस पायय्रा चढुन यावे लागायचे .पण त्या बद्दल कोणीही नाराज दिसत नव्हत्या.कोणाचाच तक्रारीचा सुर नव्हता.डच मुली अंगापिंडाने सुदृढ असल्याने भराभर जीने चढत ऊतरत होत्या.आम्ही मात्र सावकाश ,जपुन म्हणत वर जायचो.

  *सौ.पुर्वा लाटकर*

Comments