अन्वी

 अन्वीच्या बेडरुममध्ये येणारी सकाळची कोवळी नारंगी सुर्यकिरणे तीला हलकेच ऊठवत होती.छानसा प्रसन्न असा सुर्यप्रकाश खोलीभर पसरला होता.अन्वी मात्र गाढ साखर झोपेत होती.कोवळ्या किरणांनी आणि ऊजेडाने तीची झोप जरा चाळवली.तशीच ती दुलईत पडुन राहीली.झोपायचा प्रयत्न करु लागली.पण हळुहळु  वर येणारी सुर्यकीरणे तीच्या झोपेत व्यत्यय आणु लागली.ती काहीशा लटक्या रागानेच ऊठली आणि स्वगत म्हणावं तसं सुर्याकडे बघुन म्हणाली.

'काय रे माझी झोपमोड करायला तुला मजा येतेय ना!तुला नाही का वाटत कधी सुट्टी घ्यावी,कधीतरी दांडी मारावी.हातपाय पसरुन ढगांमध्ये गुरफटुन मस्त ,निवांत झोप काढावी.कधी तरी विश्रांती घ्यावी.रोज रोज ऊगवायचं.दिवसभर फिर फिर फिरायचं.दमुन भागुन डोंगराआड जायचं.पण इथे डोंगराआड गेलेला दुसरीकडे ऊगवलेलाच असतोस ना.म्हणजे थोडक्यात तुझी चोवीसतास ड्युटी.नो सुट्टी,नो रजा.काही काहीच नाही.

मला माहीतीय तु ऊगवला नाही तर पृथ्वीवर havocच होईल.सगळं जग अंधकारमय होईल.या पृथ्विचं चलनवलन थांबेल.जगाचं चालतं चाक ठप्प होऊन जाईल.तुझ्यामुळेच तर रोज नवीन चैतन्य चराचरांत संचारतं.नवा दिवस,नवी सुरवात, नवी ध्येय ,नवीनवी ऊर्जा आणि नवी स्वप्नं घेऊन तु रोज येतोस.तुझ्या येण्याची चाहुल त्या इवल्याश्या पाखरांना खुप आधीच लागते.तुझी तेजस्वी किरणे येणार हे खुप आधीच समजते.म्हणुनच हर्षोल्हासाने ब्राम्हमुहुर्तापासुनच तुझ्या स्वागताला त्यांचा गोड सुस्वर कानी येऊ लागतो.

दररोज सकाळी अगदी नियमितपणे न चुकता ठराविक दिशेला,ठराविक वेळी ऊगवण्याच्या तुझ्या पर्फेक्ट टायमिंगला ना खरोखर दाद द्यावीशी वाटते. कितीतरी शिकण्यासारखं आहे रे तुझ्याकडुन.तुझी शिस्त,तुझा नियमितपणा.तुझं कामात हलगर्जीपणा नसणं,तुझं सातत्य!मुख्य म्हणजे तुझ्या ठायी असलेली कितीतरी पट ऊर्जा,ऊत्साह.पॉझिटीव्हिटीचं जणु भांडारच आहेस तु.तुझ्या येण्याने मनांवरची मरगळ क्षणार्धात गायब होते.चला आज काहीतरी नवीन सुरु करु.मागची ऊदासी,अपयश,चिंता सगळं सगळं विसरायला लावतोस तु.

    ऊगीचच रागावले का रे मी तुझ्यावर!आता यापुढे नाही मी चिडणार,रागावणार.सॉरी !मला माफ करशील ना.

   तुझे गुण मी आता सतत आठवायचा प्रयत्न करीन.आत्मसात करायचा प्रयत्न करीन.करशील ना माफ मला'.

 अन्वी त्या नारंगी तेजस्वी गोळ्याकडे पाहात स्वत:शीच बोलत होती इतकावेळ.ऊन्हाचा    किंचीत चटका जाणवल्यावर ती भानावर आली.चटकन दुलई दूर करुन अंथरुणातुन ऊठली.गॅलरीत येऊन ऊगवत्या ऊर्जेला मनोभावे नमस्कार केला.क्षणभर ती ऊर्जा आपल्यात घेण्याचा प्रयत्न केला.आणि ती बाथरुमकडे वळली.डोक्यात आजचं प्रेझेंटेशन ,मिटींग्ज यांची गर्दी व्हायला सुरवात झाली होती.पण नेहमीसारखी ती तणावाखाली नव्हती तर ऊत्साहाने कामाला लागली होती.

    

             सौ.पुर्वा लाटकर

             ( 24.10.2024)

Comments