निरोप निर्जीवांचा .....
जन्माला आलेल्या सगळ्याच गोष्टींना
एक्सपायरी डेट असते.आपल्या हातात.किती श्वास आहेत हे आधीच ठरलेले असते.फक्त याची जाणीव आपल्याला नसते.एखादी व्यक्ती गेली की आपण शोक करतो.त्याच्या आठवणी काढतो.त्याच्याबरोबर जगलेले क्षण आठवत बसतो. जीवंत व्यक्ती ,प्राणी यांच्या बाबतीत ह्या भावना योग्यच आहेत.
परवा अशी घटना घडली की आमचे जवळचे स्नेही अचानक गेले.साहजिकच त्यांच्या बरोबर घालावलेले सगळे प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहिले.वाईट तर वाटतच पण एखादी व्यक्ती गेली की तिची पोकळी ,तिची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.तशीच्या तशी दुसरी कोणीच व्यक्ती आणता येत नाही. विधात्याने एकमेव असे शरीर , एका जन्मासाठी दिलेले असते.नंतर आपण आठवणी काढतो अमुक. व्यक्ती अगदी अमुक व्यक्तीसारखी दिसत होती ना!हे झालं सजीव व्यक्तीच्या बाबतीत.
एखादी वस्तू जुनी झाली की तिची आपण सहजपणे रिप्लेसमेंट आणतो.
फ्रिज ,वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल अशा असंख्य वस्तु बदलतो. घरं बदलतो.
नवीन वस्तु आणतांना आनंद असतो.नव्याची नवलाई असते.कुतूहल असतं उत्सुकता असते.नवीन टेक्नॉलॉजी,नवीन फीचर
शिकायची ,जाणून घ्यायची ओढ असते.नवीन घर असेल तर ऊसाह शिगेला पोहोचलेला असतो.
त्याचबरोबर जुन्या वस्तूंना निरोप देताना ती वस्तु कधी घेतली ,किती वर्षे वापरली ,किती उपयोग झाला त्या वस्तूचा ,त्या वेळी ती किती अँडव्हान्स्ड होती.इतक्या वर्षात कधीच खराब झाली नाही.ती आतापर्यंत मी कशी नीट वापरली अशा फुशारक्या पण आपण मारतो.घर असेल तर जुन्या घराच्या असंख्य आठवणी मनात दाटुन येतात.अनेक आठवणी रुंजी घालतात.
मला नवीन वस्तूंच्या आनंदापेक्षा जुन्या वस्तूंना निरोप देताना जास्त त्रास होतो. जुन्याची सवय , त्याचं वापरणं अंगवळणी पडलेलं असतं.नवीन वस्तु वापरायची भीती.बिघडेल याची भीती.नवीन टेक्नॉलॉजी,नवीन. फिचर्स अंगीकारायची भीती. जुने ते हवे आणि नवीनही हवे अशी द्विधा मनस्थिती.होते.
नव्या वस्तु वापरताना जुन्या जास्तच प्रकर्षाने आठवत राहतात.पण ही दोलायमान अवस्थासुद्धा अगदी थोडेच दिवस टिकते.नव्या वस्तु सरावाच्या झाल्या की जुन्या पूर्णपणे विसरून जातो.नव्याशी गट्टी जमते.त्या आवडू लागतात. काळाच्या प्रवाहाबरोबर त्या कोंदणातल्या आठवणी फक्त मागे राहतात.
जश्या सुर्हुदांच्या तशा निर्जीव वस्तुंच्या असलेल्या .
निर्जीवांनाही निरोप देताना थोडं जडच जातं!
तुमच्याबाबतीतही होतं का असंच काहीसं!
सौ पूर्वा लाटकर.
Comments
Post a Comment