वडाला गुंडाळल्या गेलेल्या प्रत्येक. शुभ्र धाग्याबरोबर
कित्येक जणींनी यात बांधली आहेत
अनेक स्वप्ने, आशा ,अपेक्षा अन् ईच्छा
चांगल्या भविष्याची आणि समाधानी आयुष्याची
कित्येक जणींच्या वेदना, दुःखे, सल
काही सांगता येत नसलेले गळ्यातील कढ
मना शरीरावरचे काटेरी ओरखडे
लसलसणाय्रा जखमा आणि वळ
वयोवृद्ध वड हे सगळंच ऐकून घेतो दरवर्षी
त्यालाही सवय झालीय या सुख दुःखाच्या हितगुजाची
तोही मग हे सगळं साठवतो हृदयात
ठेवून देतो एका ढोलीत
जमेल तसं सांत्वन करतो
सावली धरतो मायेची
मंद वाऱ्याच्या झुळुकीने फुंकर घालतो
देतो दोन क्षण त्याच्या सानिध्यात विसाव्याचे
ही सगळी गडबड,लगबग
फक्त वर्षातून एकदाच
बाकी मग वर्षभर वड अगदी एकटा एकटा
शुभ्र धाग्यातून मिळालेले दुःख रिचवत एक एक घोट.
सौ. पूर्वा लाटकर
Comments
Post a Comment