म म मराठीचा

 *म म मराठीचा*


आपल्या मराठी भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि आपल्या समस्त मराठी जनांचा ऊर अभिमानाने भरून आला.

खरंच मराठी भाषा आहेच तशी थोडी रांगडी,आपल्या दरी खोऱ्यातल्या काळया ,कभिन्न पाषाणासारखी तरीही गोडवा असणारी,तिची एक नजाकत ,एक लहेजा असणारी.दर बारा कोसांवर बदलणाऱ्या आपल्या बोलीभाषेना घेऊन अधिकच समृद्ध होत जाणारी.अनेक शब्द, अनेक व्युपत्ती प्रसवणारी . हिंदी,उर्दू , फारशी,संस्कृत,कानडी आताच्या काळात इंग्लिश शब्द या सगळ्या  भाषांना घेऊन ती वाटचाल करते आहे.

मराठी साहित्य,मराठी नाटके,मराठीत असलेली दिवाळी अंकांची परंपरा.अनेक लोकसाहित्य,म्हणी,पोवाडे,संत साहित्य ,गझल यांचा खुप मोठा वारसा महाराष्टाला लाभला आहे.

भाषा बोलायला हवी,जपायला हवी, टिकायला आणि टिकवायला हवी या बद्दल कोणाचेच दुमत नाही.

पण आज केवळ मराठी भाषेच्या नावाखाली जी अतिरेकी चळवळ चालु आहे ती कोठेतरी थांबवायला हवी.मराठी न येणाऱ्यावर  सोटा  उगारला जात आहे.दमदाटी केली जात आहे.मारहाण केली जात आहे.दुकाने, ऑफिस फोडले जात आहेत. अशाने इतर भाषिक लोकांना आपल्या मराठी भाषेची ,मराठी माणसांची भीती वाटु लागेल.आणि जे शिकण्यास उत्सुक आहेत त्यांचे अवसान गळून जाईल.मराठीविषयी प्रेम सोडा उलट तिडीक वाटू लागेल.  इतर भाषा जसे फ्रेंच,जर्मन,जपानी ,स्पॅनिश भाषेचे कोर्सेस असतात तसे मराठीचे कुठे सहसा आढळून येत नाहीत.संस्कृत, पाली भाषेचे पण युनिव्हर्सिटी मध्ये कोर्सेस आहेत.पण मग मराठीचे कुठे आहेत?

परवा पुण्यात हिंदी भाषा शिकवण्याचा क्लास बघितला.

मध्यंतरी बंगळुरूला असताना   यू ट्यूब वरून कन्नड भाषा शिकण्याचा मी प्रयत्न  केला होता.निदान रोजच्या जगण्यापुरती तरी ही भाषा यायला हवी अशी ईच्छा होती.

त्याच यू ट्यूब वर तमिळ,तेलगू, मल्याळम, बंगाली अशा अनेक भाषांचं शिक्षण मिळताना दिसत होतं .ते देखील अतिशय साध्या  ,सोप्या शब्दात.

अशी सोय मराठीसाठी दिसत नाही.ते शिक्षण द्यायला कोणी उत्सुक दिसत नाही.आणि असं शिक्षण असेल कुठे उपलब्ध तर ते शिकणाऱ्या लोकांपर्यंत  पोहोचत नाहीये. 

 या उलट नेदरलँडमध्ये सगळी भारतीय मुले डच शाळेत शिकतात ती पूर्णतः मोफत असते. हळूहळू मुले डच छान बोलायला शिकतात संवाद साधतात.पालक जर तिथले एम्प्लॉयी असतील तर त्यांना  डच भाषेच्या परीक्षा द्याव्या लागतात. सक्ती नाही पण एक एक लेवल पूर्ण केल्यास तिथल्या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात.रोजचे व्यवहार करणे सोपे जाते लोकांशी संवाद साधता येतो. डॉक्टरांना भेटायला जाताना,सहकाऱ्यांबरोबर,शेजाऱ्यांबरोबर स्नेह वाढतो. काही सरकारी खात्यात ,रेल्वे ,बस अनाउन्समेंट डच भाषाचं वापरली जाते.पण जर तुम्हाला डच येत नसेल तर कोणी तिरस्कार करत नाही,धाकदपटशा करत नाही.तुमच्या मानगुटीवर किंवा डोक्यावर बसून  आमची डच भाषा आलीच पाहिजे असेही कोणी करत नाही.अथवा तुम्ही डच बोला फक्त असेही कोणी म्हणत नाही.आपण इंग्लिश बोललो तर तेही इंग्लिशमध्ये बोलतात.विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे 

देतात. मदत करतात. डच येत नाही म्हणून कोणी कुत्सितपणे बघत नाहीत. किंवा कशाला आमच्या देशात राहताय असाही आविर्भाव नसतो.

तिथे ऑफिसकडूनच डच भाषेचं प्रशिक्षण दिलं जातं ते ही ऑफिसच्या वेळेतच.आता तर ऑनलाईन व्यवस्था आहे.गाडीचे लायसन काढण्यासाठी डच आवश्यक आहे.भाषा शिकण्याची जी उर्मी आहे ती सहज,कधी गरज म्हणुन शिकली जाते.ती पण आनंदाने. असं मराठीच्या बाबतीत कधी होईल? मोठेच प्रश्न चिन्ह आहे ना!

अजुन एक सांगायचं राहिलं तिथे दर रविवारी मराठी शाळा भरते.त्यात लहान मुलांना बाराखडी लिहिण्या

पासून ,अंक, वार,महिने,छोट्या कविता, गोष्टी, श्लोक ,आपल्या सणांची माहिती अशा सगळ्याची माहिती मुलांना देतात.परदेशातही पालक आवर्जुन आपल्या मुलांना या 

शाळेत घेऊन जातात.घरी पण शिकवतात.आहे ना सकारात्मक बाब!


*अशा मराठी शाळा अनेक देशात मराठी शिकवण्याचे काम अविरत करत आहेत.आपली संस्कृती ,सणवार ,आपल्या परंपरा निष्ठेने जोपासत आहेत.*


आपणही इथे राहून मराठी भाषा प्रेमाने  बोलूया , संवर्धन करूया.आणि जो कोणी उत्सुक असेल त्याला शिकवूया .माऊलीच्या  मायेने!



*सौ.पूर्वा लाटकर*

Comments