वटपौर्णिमा २

 वटपौर्णिमेच्या दिवशी नटून सजून बायका जातात वडाला, पूजायला 


कधी श्रद्धेने तर कधी भक्तिभावाने

तर काही जणी जातात  नाईलाजाने 


नेसतात जरी पदराच्या साड्या 

टोचत राहते जर आतून सारखी

तरी वावरतात हसतमुखाने


घालतात सोन्या मोत्याचे दागिने

कधी मुलामा दिलेले नकली दागिने

तसाच चेहऱ्यावर  खोटा मुखवटा



सजवतात पूजेचं तबक

मांडतात त्यात स्वतःचच  सुख

अतिशय कौशल्याने लपवतात दुःख



हातातील गडव्यातले पाणी 

 आणि डोळ्यातलेही अश्रू

हिंदकाळून सांडू  देत नाहीत





वडाची मनोभावे पूजा करतात

वडाभोवती फेर धरत धागाही  गुंडाळतात

धाग्याबरोबर आपल्या मनातील

गुंता सोडवत जातात


सख्यासयांबरोबर गूजगोष्टीही करतात

पण ओठातले    कडवट  शब्द 

जपत राहतात असोशीने


वर्षभराचे  मागणे एकदाच मागून घेतात

जातांना उत्साही असणाऱ्या त्या

शांत शांत होऊन परततात

पुन्हा एकदा संसारात दबून,बुडून जातात


सौ.पूर्वा लाटकर

Comments