काल फारा दिवसांनी वरसोलीच्या बीचवर जाण्याचा योग आला. संध्याकाळची वेळ . पाऊसही थांबलाय .वातावरणही छान होते.सुटीचा दिवस नसल्याने पर्यटकांची गर्दीही नव्हती.मोजकेच अलिबागकर नेहमी येणारे ग्रुप करून बसले होते.काही फिरण्याचा आनंद घेत होते. रॅम्प वरून खाली उतरताच जे काही दृश्य समोर आले ते मात्र क्षणात आमचा सगळ्यांचा उत्साह , आनंद यावर पाणी फिरवण्यासारखे होते. संपूर्ण किनारा जणू एक कचरा कुंडी सारखा दिसत होता.
काय नव्हतं त्या कचऱ्यात.प्लास्टिकच्या बाटल्या,दारूच्या बाटल्या,प्लास्टिक कप,थर्माकोल डिशेस ,पेपर डिशेस,वेफर्सचे रॅपर्स, ब्लेड्स ,कंगवे, पेन,अनेक पादत्राणे,लहान मुलांची खेळणी,कपड्यांचा ढीग ,नारळ आणि नारळाच्या करवंट्या ,मासेमारीची जाळी .सागराला जे जे काही कचरा म्हणून टाकलं होतं ते ते सर्व काही सागराने साभार परत करून मानवाला चांगली चपराकच दिली आहे.
हे सगळं बघून मन विदीर्ण झालं.चूक आपलीच आहे.अलिबागला येणारे हजारो पर्यटक आणि आपणही या सगळ्याला कारणीभूत आहोत .
या सगळ्याचा त्रास केवळ आपल्याला नाही तर सगळ्या सागरी जीवांना होतो.तसेच सागरी किनारी अनेक पक्षी ,जीव जंतू, किडे यांचा वावरही असतो . त्यांना पण या प्रदूषणाचा फटका बसतो.
ज्या उत्साहाने आणि ओढीने बीचवर गेले होते ती लाट क्षणार्धात ओसरली.
मला पूर्वीचे आपले सगळे सागर किनारे आठवले . आक्षीं ,नागाव,किहीम,वरसोली ,मांडवा ! सगळेच किती स्वच्छ,नितळ आणि सुंदर होते.ती घनदाट सुरुची बने.तिथे येणारे हजारो परदेशी पक्षी,ती शांतता.सुरक्षित आणि फारशी गजबज नसलेले.कोलाहलापासून दूर असलेले.
ते दिवस पुन्हा कदाचित येणार नाहीत.पण आणखी नुकसान टाळण्याचा प्रयत्न करणे आपल्याच हातात आहे.
आज नारळी पौर्णिमा ! आजच्या
दिवशी अनेक कोळी बांधव सागराला पूजतात,त्याला साकडं घालतात आणि आपली मासेमारी चालु करतात.आजच्या दिवशी आपणही एक पण करूया आपल्याकडून तरी काही हानी सागराला पोहोचणार नाही याची काळजी घेऊया.
सौ.पूर्वा लाटकर ......एक अलिबागकर🥥🥥🌴🌴🌴
Comments
Post a Comment